ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक श्रीमंत माने यांचे प्रतिपादन
पुणे: महिलांना अवकाश खुले न केल्याने देशाच्या प्रगतीचा वेग साधता आलेला नाही. मात्र, निवडणुकांमध्ये वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीवरून महिला सजग झाल्याचे दिसून येत आहे. परंतु फॅसिझमच्या छायेतून बाहेर पडता यावे यासाठी त्यांना आता धर्माबद्दलची योग्य जाणीव करून देण्याची गरज आहे. कारण धर्माचा सर्वाधिक प्रभाव महिलांवर दिसतो, असं सांगत आक्रमक राष्ट्रीयत्व, मानवी हक्कांबद्दलची बेफिकीरी, विशिष्ट समूहाबद्दलचा आकस, लिंगभेदाची खोलवर रुजत जाणारी मानसिकता, राष्ट्राच्या सुरक्षेचा प्रचंड उन्माद, धर्मसत्ता आणि राजसत्तेची सरमिसळ, कलावंत-बुद्धिवंतांचा तिरस्कार ही सारी फॅसिझमची लक्षणं असून ती कुठे, कशी लागू होतात आणि कोणत्या घटनांमधून दिसून येतात याचा विचार आता लोकांनी करावा असं प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक श्रीमंत माने यांनी केलं. ते मनोविकास प्रकाशनाने आयोजित केलेल्या फेसबुक लाईव्हमध्ये बोलत होते.
श्रीमंत माने यांनी लिहिलेलं ‘भक्ती-भीती-भास : फॅसिझमच्या छायेतील भारताचं दर्शन’ हे पुस्तक मनोविकासने प्रकाशित केलं आहे. त्या अनुषंगाने श्रीमंत माने यांच्याशी मुक्त संवाद आयोजित केला होता. मनोविकासच्या या फेसबुक लाईव्हमध्ये कवी, लेखक असलेले प्रा. शंकर बोऱ्हाडे यांनी माने यांच्याशी संवाद साधला, तर मनोविकासचे संपादक विलास पाटील यांनी प्रस्ताविक केले. यावेळी झूमवर मनोविकास प्रकाशनाचे आशिष पाटकर हेही उपस्थित होते.
औषधनिर्माणशास्त्र विद्याशाखेचा विद्यार्थी असताना पत्रकारितेकडे कसे आलो इथपासून माने यांनी या संवादाला सुरूवात केली. त्यानंतर हे पुस्तक लिहिण्याच्या भूमिकेविषयी बोलताना ते म्हणाले, ‘२०१५ च्या उत्तरार्धात अनेक बुद्धिवंतांनी आपले पुरस्कार शासनाला परत केले. त्यामागच्या भूमिकेतून देशात घडणाऱ्या विविध घटनांकडे एका नव्या दृष्टिकोनातून बघू लागलो. त्यातून फॅसिझमची काही लक्षणं जाणवायला लागली. मग उत्सुकतेपोटी या विषयाचा वेध घेऊ लागलो. अभ्यास करू लागलो. त्यातूनच काही ठिकाणी या विषयावर मांडणी करण्याची संधी मिळाली. पुढे त्याच मांडणीचं विस्तारित रुप पुस्तकाच्या माध्यमातून मांडायचा प्रयत्न केला आणि भक्ती-भीती-भास या पुस्तकाचा जन्म झाला.’
या पुस्तकाच्या माध्यमातून भारताचा ट्रॅक मांडताना विविध प्रश्नांचा उहापोह माने यांनी पुस्तकात केला आहे. त्यात शेतीसंबंधी प्रश्न आहेत, स्त्रियांविषयीचे प्रश्न आहेत. तरुण, बेरोजगारी, शिक्षणाचे स्वरुप या अंगानेही मांडणी केलेली आहे. त्याविषयी बोलताना ते म्हणाले, सगळेच प्रश्न अगदी अलीकडचे आहेत, असं नाही. दुष्काळासंबंधीची वर्णने आपल्याला लीळाचरित्रात वाचायला मिळतात. संतसाहित्यात सावकारीचा प्रश्न येतो. म्हणजे असे प्रश्न पूर्वीपासून आहेत आणि त्यासाठी कधीच कोणत्या शेतकऱ्याने आत्महत्या केलेल्या नाहीत. परंतु अलीकडच्या काळात मध्यमवर्गीय मानसिकता शेतकऱ्यांचा पहिला शत्रू बनली आहे. कांद्याचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांना थोडे पैसे मिळू लागताच मध्यमवर्गीय लोक कांद्याने रडवले म्हणून गळे काढू लागतात. पण एखाद्या पॅकबंद उत्पादनावरील अवाजवी छापील किंमतीबाबत मात्र ते ब्र काढत नाहीत. दुसरीकडे सार्वजनिक आरोग्य सेवेची झालेली परवड आपण आता पाहातो आहोत. परंतु पाकिस्तानपेक्षा आपल स्थिती चांगली आहे या मानसिकतेत आपण अडकलो आहोत. त्यामुळे प्रश्नांचं नेमकं आकलन होत नाही. त्यातूनच बेरोजगारीचा प्रश्न गंभीर बनला आहे. शेतीचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा ही राजकीय आहे. त्यातील यशाबद्दल शंका आहे. उलट शेती न समजलेला किंवा समजून घेऊ न इच्छिणारा मध्यमवर्ग शेतीपुढील आव्हान आहे. कोरोनाच्या अपत्तीनंतर त्यात सुधारणा अपेक्षित आहे, असंही माने म्हणाले.
लेखक आणि वाचक यांच्यामध्ये थेट संवाद घडावा या उद्देशाने मनोविकासने हा उपक्रम सुरू केला आहे. रविवारी झालेल्या या तेराव्या भागातही वाचकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत अनेक प्रश्न विचारले.