औरंगाबाद: दै. सामनाचे पत्रकार राहूल स्वामीदास डोल्हारे (४९, रा. संघर्षनगर औरंगाबाद) यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडिल, पत्नी, दोन मुले, एक मुलगी, दोन भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. मुकुंदवाडी येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दहा दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची बाधा झाली होती. सुरुवातीला चिकलठाणा येथील मेल्ट्रॉन कोविड सेंटरमध्ये उपचार करण्यात आले. मात्र, प्रकृती खालावल्याने त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही दिवस त्यांना व्हेंटिलेटरवरही ठेवण्यात आले होते. उपचार सुरू असताना आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
राहूल डोल्हारे हे मूळ शेलगाव (ता. बदनापूर, जि.जालना) येथील होते. पूर्णा येथे शालेय शिक्षण पूर्ण करुन ते औरंगाबादेत आले. अत्यंत हलाखीत त्यांनी उच्च शिक्षण घेतले. जर्नालिझमची पदवी घेतल्यानंतर एकमत, देशोन्नती, तरुण भारत आदी दैनिकांत अनेक वर्षे त्यांनी काम केले. अतिशय दिलखुलास, मनमिळावू आणि कष्टाळू स्वभावाचे राहूल डोल्हारे पत्रकारितेत सर्वपरिचित होते. दैनिक सामनाच्या औरंगाबाद येथील आवृत्तीत ते गेल्या सात वर्षांपासून कार्यरत होते. पत्रकार संघटनेच्या बांधणीतही ते अग्रेसर होते. त्यांच्या निधनाने औरंगाबादेतील वृत्तपत्रसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.