# स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयातील सहा परिचारीका, दोन कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह.

यापूर्वी तीन चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याने चिंता वाढली

अंबाजोगाई: येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झपाट्याने कोरोना वाढत असल्याचे चित्र आज सोमवारी आलेल्या अहवालने सिध्द केले आहे. या अहवालात वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत असलेल्या सहा परिचारीकांना आणि इतर दोन कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

वैद्यकीय महाविद्यालयात आजपर्यंत कोविड विभागात काम करणाऱ्या अनेक डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी अनेकजण बरे झाले असले तरी तीन चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे, ही अत्यंत चिंतेची बाब आहे. अंबाजोगाई वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयाची ओळख बीड जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यात एक उत्तम उपचार करणारे रुग्णालय अशी आहे. त्यामुळे या रुग्णालयात उपाचासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या खूप मोठी आहे. विशेषतः हे सर्व रुग्ण या वैद्यकीय महाविद्यालयात काम करणाऱ्या डॉक्टरांच्या टीमवर विश्वास ठेवून येत असतात. गेल्या चार महिन्यांपासून बीड जिल्ह्यासह शेजारील जिल्ह्यात कोविड १९ चे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत चालले असल्यामुळे या रुग्णालयात कोविड १९ वर उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या ही मोठी आहे.

वैद्यकीय महाविद्यालयात कोविड १९ च्या रुग्णांसाठी स्वतंत्र कोविड हाॅस्पिटल निर्माण करण्यात आले तेंव्हापासून या विभागात काम करणाऱ्या डॉक्टर कर्मचाऱ्यांना पुरेशा वैद्यकीय सोयी मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. कोविड १९ वार्डात काम करणाऱ्या चतुर्थश्रेणी कर्मचारी, परिचारीका आणि डॉक्टर्स यांना पीपीई कीट मिळत नसल्याच्या तक्रारी सुरुवातीपासूनच आहेत. कोविड वार्डात सेवा दिलेल्या रुग्णांना शासनाने निश्चित केलेल्या मार्गदर्शक सुचनाप्रमाणे त्यांना क्वारंटाइन होत्यासाठीची सवलत दिली जात नाही, अशाही तक्रारी आहेत. वाढती रुग्ण संख्या आणि अपुरा कर्मचारी वर्ग यामुळे हा गुंता वाढत चालला आहे.

आज ७ सप्टेंबर रोजीच्या अहवालात स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिचारीका वसतिगृहात राहणाऱ्या सहा परिचारीका आणि वैद्यकीय महाविद्यालय परिसरात राहणारे दोन कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह निघाले असल्याचे या आहवालातून दिसून येते. या परिचारीका वसतिगृहात राहणाऱ्या परिचारीकांनीही आणि त्यांच्या संघटनेनेही अलिकडेच प्रशासनाकडून पुरेशा वैद्यकीय सुविधा मिळत नसल्याची खंत व्यक्त केली होती. आज या परिचारीकांच्या नातेवाईकांनी तर त्यांना पुरेशा वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन न दिल्यामुळे त्या कोरोना पॉझिटिव्ह निघाल्या असल्याचा आरोप प्रशासनावर केला आहे.

स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिचारीका वसतिगृहात शेकडो परिचारीका रहात असतात. त्यांचे राहणे, त्यांचे जेवण, त्यांचे येणे-जाणे या एकाच इमारतीतून होत असल्यामुळे या सहा परिचारीकांचा संसर्ग इतर किती परिचारीकांना झाला असेल हे पहाणे आता वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाला आवश्यक बनले आहे. या सहा परिचारीकांचे आणि इतर दोन कर्मचाऱ्यांचे सहवासीत ट्रेस करणे, त्यांना क्वारंटाइन होण्याच्या सूचना देणे, त्यांना कांही दिवस रुग्णालयातील कोणत्याही विभागात कामावर न येवू देणे ही जोखीम वैद्यकीय प्रशासनाला घ्यावी लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *