# साठेबाजी करणारांवर मोठी कारवाई; वाशीच्या मार्केटमध्ये २ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त.

 

संग्रहित छायाचित्र

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी करणाऱ्या आणि त्यांची चढ्या दराने विक्री करणाऱ्या व्यवसायिकांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. त्यानुसार राज्याचे वैधमापन शास्त्र व दक्षता विभागाने केलेल्या कारवाईत एपीएमसी मार्केट वाशी येथून २ कोटी रुपयांचा कडधान्यांचा साठा जप्त केला असून, राज्यातील ही सर्वात मोठी कारवाई आहे. राज्यात कुठे असे प्रकार होत असतील तर त्यांच्यावर देखील कठोर कारवाई करण्यात येणार आहे. यामध्ये सात वर्षाची कठोर शिक्षा सुद्धा होऊ शकते.

एपीएमसी मार्केटमध्ये करण्यात आलेल्या तपासणीअंतर्गत बाजार व गोदामांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत ताज अॅग्रो कमोडिटी प्रायव्हेट लिमिटेड टी टी सी इंडिया एरिया पावणे नवी मुंबई व वसवाल राधेशाम भंडारी टी टी सी इंडिया एरिया पावने नवी मुंबई या आयातदारांनी आयात केलेल्या आवेष्टित वस्तूवर नियमानुसार उद्घोषणा नमूद केलेल्या नसल्यामुळे वैधमापन शास्त्र अधिनियम २००९ च्या कलम
१८-१/३६-१व त्याअंतर्गत वैधमापन शास्त्र आवेष्टित नियम २०११ मधील नियम६-१,६-२ अंर्तगत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत एकूण दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ही कारवाई कोकण विभागाचे उपनियंत्रक वैधमापन शास्त्र डॉ.खारोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्याचे वैधमापन शास्त्र सहायक नियंत्रक सी.सा.कदम, निरीक्षक सु.रो कुटे, रा. गु. सपकाळ यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *