राज्याच्या ९० टक्के भागात ‘यलो अलर्ट’; महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीपर्यंत कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम
पुणे: राज्यात शुक्रवार, ११ सप्टेंबर पासून पुन्हा एकदा मुसळधार पाऊस पडणार असून कोकण, मध्यमहाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात ११ ते १४ सप्टेंबर या कालावधित मुसळधार ते अतिमुसळधार असा पाऊस पडेल असा अंदाज हवामान शास्त्र विभागाने वर्तवला आहे. मान्सूनचे वारे गतिमान झाल्याने राज्यातील ९० टक्के भागास हवामान विभागाने गुरुवारी ‘यलो अलर्ट’ दिला आहे.
महाराष्ट्र किनारपट्टी ते केरळ किनारपट्टी पर्यंत कमी दाबाचा पट्टा तसेच अरबी समुद्रातील कर्नाटक किनारपट्टीवर चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. तसेच उत्तरप्रदेश ते विदर्भापर्यंत चक्रीय स्थिती निर्माण झाल्याने गुरुवारी रात्रीपासूनच राज्यात मान्सून सक्रिय होत असून वाऱ्याचा वेग ताशी ४५ ते ५५ किमी वेगाने वाढणार आहे.
हवामान विभागाने गुरुवारी राज्याच्या ९० टक्के भागात यलो अलर्ट दिला आहे. यात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, लातूरसह विदर्भातील भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे. दक्षिण कोकण, उत्तर कोकण, उत्तर मध्यमहाराष्ट्र, दक्षिण मध्यमहाराष्ट्र, मराठवाडा, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ या भागात मोठा पाऊस होईल असाही अंदाज व्यक्त केला आहे.