आपल्या मतांना, विचारांना अनुकूल असलेले लोक शोधून त्यांना आपल्या आवाहनाचे लक्ष्य बनवणे आणि त्यायोगे
समाजमनात अपेक्षित परिणाम घडवून आणणे, हे आहे प्रोपगंडाचे एक तंत्र. अशा विविध तंत्राचा अवलंब करत
प्रोपगंडाकार हवं ते घडवून आणतात. अशी प्रोपगंडाची नेमकी तंत्रे कोणती? ती कोणी, कधी शोधली, त्याचा वापर कोणी,
कुठे, कशाकरता केला आणि त्यात सामान्य लोक कसे अडकत गेले? याची ओघवती माहिती देणारं, वाचकांची झोप
उडवणारं रवि आमले यांचं प्रोपगंडा हे दुसरं पुस्तक. त्यांच्या ‘रॉ-भारतीय गुप्तचरसंस्थेची गूढगाथा’ या पहिल्या पुस्तकाला वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला. मनोविकास प्रकाशनातर्फे नुकतंच प्रकाशित करण्यात आलेलं प्रोपगंडा हे पुस्तकही
वाचकांना आकर्षित करत आहे. आजारांची कशी विक्री होते आणि सामान्य लोक त्याचे कसे बळी ठरतात याची झलक
दाखवणारं एक प्रकरण… खास कोरोनाच्या पार्श्वभूमीवर…
आजारविक्रीचा बाजार
काहीच करावेसे वाटत नाही. कंटाळा येतो कामाचा. सतत आळसावल्यासारखे वाटते. होते
असे अनेकदा. पण हे केवळ आपल्याबाबतच घडते का? तो आपला दोष असतो का?
नाही. हा एक शारिरीक आजार आहे आणि तो औषधोपचाराने बरा होऊ शकतो. या
आजाराचे नाव आहे ‘मोटिव्हेशनल डेफिशियन्सी डिसऑर्डर’ (एमओडिओडी). आजवर
अतिरेकी आळस हा एक आजार आहे हेच कोणाच्या गावी नव्हते. त्यामुळे त्या व्यक्तीवर
उगाच टीका केली जायची. अनेकदा अशा व्यक्तींना सामाजिक घृणेचा सामना करावा
लागायचा. परंतु ऑस्ट्रेलियातील न्यूकॅसल विद्यापीठातील न्यूरोसायन्टिस्ट लेथ अरगॉस
आणि त्यांच्या पथकाने या आजाराचा शोध लावला. त्यांच्या मते त्याला वैद्यकीय आधार
असून, तो प्रसंगी प्राणघातकही ठरू शकतो. कारण त्यात प्रसंगी रुग्णाची श्वास घेण्याची
प्रेरणाच कमी होत जाते.
ऑस्ट्रेलियातील आघाडीचे संशोधक, वैद्यकीय पत्रकार आणि लेखक रे मॉयनिहान यांनी
‘ब्रिटिश मेडिकल जर्नल’ (बीएमजे) या वैद्यकीय क्षेत्रातील सुप्रतिष्ठित आणि जगातील एका
सर्वांत जुन्या अशा साप्ताहिकामध्ये एप्रिल २००६ मध्ये याबाबतचा लेख प्रसिद्ध केला.
त्यानुसार या आजारावर ‘हेल्थटेक’ या ऑस्ट्रेलियन जैवतंत्रज्ञान कंपनीने ‘इंडोलेबँट’ या
औषधाचाही शोध लावला आहे. प्रो. अरगॉस हे या औषधकंपनीचे सल्लागार असून, हे
औषध एमओडिओडीवर प्रभावशाली असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ‘एक व्यक्ती जी
आपला सोफाही सोडत नव्हती, ती या औषधामुळे आता सिडनेमध्ये गुंतवणूक सल्लागार
म्हणून चांगले काम करीत आहे,’ असे प्रो. अरगॉस यांनी सांगितल्याचे या लेखात म्हटले
आहे.
या आजाराच्या शोधाने त्यावेळी वैद्यकीय विश्वातच नव्हे, तर सर्वसामान्यांतही
मोठीच खळबळ माजली. काही वृत्तपत्रांनी त्याविषयीच्या बातम्याही प्रसिद्ध केल्या. ते
स्वाभाविकच होते. अखेर आळस हा शारिरीक आजार असून, तो औषधाने बरा होऊ शकतो,
हे सारेच सनसनाटी होते. नक्कीच ते सनसनाटी होते. पण ते खरे होते का?
हा लेख, तो आजार, ते औषध, त्याचे संशोधक… सारेच बनावट होते. ‘एप्रिल फूल’
निमित्ताने केलेला तो विनोद होता. पण त्याचा हेतू लोकांना मूर्ख बनविणे हा नव्हता, तर
लोक कसे मूर्ख बनतात हे दाखवून देणे हा होता. आजाराचे भय पसरवून सर्वसामान्य
लोकांना कसे बनविले जाते, त्यांच्या पैशांवर कसा डल्ला मारला जातो, हे दाखवून
देण्यासाठी ‘ब्रिटिश मेडिकल जर्नल’ने तो लेख प्रसिद्ध केला होता. हे भय पसरविणा-यांसाठी
१९९२मध्ये पहिल्यांदा वैद्यकीय आणि विज्ञान लेखिका लीन पायर यांनी एक खास शब्द
वापरला होता – ‘डिसिज-माँगर’. आजारभयाचे सौदागर. त्यांत समावेश होता शक्तीशाली
औषध कंपन्यांचा, त्यांनी बाळगलेल्या वैद्यकीय तज्ज्ञांचा, पोसलेल्या डॉक्टरांचा आणि
आरोग्यविमा कंपन्यांचा. ते काय करीत असत? लीन पायर त्यांच्या ‘डिसिज माँगर्स : हाऊ
डॉक्टर्स, ड्रग कंपनीज अँड इन्शुरन्स आर मेकिंग यू फील सिक’ या पुस्तकात सांगतात, की
‘ठणठणीत असलेल्या लोकांना पटवून द्यायचे की तुम्ही आजारी आहात आणि जरा आजारी
असलेल्या लोकांना पटवून द्यायचे की तुम्ही अतिशय आजारी आहात’ हा त्यांचा उद्योग.
त्यासाठी भय या भावनेचा पद्धतशीर उपयोग केला जातो. ही भावना म्हणजे
प्रोपगंडाकारांचे आवडते खेळणे. वस्तुस्थितीबाबतचा अनुबोध बदलण्यासाठी तिचा पुरेपूर
उपयोग केला जातो. परंतु प्रोपगंडामध्ये नुसतेच भय दाखविले जात नाही, तर त्याबरोबर
तो धोका दूर करण्याचा उपायही सांगितला जातो. भय ज्यूंचे असेल, तर त्यांचे शिरकाण हा
उपाय संगितला जातो. भय ‘इस्लाम खतरे में’चे असेल, तर अधिक कट्टरतावादी व्हा हा
संदेश दिला जातो. भय आजाराचे असेल, तर त्यावरील उपाय औषध घेणे हा असतो. आता
प्रश्न असा पडेल, की आजारावर औषध घेणे यात चूक काय आहे? चूक हेच आहे, की
आजारावर औषध ही रीत तेथे पाळली जात नाही. तर औषधासाठी आजार उभा केला
जातो. त्या औषधाची गरज निर्माण केली जाते. औषध कंपन्यांची अब्जावधी डॉलरची
उलाढाल त्यामागे असते. आणि हे काही आजचे नाही.
याचे पहिले उदाहरण आपणांस सापडते ते १८७९ मध्ये. त्या साली ‘लिस्टेरिन’चा शोध
लागला. ते होते शस्त्रक्रियेदरम्यान वापरायचे जंतुनाशक – अँटीसेप्टिक. विख्यात
शल्यकर्मविशारद जोसेफ लिस्टर यांनी पहिल्यांदा जंतुविरहित शल्यक्रिया पद्धतीचा वापर
केला. त्यांच्या सन्मानार्थ डॉ. जोसेफ लॉरेन्स आणि जॉर्डन डब्लू. लॅंबर्ट या संशोधकांनी
आपल्या या उत्पादनाला लिस्टर यांचे नाव ठेवले. त्याचा खप वाढविण्यासाठी म्हणून नंतर
त्यांनी हे लिस्टरिन संहत स्वरूपात बाजारात आणले ते फरशा साफ करण्यासाठी. गनोरिया
या गुप्तरोगासाठीही त्याचा वापर करण्यात येऊ लागला. १८९५ साली त्यांनी दंतवैद्यांना
लिस्टरिनचे महत्त्व पटवून दिले. हळुहळू म्हणजे साधारणतः १९२० पर्यंत ते अमेरिकेत
‘माऊथवॉश’ म्हणून औषधदुकानांतून विकले जाऊ लागले. पण सर्वसामान्य लोकांना त्याची
फार काही आवश्यकता वाटत नव्हती. अशा माऊथवॉशची आज भारतातील ग्रामीण
जनतेला तरी कुठे आवश्यकता भासते? या परिस्थितीत लिस्टरिनची विक्री वाढवायची तर
त्याची गरज निर्माण करण्याची गरज होती. औषध तयार होतेच. रोग हवा होता. ‘लँबर्ट
फार्माकल कंपनी’ने त्याचा शोध लावला आणि वैद्यकीय विश्वात नव्या आजाराचा अवतार
झाला. त्याचे नाव – ‘हॅलिटोसिस’. हॅलिटस हा ग्रीक शब्द. त्याचा अर्थ श्वास, निःश्वास वा
वाफ. त्यापासून हे आजाराचे नाव तयार करण्यात आले होते. त्याचा अर्थ होता –
मुखदुर्गंधी.
आजार तर निश्चित झाला. आता त्याचा प्रचार करायचा होता. त्यासाठी भयनिर्मितीचे तंत्र
होतेच. मुखदुर्गंधीच्या रोगामुळे तुमचे भवितव्य धोक्यात येऊ शकते. प्रेमात, विवाहात,
कामाच्या ठिकाणी तुम्ही अपयशी ठरू शकता. ते टाळायचे असेल, हा हॅलिटोसिस आजार
बरा करायचा असेल, तर वापरा – लिस्टरिन. हे सांगण्यासाठी अमेरिकी जाहिरातदारांनी
छोट्या छोट्या ‘सोप-ऑपेरां’ची – नाटिकांची – निर्मिती केली. त्यातून लिस्टरिन न
वापरणा-या हॅलिटोसिसच्या रुग्णाला समाजात कसे लाजीरवाणे बनून राहावे लागते,
त्याला कसे अपयश येते हे दाखविण्यात येत असे. यामुळे पाहता पाहता अमेरिकेतील
हॅलिटोसिस रुग्णांची संख्या वाढली आणि त्याबरोबरच लिस्टरिनचा खपही.
साधेच तंत्र होते हे. एखाद्या साध्या, सामान्य विकाराला असे काही फुगवायचे की त्याचे
रुपांतर आजारात करून टाकायचे. असे किती तरी सामान्य विकार आज आजार म्हणून
गणले गेले आहेत. लिंगशैथिल्य, द्विध्रुवीय मनोविकार (म्हणजे बायपोलार डिसऑर्डर. यात
काय होते, तर व्यक्ती एखादी वाईट घटना घडली की उदास होते, निराश होते आणि कधी
चांगले काही घडले की आनंदी होते!), ‘अटेन्शन हायपरअक्टिव्ह डिसऑर्डर’ (म्हणजे काय,
तर लक्ष न लागणे!), सारखी लघवीला लागणे, टक्कल पडणे असे एरवीचे सामान्य, साध्या
उपायांनी बरे होणारे किंवा नाही बरे झाले तरी त्याने काहीही नुकसान न होणारे (उदा.
टक्कल पडणे) असे हे विकार. फार काय लाजाळूपणा याचीही आजारात गणना करून
टाकण्यात आली आहे. पाहण्यासारखे उदाहरण आहे हे.
‘स्मिथक्लाईन’ या तेव्हाच्या कंपनीने ‘पॅक्सिल’ नावाचे एक नैराश्यरोधी औषध बाजारात
आणले होते. कंपनीच्या म्हणण्यानुसार हे औषध होते ‘सोशल अँक्झायटी डिसऑर्डर’ या
आजारावरील. एरवी त्याला लाजाळूपणा म्हणून दुर्लक्षित करण्यात येत असे. या
लाजाळूपणाला कोणी आजार असे म्हटले असते, तर लोकांनी वेड्यात काढले असते त्याला.
अनेकांमध्ये हा लाजाळूपणा असतो. कोणाला सभेत बोलण्याची भीती वाटते, कोणाला
इतरांसमोर एकट्याने खाण्याची लाज वाटते… परंतु नाव बदलले आणि काम भागले. आता
आवश्यकता होती या आजाराविषयीच्या जनजागृतीची. ‘द गार्डियन’ने प्रसिद्ध केलेल्या
ब्रेन्डन कोएर्नर यांच्या एका लेखानुसार, त्याकरीता ‘स्मिथक्लाईन’ने नेमले ‘कोहन अँड
वुल्फी’ या पीआर कंपनीला. आणि मग १९९९ हे साल उजाडले ते या आजाराच्या
प्रचारधुमाळीने. ‘कल्पना करा तुम्हांला लोकांची अॅलर्जी आहे…’ असे वाक्य असलेली
एक जाहिरात अमेरिकेतील तमाम बसस्थानकांवर दिसू लागली. एका टेबलवर
इतरांपासून दूर, डोक्याला हात लावून चहाच्या कपाशी खेळत बसलेला एक
निराश तरुण.. असे छायाचित्र आणि सोबत जाहिरातीची ‘कॉपी’ – तुम्ही लाजता,
घाम फुटतो तुम्हांला, हात-पाय कापू लागतात, श्वास घेणेही जड जाते. हीच आहे
सोशल अँक्झायटी डिसऑर्डर. या जाहिरातीत कुठेही पॅक्सिल किंवा
स्मिथक्लाईनचा उल्लेखही नव्हता. मग कोणी केली होती ही जाहिरात? तर ती
केली होती सोशल अँक्झायची डिसऑर्डर कोअलिशन या संस्थेने. या आघाडीमध्ये
सहभागी होत्या अमेरिकन सायकियाट्रिक असोसिएशन, अँक्झायटी डिसऑर्डर
असोसिएशन ऑफ अमेरिका आणि फ्रीडम फ्रॉम फीअर या तीन स्वयंसेवी संस्था.
एडवर्ड बर्नेज यांची प्रोपगंडा तंत्रे कशी काळाच्या कसोटीवर उतरलेली आहेत,
याचेच हे एक उदाहरण. त्यांनी १९१२ मध्ये ‘डॅमेज्ड गुड्स’ या गुप्तरोगविषयक
नाटकाला होणारा विरोध मोडून काढण्यासाठी अशाच प्रकारे एक ‘फ्रंट ग्रुप’
स्थापन केला होता. बर्नेज यांचे तेच तंत्र आता हा आजार विकण्यासाठी
वापरण्यात येत होते. पॅक्सिलसाठीच्या या फ्रंट ग्रुपमागे ती जाहिरात संस्थाच
होती.
ही अशी जाहिरात औषध कंपन्यांसाठी फारच फायदेशीर ठरते. साधारणतः कोणत्याही
औषधाची जाहिरात करायची तर त्या औषधाच्या गुणांबरोबर त्याचे आडदोष सांगणे हे
अमेरिकेसह अनेक देशांत बंधनकारक आहे. पण जेव्हा तुम्ही एखाद्या आजाराबाबत
‘जनजागृती’ करता आणि त्यात औषधाचे नाव नसेल, तर मग हे आडदोष सांगण्याची
आवश्यकताच नसते. पण कोहन अँड वुल्फीने केवळ अशी भित्तीपत्रकेच तयार केली नाहीत.
त्यांनी माध्यमांना ‘बातम्या’ही दिल्या. या आजाराबाबत पत्रकारांना माहिती देण्यात आली.
किती टक्के लोकांना हा आजार आहे, त्याचे परिणाम काय असतात असे सारे वैद्यकीय
परिभाषेत आकडेवारीनिशी समजावून सांगण्यात येऊ लागले. माध्यमांना या आकडेवारीत
मोठा रस असतो. पण केवळ आकडेवारी ही रुक्ष ठरते. बातम्यांना हवा असतो मानवी
चेहरा. ‘ह्युमन इंटरेस्ट स्टोरीज’. या जाहिरात संस्थेने मग हा आजार झालेल्या रुग्णांच्या
मुलाखती आयोजित केल्या. पाहता पाहता लाजाळूपणा हा मोठा मानसिक आजार
असल्याचे लोकमानसात ठसले. औषधाचा खप वाढला.
या सर्व प्रोपगंडामध्ये आपल्या डॉक्टरांची भूमिका काय असते हा प्रश्न येथे उभा
राहील. पण त्याचे उत्तर सोपे आहे. डॉक्टरही या प्रोपगंडाचे एकतर बळी किंवा
सहयोगी असतात. त्यांच्यावरही या प्रोपगंडाचा मारा केला जात असतो. त्यांना
त्या-त्या आजाराबाबत ‘सुशिक्षित’ केले जात असते. साठच्या दशकात जेव्हा
‘क्लिनिकल डिप्रेशन’ हा आजार दुर्मीळ असल्याचे मानले जात होते, तेव्हा त्याचा
प्रचार करण्यासाठी एका बड्या औषध कंपनीने एक शक्कल लढविली होती.
त्यांनी फ्रँक आईड या लेखकाच्या ‘रेकग्नायझिंग द डिप्रेस्ड पेशन्ट’ या
पुस्तकाच्या ५० हजार प्रती विकत घेऊन त्या अमेरिकेतील अनेक कौटुंबीक
डॉक्टरांना फुकट पाठविल्या होत्या. डॉक्टरांना अशा प्रकारे ‘शहाणे’ करण्याचे
अनेक मार्ग आज वापरले जातात. परदेशांतील पर्यटन स्थळी वा पंचतारांकित
हॉटेले येथे आयोजित केल्या जाणा-या वैद्यकीय परिषदा हा त्यातला एक अत्यंत
सनदशीर मार्ग. पण आजाराबाबतचे भय निर्माण करायचे तर ते सामान्यांच्या
मनात निर्माण करणे फायदेशीर आणि म्हणून आवश्यक असते. त्यासाठी
प्रोपगंडाची विविध तंत्रे कशी वापरली जातात हे पाहायचे असेल, तर ओसीडी या
‘ताज्या’ आजाराकडे पाहता येईल.
‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या संकेतस्थळावरील मनोरंजन विभागात १४ सप्टेंबर
२०१७ रोजी एक छायाचित्र-वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यानुसार हिंदी
चित्रपटसृष्टीतील अनेक तारे-तारका ओसीडी म्हणजे ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह
डिसऑर्डर या आजाराने ग्रस्त आहेत. ते कोणी लुंगेसुंगे कलाकार नाहीत. करिना
कपूर, दीपिका पदुकोन, विद्या बालन, फरहान अख्तर, अजय देवगन, सैफ अली
खान अशा अनेक बड्या कलाकारांचा त्यात समावेश आहे. काय आहे त्यांच्या
ओसीडीचे स्वरूप? त्या वृत्तानुसार दीपिका पदुकोन हिला वस्तू अस्ताव्यस्त
मांडलेल्या आवडत नाहीत. तीच गोष्ट फरहानची आणि प्रियांका चोप्राची.
प्रियांकाला भोजनाच्या टेबलवरील रुमाल आणि काटे-चमचे नीटच मांडलेले
लागतात. विद्या बालनला धुळीचा कणही सहन होत नाही. स्वच्छतेची
अतिआवड आहे तिला. प्रीती झिंटा हिला स्वच्छतागृहातला साधा डागही सहन
होत नाही. करिनाला व्यायाम आणि योगसाधना करून आपला देह सडपातळ
ठेवणे आवडते. सनी लिऑनीला सतत पाय धुण्याची सवय आहे, तर अजय
देवगणला हात. बोटांना कसला वास लागलेला सहन होत नाही त्याला. म्हणून
तो जेवणही चमच्याने करतो. सैफ अली खानला टॉयलेटमध्ये कितीही वेळ
बसण्याची सवय आहे. तर सलमान खान निरनिराळ्या प्रकारचे, आकाराचे साबण
गोळा करतो. ही सर्व ओसीडी या आजाराची उदाहरणे असल्याचे आपल्याला ही
बातमी सांगते. हे नीट वाचल्यावर आपल्या लक्षात येते की ओसीडी म्हणजे
दुसरे-तिसरे काहीही नसून आपण ज्याला मंत्रचळ म्हणतो तो प्रकार आहे.
