# पद्म पुरस्कार नामांकन, शिफारशी दाखल करण्यासाठी 15 सप्टेंबरपर्यंत मुदत.

खालील लिंक वर क्लिक करून ऑनलाईन दाखल करण्याचे आवाहन

नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिन, 2021 निमित्त जाहीर केल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांसाठी ऑनलाईन नामांकने / शिफारसी पाठवण्याची प्रक्रिया 1 मे 2020 पासून सुरू झाली आहे.  पद्म पुरस्कारासाठी नामांकनपत्रे पाठवण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2020 आहे. पद्म पुरस्कारांसाठी नामांकने  / शिफारसी केवळ https://padmaawards.gov.in या पद्म पुरस्कार पोर्टलवर ऑनलाइन स्वीकारल्या जातील. पोर्टलवर आतापर्यंत 8,035 नोंदणी करण्यात आल्या असून त्यापैकी 6,361 अर्ज / शिफारशीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

पद्म पुरस्कार सर्व क्षेत्र/शाखांमध्ये उल्लेखनीय कार्य आणि असाधारण कामगिरीसाठी दिला जातो. यासाठी वंश, जाती, व्यवसाय, पद किंवा लिंग यात कुठलाही भेदभाव नसून सर्व व्यक्ती पात्र आहेत. डॉक्टर्स आणि वैज्ञानिक वगळता सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये काम करणारे लोक पद्म पुरस्कारांसाठी पात्र नाहीत.

केंद्रीय मंत्रालय/विभाग, राज्य/केंद्र शासित प्रदेश, भारतरत्न आणि  पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित व्यक्ती आणि सर्वोत्कृष्टता संस्थांना विनंती करण्यात येत आहे की, अशा प्रतिभावान व्यक्तींची निवड करण्याचा प्रयत्न करा ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली असून त्याचा उचित गौरव होणे आवश्यक आहे.  तसेच महिला, समाजातील दुर्बल घटक, अनुसूचित जाती/जमाती,  दिव्यांग व्यक्ती आणि समाजाची निःस्वार्थ सेवा करणाऱ्या  प्रतिभावान व्यक्ती निवडण्याकडे विशेष लक्ष देण्याची विनंती करण्यात येत आहे.

सर्व नागरिक देखील स्वतःच्या नामांकनासह नामांकन/ शिफारस करू शकतात. या प्रक्रियेत संकेतस्थळावर दिलेल्या प्रारूपानुसार माहिती आणि तपशील द्यायचा आहे. त्याचबरोबर शिफारस करण्यात आलेल्या व्यक्तीची विशिष्ट कामगिरी /सेवा याबाबत जास्तीत जास्त  800 शब्दात विवरण द्यायचे आहे.

यासंबंधी अधिक तपशील गृह मंत्रालयाचे संकेतस्थळ  www.mha.gov.in 
वर  ‘अवॉर्ड्स अँड मेडल्स’ शीर्षकात दिले आहेत. या पुरस्कारासंबंधी नियमांची माहिती
https://padmaawards.gov.in/AboutAwards.aspx .
वर उपलब्ध आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *