नांदेड: भारतीय रेल्वेने प्रवासी सुविधेत भर घालतांनाच मालवाहतूक आणि पार्सल वाहतूक वाढविण्यास सुरुवात केली आहे. मालवाहतुकीस प्रोत्साहन देण्याकरिता या पूर्वीच विविध सवलती देण्यात येत आहेत. यात पुढे जाऊन पार्सल वाहतुकीस चालना मिळण्याकरिता यापुढे पार्सल वाहतुकीमध्ये नियमित रेल्वे गाड्यांत तसेच टाईम टेबल पार्सल विशेष रेल्वे गाड्यामध्ये यापुढे पार्सल वाहतुकी करिता एस.एल.आर. आणि पार्सल वॅन (वि.पी.) मध्ये जागा ऍडव्हान्स बुक करता येणार आहे. या सुविधे अंतर्गत १२० दिवस आधी पार्सल वाहतूक करण्याकरिता जागा बुक करता येणार आहे. अपेक्षित पार्सल भाड्याच्या १०% रक्कम भरून पार्सल करीता जागा आरक्षित करता येणार आहे. उरलेले ९०% पार्सल भाडे गाडीच्या सुटण्याच्या ७२ तास अगोदर भरावे लागणार आहे. जर ग्राहक ठरल्याप्रमाणे गाडीच्या ७२ तासापूर्वी उरलेले पार्सल भाडे भरू शकला नाही तर ऍडव्हान्स बुकिंग च्या वेळेस भरलेले १०% पार्सल भाडे जप्त केले जाईल आणि पार्सल ची ऍडव्हान्स बुकिंग रद्द करण्यात येईल.
रेल्वे ग्राहकांकडून ऍडव्हान्स पार्सल बुकिंगची सुविधा देण्याकरिता वारंवार विनंती करण्यात येत होती जेणेकरून ग्राहकांना पार्सल वाहतूक करण्याकरिता निश्चित जागा मिळू शकेल आणि त्याप्रमाणे ते नियमित पार्सल वाहतूक करू शकतील. यामुळे ग्राहक आणि रेल्वे दोघांनाही फायदा होणे अपेक्षित आहे. या नवीन नियमानुसार नियमित प्रवासी गाड्यांमध्ये आणि टाईम टेबल पार्सल गाड्यांमध्ये पार्सल वॅनसुद्धा १२० दिवस अगोदर म्हणजेच ऍडव्हान्स बुक करता येणार आहे. याकरिता पूर्वी प्रमाणेच वॅगन डिमांड रजिस्ट्रेशन फीस भरावी लागणार आहे.
ऍडव्हान्स बुकिंग नुसार पार्सलसाठी जागा बुक केलेली जागा जर प्रवाशाला रद्द करावयाची असेल तर गाडी सुटण्याच्या ७२ तास पूर्वी त्याला हे रद्द करता येईल. अशा परिस्थितीतही ग्राहकाला भरलेल्या रकमेच्या ५०% रक्कम परत मिळेल. परंतु ७२ तासानंतर ग्राहकाला असे करता येणार नाही. तसेच काही कारणास्तव जर रेल्वे प्रशासनाने गाडी रद्द केली तर ग्राहकाला त्याने भरलेली पूर्ण रक्कम परत मिळेल. उपिंदर सिंघ, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड यांनी ग्राहकांना आवाहन केले आहे की, या संधीचा छोट्या व्यापाऱ्यांनी, व्यावसायिकांनी, शेतकऱ्यांनी तसेच इतर गरजूंनी पूर्ण फायदा घ्यावा आणि रेल्वेने पार्सल वाहतूक करून आपले पार्सल सुरक्षित आणि गतिशील पद्धतीने पुढे पोहोचवावे. ऍडव्हान्स बुकिंग करून आपल्या सामानाकरिता जागा सुरक्षित करावी आणि आपला व्यवसाय वाढवावा.