अनेकांना असा मंत्रचळ असतो. काहींच्या बाबतीत तो अतिरेकाच्या थराला गेलेला
असतो. परंतु आता ज्या प्रकारे ओसीडीबाबत ‘जनजागृती’ करण्यात येत आहे,
त्याची जी उदाहरणे आपल्यासमोर मांडण्यात येत आहेत, त्यावरून या आजाराची
व्याप्ती वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे हे स्पष्टच दिसते. हे आपल्याकडेच घडते
आहे असे नाही. कलाकारांतील ओसीडीची उदाहरणे आपल्यासमोर येण्याचे लोण
हॉलिवूडमधून पसरले आहे हे लक्षात घेतले पाहिजे. अचानक तेथील काही
कलाकार माध्यमांना मुलाखत देऊ लागले, की होय, मलाही ओसीडी आहे.
या आजाराबाबतची ‘विकिपिडिया’तील सर्वांत जुनी नोंद आहे १४ डिसेंबर
२००१ची. परंतु गेल्या एक-दोन वर्षांत अचानक ओसीडीबाबतच्या बातम्या, लेख,
भित्तीपत्रके, चित्रफिती आपल्याभोवती पिंगा घालू लागल्या. ‘ग्रेज
अनाटॉमी’सारख्या लोकप्रिय मालिकेतील डॉ. मिरांडा बेली या पात्राला ओसीडी
असल्याचे दिसू लागले. सीडीबाबतच्या जनजागृती सप्ताहांचे आयोजन होऊ
लागले. अशा या सध्या चर्चेत असलेल्या आजारावरील औषध काय? तर
नैराश्यविरोधी औषधांच्या प्रकारातले. आणि त्यात कोणाचा समावेश होतो?
‘इंटरनॅशनल ओसीडी फाऊंडेशन’ या संस्थेच्या संकेतस्थळानुसार ओसीडीवरील
प्रभावशाली औषधांच्या यादीत समावेश आहे – प्रोझॅक, पॅक्सिल अशा काही
औषधांचा. अशी अनेक उदाहरणे आहेत.
या सगळ्यांत वापरण्यात आलेले तंत्र मात्र एकसमानच आहे. पहिल्यांदा
छोट्याशा विकाराला आजाराचे स्वरूप द्यायचे. तो आजार व्यापक आहे हे
विविध आकडेवारीतून, तज्ज्ञांच्या लेखांतून, भाषणांतून आणि जाहिरातींतून
ठसवायचे. त्यासाठी प्रोपगंडाची ‘फ्रंट ग्रुप’, ‘टेस्टिमोनियल’, ‘ग्लिटरिंग
जनरॅलिटी’, ‘प्लेन फोक्स’ अशी विविध तंत्रे वापरायची. त्यांचे लक्ष्य जसे
वैद्यकीय क्षेत्रातील मंडळी, तसेच सामान्य नागरिक. त्यांना तो आजार विकला
की संपले. औषधे खपणारच त्यावरची. अशा प्रकारे डोळे कोरडे पडणे येथपासून
सतत पाय हलवावासा वाटणे येथपर्यंतच्या गोष्टींना आजार म्हणून आपण मान्य
केलेले आहे. आता थंडीच्या दिवसांत, वातानुकुलीत खोलीमध्ये, मोटारसायकल
चालवताना किंवा फार काळ संगणकाच्या पडद्यासमोर काम केल्यानंतर डोळे
कोरडे पडणे हे स्वाभाविकच असते. काही व्यक्तींना खरोखरच अश्रुपिंडाच्या
विकारामुळे तसा त्रास होऊ शकतो हे खरे. परंतु सामान्यतः हा काही आजार
नाही. पण त्याची तशी विक्री करण्यात आली आहे. आज डोळ्यांना ‘ल्युब्रिकेट’
करणा-या ‘आय ड्रॉप’चा खप काही कोटींच्या घरात आहे. एरवी सामान्य, घरगुती
उपायांनी बरे होणारे डोळे, बरे करण्यासाठी लोक त्यावरची औषधे वापरू लागले
आहेत. कारण – आजारविक्रीचा प्रोपगंडा. तो इतका प्रभावी ठरलेला आहे, की
त्या आय ड्रॉपच्या आडदोषांकडे दुर्लक्ष करून लोक ते आपल्या डोळ्यांत घालत
आहेत.
प्रोपगंडा हा त्या ‘आयड्रॉप’ सारखाच…