मुंबई: शिवसेना व मुंबईशी पंगा घेणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावतच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाही. कंगनाच्या कार्यालयाला सील केल्यानंतर आता तिच्या ड्रग्स कनेक्शनची चौकशी होणार आहे. कंगनावर ड्रग्स घेत असल्याचा आरोप असून त्याची चौकशी मुंबई पोलीस करतील, असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.
कंगनाने मुंबई पोलिसांवर टीका करतानाच मुंबई मला पाकव्याप्त काश्मीर असल्यासारखी वाटत असल्याची मुक्ताफळे उधळली होती. ‘टाइम्स नाऊ’ने दिलेल्या वृत्तानुसार आता कंगनाच्या ड्रग्स कनेक्शनची चौकशी होणार आहे. अभिनेता शेखर सुमन यांचा मुलगा अध्ययन सुमन याने एक मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीचा आधार घेऊन कंगनाच्या ड्रग्स कनेक्शनची चौकशी होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. अध्ययन सुमनची एक मुलाखत व्हायरल झाली आहे. त्यात कंगनाने त्याला कोकेन घेण्याचा आग्रह केल्याचा दावा केला आहे. आपण हॅश ट्राय केलं होतं. पण ते आवडलं नव्हतं. त्यामुळेच आपण कोकेन घेण्यास नकार दिला होता. कोकेन घेण्यास नकार दिल्यामुळे कंगनाचे आणि माझे कडाक्याचे भांडणही झालं होतं, असंही अध्ययनने म्हटलं आहे. याबाबत ‘नवभारत टाइम्स’ने अध्ययनशी संवाद साधला. मात्र, या गोष्टीला अधिक महत्त्व न देण्याची विनंती त्याने ‘नवभारत टाइम्स’कडे केली. सकारात्मक दृष्टीकोण घेऊन मी पुढे जात आहे, असं अध्ययनने म्हटलं आहे. बॉलिवूडमध्ये हायप्रोफाइल पार्ट्यांमध्ये ड्रग्सचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. मात्र, अशा पार्ट्यांमधून आपण नेहमीच लांब राहिलो आहे, असं त्यांनी यापूर्वी कबूल केल्याचं ‘नवभारत टाइम्स’ने म्हटलं आहे.
कार्यालय बांधकामासंबंधी कागदपत्रे २४ तासात सादर करण्याचे आदेश:
दरम्यान, मुंबई महापालिकेने आज कंगनाचं कार्यालय सील केलं आहे. महापालिका अधिकाऱ्याच्या एका पथकाने काल कंगनाच्या कार्यालयाची पाहणी केली होती. त्यानंतर तिच्या कार्यालयाला आज नोटीस चिपकवण्यात आली असून तिला या कार्यालयाच्या बांधकामासंबंधी कागदपत्रे २४ तासात सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. २४ तासांत ही कागदपत्रे सादर न केल्यास कारवाई करण्याचा इशाराही तिला देण्यात आला आहे. त्यामुळे कंगनाची डोकेदुखी वाढली आहे.
पालिका अधिनियम ३५४(ए) अंतर्गत कंगना तिच्या घरातून ऑफिसचं कोणतंच काम करू शकत नाही. कंगनाने अनधिकृतपणे तिचं ऑफिस बांधल्याचं पालिकेच्या पाहणीत आढळून आलं आहे. कंगनाने ऑफिसात स्वतंत्रपणे पार्टिशन केलं आहे. बाल्कनी एरियाचा रुम म्हणून वापर केला असून हे अंतर्गत बदल ऑफिस नियमांचं उल्लंघन असल्याचं पालिकेने म्हटलं आहे. तसेच तळमजल्यावरील टॉयलेटचं ऑफिस केबिनमध्ये रुपांतर करण्यात आलं आहे. तळमजल्यावरच अनधिकृतपणे किचनचं स्टोअर रुममध्ये रुपांतर करण्यात आलं आहे. त्याच मजल्यावर अनधिकृतपणे पँट्रीही तयार करण्यात आल्याचं या नोटिशीत नमूद करण्यात आलं आहे.