# अंबाजोगाईत आढळला दुर्मिळ पिवळ्या ठिपक्यांचा पट्टेरी कवड्या साप.

अंबाजोगाई: येथील नागझरी परिसरात सर्पमित्र लेफ्टनंट डॉ. राजकुमार थोरात व हेमंत धानोरकर यांना पिवळ्या ठिपक्यांचा पट्टेरी कवड्या (Yellow spotted wolf snake) हा बिनविषारी दुर्मिळ प्रजातीचा साप आढळून आला. या सापाचा शरिराचा काळा रंग व त्यावर पिवळे ठिपके व आडव्या पांढऱ्या रेषा अशा सुंदर स्वरुपात आढळतो. पूर्णपणे बिनविषारी असलेला हा साप मराठवाड्यात व बीड जिल्ह्यात दुर्मिळ प्रजातीचा असल्याने फार कमी प्रमाणात आढळतो. नागझरी परिसरात हा साप आढळल्यामुळे अंबाजोगाई शहराभोवतीचा परिसर अजुनही जैवविविधतेने समृद्ध आहे आणि दुर्मिळ प्रजातीच्या वनस्पती व प्राण्यांचा या भागात अधिवास आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

या सापाला पकडण्यात नागझरी परिसरातील रहिवासी सिद्धेश्वर पांचाळ यांचे सहकार्य झाले. सर्पमित्र लेफ्टनंट डॉ.राजकुमार थोरात आणि हेमंत धानोरकर यांनी वनविभागाचे अंबाजोगाई परिक्षेत्राचे वनअधिकारी जी.बी. कस्तुरे यांना प्रत्यक्ष भेटून या सापाबाबत माहिती दिली. तसेच त्यांच्या परवानगीने व सहकार्याने या सापाला वनविभाच्या जंगल अधिवासात सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले.

अंबाजोगाई वनविभागाच्या वनपालपदी नुकतेच रुजू झालेले जी.बी. कस्तुरे यांचे सापांच्या माहितीचे पुस्तक देऊन हेमंत धानोरकर यांनी स्वागत केले. या प्रसंगी वनरक्षक तागड मॅडम तसेच सर्पमित्र आदित्य थोरात व छोटा प्राणीमित्र ओजस उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *