सामान्य माणसं कधीकधी खूप अशक्यप्राय वाटणारी असामान्य स्वप्न बघतात आणि बरेचदा त्या स्वप्नापेक्षा जास्त काही त्यांच्या वाट्याला येतं. हे अपघातानं होत नाही तर त्यामागे त्या माणसाची दुर्दम्य अशी कर्तव्यनिष्ठा, व्यासंग आणि चिकाटी असते. राजकारणात नव्याने आलेला एक तरुण प्रथमच राष्ट्रपती भवनात गेला. तिथले देखणे घोडे पाहून तो हरखला, घरी येताच त्याने आपल्या बहिणीला त्या घोड्याचं वर्णन एकवलं. शेवटी तो तरुण म्हणाला, की पुढचा जन्म मला राष्ट्रपती भवनातील घोड्याचा मिळावा एवढी त्या घोड्याची बडदास्त ठेवली जाते. पुढे काही वर्षांनी तो तरुण देशाचा राष्ट्रपती झाला. तो तरुण म्हणजे माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणब मुखर्जी.
भारतीय राजकारणाचे सुमारे साडेचार दशकांचे सक्रिय साक्षीदार, देशाच्या अर्थकारणावर स्वतःचा अमिट असा ठसा उमटविणारे अर्थतज्ज्ञ, राज्यशास्त्र, नीतिशास्त्र, अर्थशास्त्र अशा विविध विषयांचा गाढा अभ्यास असणारे प्रकांड पंडित, अतिशय कुशाग्र बुद्धीचे राजकारणी आणि कुशल प्रशासक असे त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचे विविध पैलू आहेत. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारचे चाणक्य आणि तारणहार ही त्यांची राजकीय ओळख. जेंव्हा जेंव्हा काँग्रेस पक्ष अडचणीत सापडला तेंव्हा प्रणबदांनी आपला अनुभव, ज्ञान यांचा चपखल वापर करुन पक्षाला अडचणीतून बाहेर काढले. नियतीचा खेळ असा की, जेंव्हा काँग्रेसला अडचणींनी चहूबाजूंनी घेरले असताना प्रणबदांची एक्झिट झाली. या काळात काँग्रेसच्या धुरीणांना पदोपदी प्रणबदांची आठवण येत नसेल तरच नवल….
न होऊ शकलेले सर्वाधिक लायक पंतप्रधान असंही त्यांना म्हणता येईल. प्रणबदांचे वडील किंकर मुखोपाध्याय (मुखर्जी) हे स्वातंत्र्यचळवळीत अग्रेसर होते. ते १९५२ ते १९६४ या काळात पश्चिम बंगालच्या विधान परिषदेचे सदस्य म्हणून देखीलही निवडून आले होते. प्रणबदांचे वडील जरी राजकारणात होते तरी त्यांचा राजकारणातील प्रवेश हा तसा सोपा नव्हता. राज्यशास्त्र आणि इतिहास या दोन विषयांत बीए केल्यानंतर प्रणबदांनी कायद्याची पदवी घेतली आणि त्यानंतर सरळ त्यांनी डाक आणि तार विभागात सिनियर क्लर्कची नोकरी पत्करली. पण त्यात मन रमेना म्हणून त्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारला. पुढे काही दिवस ते एका बंगाली वर्तमानपत्राचे पत्रकार म्हणूनही काम पाहू लागले. पण सन १९६९ साली त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. व्हि. के. कृष्णमेनन यांच्या प्रचाराची धुरा सांभाळत असताना ते इंदिरा गांधी यांच्या नजरेत भरले. या माणसाच्या मेंदूची बंगाली जादू इंदिरा गांधी यांनी पुरेपूर हेरली. त्यांनीच त्यांना राज्यसभेत आणलं, आपल्या निकटच्या वर्तुळात सामील केलं. इंदिरानिष्ठ अशी त्यांची ओळख पक्की होत गेली. त्यांना १९७३ साली केंद्रीय मंत्रिमंडळात काम करण्याचीही संधी मिळाली. पुढे आणिबाणी प्रकरणानंतर काँग्रेस सत्तेत आल्यावर १९८२ साली केंद्रात अर्थमंत्री झाले. या पदावर काम करताना त्यांनी आपल्या प्रतिभेची चुणूक दाखविली. जगभरात त्यांच्या कामाचे कौतुक झाले. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा हप्ता वेळेत चुकविण्याची बाब असो की डॉ. मनमोहनसिंग यांना रिझर्व बँकेच्या गव्हर्नपदी आणण्याचा निर्णय असो, त्यांच्या प्रत्येक निर्णयाचा देशाला फायदाच होत गेला. पण त्यांच्या आयुष्यातला बॅड पॅच अजून यायचा होता. तो इंदिरा गांधी यांच्या निर्घृण हत्येनंतर आला. इंदिरा गांधीनंतर काँग्रेसकडून त्यांचेच नाव पंतप्रधान म्हणून जाहीर होईल अशी त्यांना अपेक्षा होती. पण पक्षाने राजीव गांधी यांचे नाव पुढे केले त्यामुळे संतापून त्यांनी काँग्रेसशी फारकत घेतली असं सांगितलं जातं. परंतु कदाचित यात तेवढं तथ्य नसावं. राजकारण जेवढं दिसतं त्यापेक्षा ते अधिक आत असतं, पाण्यावर तरंगणाऱ्या हिमनगाप्रमाणे.
माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बलराम जाखड यांनी सांगितलेली हकीकत वेगळी आहे. इंदिराजींची हत्या झाली तेंव्हा राजीव गांधी तातडीने दिल्लीकडे निघाले. त्या विमानात प्रणब मुखर्जी, बलराम जाखड, राजीव गांधी आणि आणखी एक काँग्रेसचे बडे नेते होते. राजीव दुःखात बुडालेले… डोळ्यावर काळा चष्मा लावून आपले अश्रू लपवत बाहेरच्या ढगाकडे पाहत बसले होते. त्यावेळी बलराम जाखड उठून त्या काँग्रेसी नेत्याकडे गेले. त्यांनी विचारले की, आता इंदिराजींच्या नंतर नव्या पंतप्रधानाचे नाव तातडीने घोषित करणे आवश्यक आहे. तुझं काय मत आहे. त्यावर तो नेता प्रणब मुखर्जी काय म्हणतात हे विचारु असे म्हणताच ते दोघेही त्यांच्याकडे गेले. प्रणबदांना जाखड यांनी हाच प्रश्न विचारताच एका क्षणाचाही विचार न करता त्यांनी राजीव गांधी हेच पुढचे पंतप्रधान असतील असे निःसंदिग्धपणे सांगितले. अर्थात रुढ थेअरीनुसार प्रणबदा राजीव गांधी यांच्या निवडीमुळे नाराज होऊन पक्षातून बाहेर पडले असंच मानलं जातं. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर पी. व्हि. नरसिंहराव यांच्या मंत्रीमंडळात मंत्री होऊन ते पुन्हा एकदा सत्तेच्या वर्तुळात परतले. राव यांच्या अस्तानंतर काँग्रेसची धुरा सोनिया गांधींकडे सोपविण्यात ज्या नेत्यांनी सिंहाचा वाटा उचलला त्यामध्ये प्रणब मुखर्जी देखील होते. राजकारणात अगदीच नवख्या असणाऱ्या सोनियांना प्रस्थापित करणारे प्रणबदाच होते. मोठ्या संघर्षानंतर २००४ साली काँग्रेस सत्तेत परतली. सोनिया गांधी यांनी पंतप्रधानपद स्वीकारण्यास नकार दिला. तेंव्हा अचानकपणे डॉ. मनमोहनसिंग यांचे नाव पुढे आले. प्रणबदांना पंतप्रधान पदाने दुसऱ्यांदा दिलेली ही हुलकावणी होती. पण तरीही प्रणबदांनी अतिशय सुज्ञपणे परिस्थितीचा सामना केला. कारण हा काँग्रेस पक्षाचा सामूहिक निर्णय होता. पुढे युपीए १ आणि युपीए २ या दोन्ही काळात प्रणबदा काँग्रेस पक्षाचे खऱ्या अर्थाने पॉवर हाऊस ठरले. सरकारपुढील संकटांचा सामना करण्यासाठी पुढे सरसावले म्हणूनच त्यांचा उल्लेख संकटमोचक असा करण्यात येत असे.
प्रतिभा पाटील यांच्यानंतर पुढचा राष्ट्रपती कोण अशी चर्चा सुरु झाल्यानंतर आपसूकच प्रणबदांचे नाव पुढे आले. या काळातला हा किस्सा निवडून येण्यासाठी आवश्यक मतांची जुळवाजुळव करण्यासाठी सगळ्यांची मनधरणी करणं आवश्यक होतं. प्रणबदा युपीएच्या सर्व घटक पक्षांच्या प्रमुखांना भेटून आले, अपवाद फक्त तृणमूल काँग्रेसच्या ममता दिदींचा. प्रणबदांनी आपला पाठींबा मागावा यासाठी त्या आग्रही होत्या. त्या अखेर हट्टाला पेटल्या आणि मुलायमसिंह यांच्या गोटात गेल्या. पण प्रणबदांनी आपल्याला फोन का केला नाही, किंवा आपली भेट का घेतली नाही याचे कोडे काही त्यांना उलगडेना. अखेर त्यांनी एका व्यक्तीच्या माध्यमातून फोनवरुनच प्रणबदांना संपर्क साधला आणि त्यांना जवळपास रागातच विचारले की, तुम्ही माझ्याकडे पाठींबा का मागितला नाही. तुम्ही एक फोन केला असता तरी मी तुम्हाला पाठींबा दिला असता. यावर प्रणबदांनी एकाच वाक्यात उत्तर दिलं आणि फोन ठेवून दिला, ते वाक्य होतं, ‘आपल्या मुलीला द्यायचं असतं तिच्याकडे मागायचं नसतं.’ त्या एका वाक्याने कमाल झाली. पुढच्याच क्षणाला ममता बॅनर्जी यांनी प्रणबदांना पाठींबा जाहीर केला….
राष्ट्रपती पदावर असताना प्रणबदांनी एक चांगला पायंडा पाडला; तो म्हणजे त्यांनी सरकार आणि राष्ट्रपती यांना एका सुत्रात बांधून ठेवलं. देशाचे राष्ट्रपती जेंव्हा अभिभाषण अथवा राष्ट्राला उद्देशून बोलतात तेंव्हा ते माझं सरकार असा उल्लेख करतात. घटनात्मकदृष्ट्या राष्ट्रपतीपद सर्वोच्च असलं तरी तरी पदाचे अधिकार खूपच मर्यादित असे असतात. राष्ट्रपती आपलं मत सरकारकडे नोंदवू शकतात पण ते सरकारवर बंधनकारक असतंच असं नाही. उलट मंत्रीमंडळ आणि संसद जे ठरवेल त्यास राष्ट्रपतींनी केवळ संमती देणं अपेक्षित असतं. क्वचित प्रसंगी राष्ट्रपती एखादे विधेयक पुनर्विचारार्थ संसदेकडे पाठवू शकतात. परंतु त्यानंतरही त्यांना ते मान्य करावंच लागतं. या परिस्थितीत राष्ट्रपती आणि सरकारमध्ये संघर्ष होऊ शकतो. तत्कालिन राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग आणि पंतप्रधान राजीव गांधी यांच्यात हाच संघर्ष उद्भवला होता. अर्थात अशा संघर्षांमुळे राष्ट्रपतीपदाच्या प्रतिष्ठेवर ओरखडे उमटतात.
दादांच्या कार्यकाळात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार आणि राष्ट्रपती भवन यांच्यात संघर्षाचे अनेक प्रसंग निर्माण होऊ शकले असते. खरेतर दादांना विद्यमान सरकारची कार्यपद्धती पसंत नव्हती. अनेक मुद्यांवरुन ते सरकारशी सहमत होतेच असे नव्हते. परंतु दादांनी हे वाद कधीच सार्वजनिक होऊ दिले नाही. ना त्यांची कधी माध्यमांत चर्चा झाली. विद्यमान सरकारने वारंवार अध्यादेश काढले. केंद्रीय विद्यापीठांच्या कुलगुरुंच्या नियुक्त्या केल्या, राज्यपालांच्या नियुक्त्या केल्या. प्रणबदा यावर नाराज होते. काश्मीरमध्ये एका व्यक्तीला जीपच्या बॉनेटला बांधून त्याची ढाल करुन लष्कराने मिरवलं, या घटनेमुळे दादा प्रचंड दुखावले होते. पण त्यांनी आपली नाराजी माध्यमात येऊ दिली नाही. त्यांनी ब्रिटनचं उदाहरण पुढे ठेवलं. ब्रिटनची महाराणी आणि तत्कालिन पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांच्यात अनेक मुद्यांवर टोकाचे मतभेद होते. परंतु हे मतभेद कधीच माध्यमांत आले नाहीत. दादांनी, आपल्या र्काकाळात हे तत्त्व कसोशीनं पाळलं. प्रणबदा जेंव्हा एखाद्या मुद्यांवर असहमत असायचे तेंव्हा ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राष्ट्रपती भवनात पाचारण करीत असत. तिथं अगदी एकांतात त्यांना ते आपली भूमिका समजावून सांगत. ही बैठक केवळ त्या दोघांमध्येच होत असे. त्यामुळे झालं काय तर, राष्ट्रपती आणि सरकारमध्ये सुसंवाद राहिला. जेंव्हा जेंव्हा दादांनी एखाद्या मुद्यावर असहमती दर्शवली तेंव्हा तेंव्हा पंतप्रधानांनीही त्यांच्या अनुभवाचा, वयाचा आणि पदाचा सन्मान राखत त्यांच्याकडून जेवढं होऊ शकतं तेवढं केलं. अर्थात पक्ष आणि पक्षाची विचारधारा यांच्या कक्षेत राहूनच त्यांनी दादांच्या सूचनांवर अंमलही केला. दोन्ही नेते विचारधारेचा विचार करता दोन विरुद्ध ध्रुवांवरचे परंतु तरीही त्यांच्यातील हे ट्युनिंग जबरदस्त होतं. एखादं विधेयक राष्ट्रपतींनी जरी पाठवलं तरी ते पुन्हा त्यांच्याकडे पाठविलं जाणार आणि त्यावर त्यांना सही करावीच लागणार त्यामुळे ते परत पाठवून तरी काय फायदा असं ते आपल्या वर्तुळातील लोकांजवळ नेहमी बोलून दाखवत. एखाद्या मुद्यावर जेंव्हा असहमती दर्शवायची असेल तेंव्हा ती व्यक्तीगत पातळीवर बोलून दर्शविली तर ते जास्त योग्य असं त्यांचं मत होतं.
