राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळींचा दस्तऐवज ठराव्यात अशी पायपीट समाजवादासाठी – पन्नालाल सुराणा, लढे आणि तिढे – पुष्पा भावे आणि फकिरीचे वैभव – विजय यशवंत विल्हेकर ही तीन आत्मकथनं मनोविकास प्रकाशनाकडून सप्टेंबर २०२० मध्ये वाचकांच्या हाती सोपवली जात आहेत. त्यानिमित्ताने शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते विजय विल्हेकर यांच्या फकिरीचे वैभव या आत्मकथनातील एक प्रकरण…
संपूर्ण क्रांतीचे उद्गाते लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या समग्र क्रांतीमध्ये सामाजिक परिवर्तन अपेक्षित होते. मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव द्यावं म्हणून लढली गेलेली नामांतराची चळवळ, ही आपल्या चळवळीला जवळची आहे. जे.पीं.च्या समग्र क्रांतीत ‘छात्रयुवा संघर्ष वाहिनी’च्या तमाम तरुणांनी सहभागी झालं पाहिजे ही बहुतेक कार्यकर्त्यांची विचारधारणा होती. आंदोलनात देशभर विविध जातीपाती, धर्म-समूहांचे व वेगवेगळ्या क्षेत्रांतील, दुसर्या स्वातंत्र्यलढ्याच्या महत्त्वाकांक्षेनं एकत्र आलेली विविधता. नामांतराच्या आंदोलनात सहभागी करणं, म्हणजे त्या काळातील सामाजिक अभिसरणाचा एक प्रभावी निर्णय होता आणि त्या प्रमाणात जे.पीं.चे कार्यकर्ते नामांतर आंदोलनात क्रियाशील झाले होते. आमचं आपलं शैक्षणिक वय. तरुण मुलीच्या प्रेमात पडायच्या वयात, आम्ही वृद्ध जयप्रकाश नारायण यांच्या प्रेमात पडलो होतो.
आमचा यशवंतबाप महात्मा गांधींच्या स्वातंत्र्य चळवळीचा सामान्य कार्यकर्ता. पहाटेच उठून मायबापाला न सांगता स्वातंत्र्याची प्रभातफेरी निघायची, त्यात बिगुल वाजायचा. या स्वातंत्र्याच्या कामाला चिनका आजी व मिठाराम आजा ‘उपलानी’ म्हणजे बिनकामाची उठाठेव समजायचे. होसात आलेलं तरुण पोरगं, भुताकेताच्या फेर्यात-घेर्यात तर आलं नाही? असं अडाणी मनानं समजत होते. भुताकेताच्या घेर्याफेर्यावर उपाय म्हणून, कधी फकिराचं मंतरलेलं पाणी द्यायचे. कधी अंघोळ करताना, स्मशानमाती अंगाला लावायची. कधी देवादिकांना नवस बोलायची. शादलबुवाच्या शेंड्या ठेवायची. पण हे यशवंतबापाचं भूत उतरायचं नावंच घेत नसे, कारण ते गांधीबाबाच्या स्वातंत्र्य आंदोलनाचं भूत होतं. ते मंत्रानं कसं उतरंल? कामधंद्यात, अभ्यासात हुशार पोरगं यशवंत, भलत्यासलत्या कामात लागल्याची चिनका आजीची खंत होती.
तीच खंत यशवंतबापाची माझ्याबाबत होती. कृष्णाभाऊ डॉक्टर झाल्यावर, माझ्याबाबत त्यांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. म्हणून त्यांनी शरीरविज्ञान शिकण्यासाठी अमरावतीला पाठवलं होतं. आम्ही ‘शिवाजी विज्ञान महाविद्यालया’त शरीरविज्ञान शिकण्याऐवजी, लोकनायक जयप्रकाश नारायण यांचं समग्र संघर्षविज्ञान शिकायला लागलो. तीच आपली ज्ञानप्रबोधिनी राहिली. जयप्रकाश नारायण यांच्या विचारांचा सहवास, आयुष्याची समृद्धी वाटली.
‘अमर हबीब’ राष्ट्रीय संघटक असताना महाराष्ट्रात नामांतर आंदोलनाची अनुभूती ही अपूर्व घटना होती. जयप्रकाश नारायण यांच्या विचारांनी प्रेरित तमाम कार्यकर्ते नामांतर आंदोलनात सहभागी झाले होते. नामांतर आंदोलनाचं केंद्र औरंगाबाद होतं. औरंगाबादलाच आमचा मोठा भाऊ डॉ. के. वाय. विल्हेकर यांची बदली झाल्यानं, आंदोलनात चांगली व्यवस्था झाली होती. भाऊला गाडी चालवता येत नव्हती. मी गाडी चालवण्यात तरबेज. त्यामुळे आंदोलनकाळात दुचाकी दिमतीला असल्यानं, विविध भागांतील बैठकींना हजेरी लावता येत असे.
आंबेडकरी विचारांचे सर्व नेते, सामान्यजन, साहित्यिक, विचारवंत, नोकरदार एकत्र आलेले होते. त्यात जे.पीं.च्या निष्ठावान, बुद्धिप्रामाण्यवादी, कणखर, चिवट, प्रयत्नवादी कार्यकर्त्यांची भरीत भर. श्रीराम जाधवसारखे आमच्या सीनिअर फळीतले प्रतिभावान कार्यकर्ते नियोजनात असत. आज संपूर्ण विखुरलेले नेते, ऐन तारुण्यात नामांतर आंदोलनाच्या नामंतरपीठावर, एकत्र पाहायला मिळाले. हाही आंबेडकरी योगच म्हणावा लागेल!
एका बैठकीमध्ये पन्नास-साठ लोक असतील. मी माझ्या मित्रासोबत बैठकीला पोहोचलो. सर्व संघटनांच्या सीनिअर आणि निर्णय करू शकणार्या प्रमुख लोकांची बैठक. मीच त्यांच्यामध्ये कदाचित सर्वांत ज्यूनिअर. लाजर्या-बुजर्यापणात एक कोपर्यात बसलेला. आंदोलनाची रणनीती रांगड्या, मोठ्या, ओरड्या आवाजात नेते विशद करत होते. मी मित्राच्या कानात पुटपुटलो, “दोस्ता, इतक्या कमी लोकांमध्ये, कमी आवाजात विचार पोहोचण्याची स्थिती असताना इतक्या आक्रमकतेनं मांडणीची काही गरज आहे का?’’ आपलं सहज. जे.पीं.ची शांत, सुलभ, मृदु वाणी झिरपत काना-मेंदूवाटे आमच्या हृदयात शिरायची सवय. आमचा मित्र म्हणाला, “बैठकीच्या अंतिम चरणात प्रश्नोत्तरं असतात. त्यात हा प्रश्न निश्चित विचारशील.’’ मी घाबरून त्याला जागीच म्हणालो, “आपल्याला नाही विचारायचा प्रश्न-ग्रिश्न. आपलं तुझ्याचपुरतं. फालतूपणा करू नकोस. माझा काही प्रश्न नाही.’’
खोड काढली नाही, तो संघर्षवाहिनीचा मित्रच कसला! ऐन प्रश्नोत्तराच्या तासात, माझ्या मित्रानं, माझा प्रश्न असल्याचं नेत्यांच्या लक्षात आणून दिलं. मी अधिक दबा धरून बसलेला. त्यांनी प्रश्न विचारणारा तरुण दबून बसलेला पाहून, तरुण प्रश्न विचारतो याची मोठ्या आवाजात स्तुती केली. उभं केलं. बोलतं केलं. आम्ही प्रश्न मांडला. “आक्रमक वक्तव्याची खरंच गरज आहे का?’’ त्यावर ते गरजले, “तरुण मित्रा, आपण ज्या लोकांसाठी काम करतो, तो नागावला आहे. पार झोपी गेला आहे. त्याला जागं करायचं असेल, तर जानदार आवाजातच त्याला जागृत केलं पाहिजे.’’ त्यांच्या या गरजण्यानं आम्ही हादरलो. ‘हो’ म्हणून पटकन खाली बसलो. बहुआयामी आंबेडकरी विचारांची नामी माणसं जवळून बघता आली, निरखता आली, अनुभवता आली.
नामांतर आंदोलनाच्या निमित्तानं, आंबेडकरी विचारांच्या कविमित्राचा, कवितांचा अत्यंत जवळून संबंध आला. अस्ताव्यस्त दिसणारे कितीतरी सामान्य कार्यकर्ते, काय प्रतिभेचे होते, ते गिणतीतच नाही. या आंबेडकरी साहित्याला कुणी दलित, परिवर्तनवादी, पुरोगामी अशी वेगवेगळी संबोधनं वापरायचं; पण या साहित्यानं आमच्या मनावर भारी प्रभाव टाकला. नेत्यांच्या तुलनेत कार्यकर्ता जे जगत होता, त्या जगण्यातून कथा, कविता, साहित्य निर्माण व्हायचं. त्याच्या जाणिवा, अनुभूती लाजबाब होत्या. त्यांची प्रतिभा, प्रतिमा, रूपके वाचून रसिक मनाचा, संवेदनक्षम मनाचा माणूस बधिर होऊन जायचा, आक्रसून जायचा. इतक्या भयावह अनुभूती त्यातून व्यक्त व्हायच्या.
भर कवी संमेलनात, ‘आपली कविता वास्तव परिस्थितीवर आधारित आहे’ अशी हमी देऊन एक कविमित्र कविता सादर करायला उभा ठाकला. या कवितेचा प्रत्यक्ष जगण्याशी सबंध आहे, असं स्पष्ट व्यक्त करत त्याने कविता सादर केली.
मानवी मनाला लाजेनं माना खाली घातल्याशिवाय या कवितेला दाद दिल्यासारखं होत नव्हतं, अशी ही वेदनाशील कविता होती.
मीच माया मायची भाड खातो राजा
मीच माया मायची भाड खातो
दलाल मामा येते, माह्या हातात भातक्याची पुडी देते
माया मायले पोत्याआड नेते
मीच माया मायची भाड खातो राजा…
अशा कविता ऐकल्या, की मन सुन्न होऊन जायचं. वेदनेच्या व जगण्याच्या खोलीचा अंतर्दाह मनाला, सर्वांगाला, पेशीपेशीला चाटून, ओरखडून, खरडून जायचा. या साहित्यानं आत खोलवर परिणाम केला होता. न अनुभवलेल्या अनेक जाणिवांचा जवळून परिचय करून घेण्याची नामी संधी होती. एकाएकाचं आगळं वेगळेपण भारावून टाकणारं होतं. आमच्या एकाग्रतेत, ग्रहणक्षमतेत वाढ होत होती.
जे.पीं.च्या आंदोलनात फक्त महाविद्यालयांचा, विद्यार्थ्यांचा संबंध आला. समग्र क्रांतीचं गीत पहाडी आवाजात गाणं हा छंद राहिला. तेवढाच आपला कवितांचा परिचय. मात्र, कवितांमध्ये अनेक प्रश्न दडलेले असतात. प्रचंड वेदनांनी पोखरलेलं जगणं कवितेत असतं, हे प्रत्यक्ष पहिल्यांदा अनुभवत होतो. कविता ह्या कल्पनाविलास असतात. कवीच्या कल्पनेतून कविता, काव्य जन्माला येते, असं अज्ञानी मनाला वाटायचं. पण इथं कवितेमधील, काव्यामधील प्रत्यक्ष वेदना जगणारे कवी असायचे. कविता जगणारा कवी प्रत्यक्ष पाहिला, ऐकला, की त्या काव्याची खोली अधिकच कळायची.
अशीच एकदा आरक्षणाविषयीची मोडकीतोडकी भूमिका मांडून, आंबेडकर विचारपीठावरून खाली उतरलो. लगेच एक कविमित्र मला सभेच्या बाजूला घेऊन गेला. म्हणाला, “आपली माणसं नोकरीत गेली पाहिजेत हे अगदी खरं आहे, पण ज्या गरीब, दुर्बल कुटुंबातल्या शिकलेल्यांनी आरक्षणाचा फायदा घेऊन, अव्वल-प्रथम दर्जाच्या नोकरीत गेल्यावर त्या परिवारातील मोठ्या मुलाकडून आलेले अनुभव मन पिळवटून टाकणारे आहेत.’’ तो आपल्या कवितेतून व्यक्त व्हायचा तेव्हा अंगावर शहारे यायचे.
एका दीनदुबळ्या परिवारातील कर्ताधर्ता मुलगा. कुटुंबाचा अत्यंत कष्टाचा पैसा पदरमोड करून शिकला. आरक्षणाचा फायदा झाला. चांगल्या नोकरीत लागला. त्या दुर्बल, दरिद्री कुटुंबातील कष्टानं थकलेली माय, आपल्या शिकेल-सवरेल, नोकरीत लागलेल्या पोटच्या लेकराला, आपल्या शाळेत जाणार्या मुलीला पत्र लिहायला सांगते. त्याचा काव्यमजकूर असा – ती म्हणते,
काहीच नको लिवायला
लिवलं म्हणजेच कळते, असं कुठं हाय त्याला
सारखं सारखं काय लिवायचं तरी,
घरात दाण्याचा कण न्हाय, भागलणीचा अजून पत्ता नाय
त्यास्नी तर आता कामबी निभत न्हाय, चिंगी बाळंतपणाला आली हाय
आनशीला आजुम पाटीपुस्तक न्हाय, बजरंग्याची हागवन थांबली न्हाय
पाऊस डोया उघडाया तयार न्हाय,
सारखं सारखं काय लिवायचं त्याला? काय माहीत न्हाय त्याला?
त्याच्या परीस असं लिहा, म्हणावं,
हिकडं समदी खुशालच हाईत म्हणायची, पण आठवण येतीया सारखी सारखी
दोन तीनदा तू सपनात बी आलास, तुला आमची आठवण येती का?
न्हायतर नुस्ताच पत्ता लिहून कोरंच टाकत जावा पत्र
त्या चांगदेवानं नव्हतं का टाकलं?
आपुनबी तसंच करावं, काय वाचायचं ते वाच म्हणावं
तू माप शानासुरता हाईस, शिकला हाईस
आमच्यागत अडाणी न्हाईस…
कवितेचा प्रत्येक शब्द आपल्या आरक्षणविषयक भूमिकेच्या विचारांना टोचण्या मारत जात होता. ही खरी आंबेडकरी साहित्यातली जाणिवांची समृद्धी होती. आमच्या बथ्थड मेंदूत, मनात ह्या संवेदनक्षम शब्दांनी सुंदर, जिव्हाळ्याचं, जाणिवेचं घरटं केलं हे निश्चित.
मी दहा वर्षांचा असेन. आरक्षणविषयीच्या यशवंतबाबानं घेतलेल्या भूमिकेची प्रकर्षानं आठवण झाली. माझा मोठा भाऊ कृष्णा याला वैद्यकीय शिक्षणाला पाठवायचं होतं. अॅड. दादासाहेब मुन्शी, अॅड. हरिभाऊ श्रीधर लाखे यांचा सल्ला घ्यायला गेले असता, “तुझ्या कृष्णाला आरक्षण आहे. कमी गुणांमध्येसुद्धा वैद्यकीय प्रवेश होऊ शकते.’’ त्यावेळी त्यांचेकडे त्यांच्या नात्यातील वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणारा मुलगा हजर होता. त्याला सल्ला देताना मात्र, “तुला खुल्या गुणांमध्ये स्पर्धेत राहावं लागेल.’’ त्यावर यशवंतबाबांनी दादासाहेबांना विचारणा केली होती, “कृष्णा खुल्या विद्यार्थ्यांत बौद्धिक स्पर्धा करू शकते काय?’’ त्यावर मुन्शी काका म्हणाले होते, “अफकोर्स! कृष्णा खुल्या स्पर्धेमधूनसुद्धा त्याचा प्रवेश निश्चित करू शकतो.’’ त्यावेळी यशवंतबाबांनी कृष्णाभाऊला शिस्तीत उभं करून, कडक ताकीद दिली होती. ते म्हणाले, “तुझ्या यशवंतबापाची ताकद आहे. तुला दोन शिकवण्या लावून, बौद्धिक सक्षम बनवायची. तुला वैद्यकीय प्रवेशाकरता आरक्षणाच्या कुबड्यांची आवश्यकता पडता कामा नये. ह्या सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या अपंग विद्यार्थ्यांसाठीच्या आरक्षण कुबड्या आहेत. तुला त्या वापरता येणार नाहीत. तुला जर या आरक्षण कुबड्यांची गरज भासली, तर तुला ह्या कुबड्या घेऊन वैद्यकीय शिक्षण घेऊ देणार नाही. तुला खुल्या गुणांच्या स्पर्धेतच राहावं लागेल. असं जर तू केलं, तर तुझ्या बौद्धिक क्षमतेमुळे, तुझ्या रिक्त झालेल्या वैद्यकीय जागेवर, बाबासाहेबांचा दुसरा दुबळा मुलगा लागेल. ह्या जाणिवेनं अभ्यास कर आणि यशस्वी हो!’’ प्रत्यक्षात पण असेच घडले, की कृष्णाभाऊ खुल्या वर्गात पास झाला होता. हा एकप्रकारे कुटुंबासाठी बौद्धिक साक्षात्कारच होता.
ही यशवंतबाबाची आरक्षणविषयक भूमिकेची, संवेदनेची करुण खोली होती. सोबतच नीतितत्त्वाची पेरणीसुद्धा केली. आमचा कृष्णाभाऊ बालरोग विशेषज्ञ झाल्यावरही त्यांनी वैद्यकीय बाजार मांडला नाही. वैद्यकीय शपथेप्रमाणे जगण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्यात कसूर होऊ दिली नाही. मेरिट यादीवर लगेच सरकारी वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे रुजू झाला. औरंगाबाद, अंबाजोगाई मेडिकल कॉलेज, असा प्रवास करत डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय, अमरावतीला डीन म्हणून आदर्श कारकीर्द गाजवली. याच महाविद्यालयामध्ये रुग्णखोलीत आमच्या सरस्वतीमायनं शेवटचा श्वास सोडला. तेव्हा आम्ही दोघेच भाऊ रुग्णालयात होतो. कृष्णाभाऊ डीन असताना, वैद्यकीय महाविद्यालयाच्या शेकडो गाड्या अधिकारात असताना, त्यांनी आईचा मृतदेह गावी नेण्याकरता रडल्या तोंडानं, भाड्यानं गाडी आणण्यासाठी शहरात पाठवलं होतं.
ही खरी यशवंतबापानं केलेली नीतिमत्तेची, नीतिशास्त्राची पेरणी होती. ती आमच्यात उगवली. बहरली.