मध्यमहाराष्ट्रात घाटमाथा, विदर्भ आणि कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज
पुणे: ऐन गणेशोत्सवात मध्यमहाराष्ट्रातील घाटमाथा, कोकण आणि विदर्भातील बहुतांश भागात पुढील तीन ते चार दिवस मुसळधार तसेच अतिवृष्टी तर मराठवाडा आणि राज्याच्या उर्वरित भागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
दरम्यान पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर (घाटमाथा), सातारा (घाटमाथा), पुणे (घाटमाथा -रेड अलर्ट) नाशिक या भागात पावसाचा जोर अधिक राहणार आहे. कोकण व घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राज्यात तेही सर्वात जास्त मध्यमहाराष्ट्र (घाटमाथा) आणि कोकणात गेल्या सुमारे पंधरा दिवसांपासून अतिमुसळधार पावसाची बॅटिंग अद्यापही सुरू आहे. 25 ऑगस्टपर्यंत असाच जोरदार पाऊस सुरू राहणार आहे. कोकण आणि घाटमाथा भागात हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला असून, विदर्भ आणि मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
अगोदरच गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असतानाच या उत्सवात मुसळधार पाऊस बरसणार असल्यामुळे नागरिकांच्या आनंदावर विरजन पडण्याची वेळ आली आहे. 23 ऑगस्टपासून महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. तर विदर्भात काही भागात मेघगर्जना व विजांचा कडकडाट होऊन मोठ्या प्रमाणावर पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्यातील उर्वरित भागात ढगाळ हवामान राहून मध्यम ते हलका स्वरूपाचा पाऊस पडणार आहे.