राष्ट्रपतींना हिज एक्सलन्सी म्हणण्याची पद्धत त्यांनी मोडून काढली. त्यापेक्षा सिटिझन म्हणून घेणं त्यांनी पसंत केलं. या देशाचा एक नागरीक म्हणवून घेण्यातला मान-सन्मान हिज एक्सलन्सी पेक्षा जास्त मोठा आहे. हे त्यांनी अतिशय साध्या कृतीतून दाखवून दिलं. प्रत्येक राष्ट्रपतीने राष्ट्रपती भवनावर आपली एक वेगळी छाप सोडली आहे. दादांचा व्यासंग ’मोठा… ’फावल्या वेळात उत्तमोत्तम ग्रंथांचे वाचन करणे हे त्यांचे आवडते काम… राजकीय धकाधकीतून दूर राष्ट्रपती भवनात आल्यानंतर दादांनी आवडते काम हाती घेतले. त्यांनी स्वतःच्या संग्रहातील पुस्तकांची संख्या लक्षणीरित्या वाढविली. राष्ट्रपती भवनात त्यांनी एक उत्तम लायब्ररी केली आहे. त्यांच्या संग्रहात जगातील सर्वोत्तम पुस्तके आहेत. यामध्ये राज्यशास्त्र, अर्थशास्त्र आदी विषांवरील ग्रंथ तर आहेतच याशिवाय देशभरातील साहित्यिकांच्या सर्वोत्तम साहित्यकृतीही आहेत. राष्ट्रपतींसाठी सर्वोत्तम पुस्तकांचा शोध घेत राहणं हे राष्ट्रपती भवनातील स्टाफचेही आवडते काम झाले होते.
राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर प्रणबदा सामाजिक जीवनात फारसे सक्रीय नव्हते. त्यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्यासपीठावर जाण्याचा निर्णयही वादग्रस्त ठरला. पण संघाच्या व्यासपीठावर जाऊन त्यांनी धर्मनिरपेक्ष मूल्यांचाच ठामपणे पुरस्कार केला. संघाला चार शहाणपणाच्या गोष्टी सांगितल्या. आयुष्यभर ज्या मूल्यांचा पुरस्कार केला तीच मुल्ये त्यांनी संघाच्या व्यासपीठावर ठासून मांडली.
प्रणबदांनी आयुष्यभर आपल्या तत्वे, मूल्यांची पाठराखण केली. त्याच्याशी प्रतारणा केली नाही. अखेरच्या काळातील एकाकीपण देखील त्यांनी ग्रंथांच्या सान्निध्यात व्यक्त केले. त्याची कुठे तक्रार केली नाही की खंत व्यक्त केली. काँग्रेसच्या नव्या पिढीला वडीलकीच्या नात्याने मार्गदर्शन देखील केले. त्यांच्या रुपाने आज देशाच्या साडेचार दशकांच्या राजकीय इतिहासाचा अतिशय महत्वाचा साक्षीदार काळाच्या पडद्याआड गेला. ते बेशुद्धावस्थेत असतानाच गेले. काळ देखील त्यांच्याशी राज्यशास्त्र, नीतीशास्त्र आणि अर्थशास्त्राविषयक चर्चा करु त्याबाबत मौलिक सल्ला घेण्यासाठी उत्सुक असेल. प्रणबदांना भावपूर्ण श्रद्धांजली…
-गिरीश लता पंढरीनाथ, पुणे
लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.
मोबाईल: 9527799857
ईमेल: girishlatapandharinath@gmail.com