पुणे: कोरोना महामारीमुळे गेल्या पाच महिन्यांपासून रेडिरेकनरचे (वार्षिक बाजार मुल्य तक्ते) दर जाहीर करण्याचे रखडले होते. ते शुक्रवारी जाहीर करण्यात आले. त्यात राज्यात सरासरी 1.74 टक्क्याने वाढ करण्यात आली. ही दरवाढ शनिवारपासून लागू होणार आहे, अशी माहिती राज्याचे नोंदणी महानिरिक्षक व मुद्रांक नियंत्रक ओमप्रकाश देशमुख यांनी आज शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
महाराष्ट्र मुद्रांक (मिळकतीचे वास्तव बाजार मूल्य निश्चित करणे) नियम 1995 अन्वये दस्त नोंदणीसाठी मुद्रांक आकरण्यासाठी वार्षिक मूल्यदर तक्ते आवश्यक असते. दरर्षी हे दर 1 एप्रिल पासून लागू केले जातात. परंतु यंदा कोराचा प्रादुर्भाव असल्याने दर कायम ठेवण्यात आले होते. यापूर्वी 2017 साली रेडिरेकनरचे दर जाहीर केले होते. त्यानंतर सुमारे अडिच वर्षे आर्थिक मंदी लक्षात घेऊन राज्य शासनाने कोणतीही वाढ केलेली नाही. ही दरवाढ वर्षभरात झालेली खरेदी-विक्री, भौगोलिक बदल, नैसर्गिक आपत्ती लक्षात घेऊन कमी-अधिक प्रमाणात केली जाती. यंदाचे दर कोरोनाचा प्रादुर्भाव बाजारपेठेतील मंदी लक्षात घेऊन निश्चित करण्यात आले आहेत, असे देशमुख यांनी सांगितले.
सन 2019-20 या आर्थिक वर्षात एप्रिलपर्यंत राज्यात सुमारे 12 लाख 95 हजार 75 दस्तांची नोंदणी झाली. तर चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांत 5 लाख 17 हजार दस्तांची नोंदणी झाली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत 7 लाख 72 हजार 961 दस्तांची घट झाली आहे. तर उत्पान्नात सुमारे 60 टक्के घट झाली आहे. रेडिरेकनरचे दर निश्चित करताना ग्रामीण क्षेत्र, प्रभाव क्षेत्र, नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्र आणि महापालिका या क्षेत्रांचा विचार केला जातो.
वार्षिक मूल्यदर तक्ते तयार करण्याची कार्यपध्दती:
वार्षिक मूल्यदर तक्ते तयार करताना प्रत्यक्ष नोंदणीकृत व्यवहाराची माहिती गावानिहाय व मूल्य विभागनिहाय संकलित केली जाते. याशिवाय स्थावर व्यवसाय वास्तू प्रदर्शन, संकेत स्थळ व क्षेत्र भेटी देऊन देखील प्रत्यक्ष माहिती संकलीत करुन वाढ/घटीची क्षेत्र निहाय व मूल्य विभाग निहाय सरासरी वाढ यापैकी किमान वाढ विचारात घेऊन दर निश्चित केले जातात.
क्षेत्रनिहाय वाढ(टक्केवारी):
ग्रामीण क्षेत्र – 2.81
प्रभाव क्षेत्र -1.89
नगरपरिषद/नगरपंचायत – 1.29
महापालिका – 1.02
राज्याची सरासरी वाढ – 1.74
प्रमुख शहर, जिल्हे(टक्केवारी):
पुणे – 3.91
मुबंई – उणे 0.6
ठाणे – 1.42
नाशिक – 1.64
नागपूर – 0.60
औरंगाबाद 1.76
आमरवाती – 1.62
कोल्हापूर – 1.51