खरंतर आपण कधीतरी एकटे किंवा समूहात एखादा फोटो काढण्यासाठी ऊभे असतो तेव्हा नकळत चेहऱ्यावर एक प्रकारचा ताण येतो आणि मग समोरच्या फोटोग्राफर (छायाचित्रकार) कडून आवाज येतो ‘स्माइल प्लीज’ आणि क्षणात आपण रिलॅक्स होतो, चेहऱ्यावर हास्य येते हा आपला आनंदी क्षण टिपतो तो फोटोग्राफर. अशा आपल्यासारख्या अनेकांच्या चेहऱ्यावरील हास्य, आयुष्यातील ‘तो ‘आनंद आपल्या ‘स्वीट मेमरीज ‘अल्बम’द्वारे गेली चाळीस वर्षे जतन करणाऱ्या या क्लिकमास्टर फोटोग्राफरचे नाव म्हणजे सुशील राठोड.
आजकाल प्रत्येकाकडे असलेल्या मोबाईलमुळे प्रत्येक जण फोटो काढून स्वतःला फोटोग्राफर समजतो पण ते चुकीचे आहे कारण चांगल्या, परिणामकारक फोटोसाठी एक दृष्टी लागते जी खूप कमी फोटोग्राफरांकडे असते त्यापैकी एक म्हणजे सुशील राठोड यांना लाभलेली दैवी दृष्टी.
सुमारे चाळीस वर्षांपूर्वी फोटोग्राफीच्या क्षेत्रात पाऊल ठेवणं म्हणजे धाडसाचेच काम परंतु इयत्ता पाचवीत असताना वर्गशिक्षकांनी , ‘स्वावलंबी व्हा, आई-वडिलांवर अवलंबून न राहता स्वतः उत्पन्नाचे साधन निर्माण करा’ या गुरुमंत्राने भारावून इयत्ता सातवी पासूनच ‘आत्मनिर्भर’ होत नोकरीला आरंभ केला. घरची बेताची परिस्थीती माणसाला खूप काही शिकवून जाते त्यानुसार टेक्नीकल क्षेत्रात नाव कमवायचे, कलेच्या माध्यमातून स्वतःचा ठसा उमटवायचा असा मानस केला आणि आयुष्याच्या कॅमेऱ्यात फोटोग्राफी क्षेत्राचा रोल लोड केला.
एका स्टुडिओत पडेल ते काम, अगदी साफसफाई सुध्दा केली आणि एकलव्या प्रमाणे मालक फोटोग्राफीची कामे कशी करतो हे पहात शिकण्याचा श्री गणेशा केला. तीन वर्ष एक रूपयाही न मिळता, बिनपगारी काम करीत राहिले त्याच बरोबर चरितार्थासाठी रात्री आॅडिओ रेकाँर्डिंगची कामे दारोदारी फिरुन आॅर्डर घेणे त्यातून १८०/- रुपये महिना उत्पन्न सुरु झाले. त्याकाळी आदिनाथ शाॅपिंग सेंटरपासून शिवाजीनगर बसस्थानकापर्यंत पायी जाणे आणि तिथून पुढे पिंपरीला घरी जाणे असा दिनक्रम सुरु होता.
स्टुडिओत रात्री मालक गेल्यानंतर त्यांचा कॅमेरा हाताळणे, तांत्रिक गोष्टी शिकणे, फोटो काढणे नंतर तो रोल डेव्हलप करणे मग प्रिटींग करणे कारण तो काळ ब्लॅक अँड व्हाइटचा होता या गोष्टी शिकल्या. मालक कधी फोटो काढण्यासाठी बाहेर पाठवत यातूनच अनुभवाची शिदोरी जमू लागली अर्थात हे सगळे बिनपगारीच.
अनुभवाच्या जोरावर असे वाटू लागले की आता आपला स्वतःचा व्यवसाय सुरु करावा, लोकांकडून उधार पैसे घेऊन पहिला PENTAX ( ME SUPER) हा कॅमेरा विकत घेतला आणि आपल्या आवडीच्या क्षेत्रात काहीतरी वेगळे करुन दाखविण्याचा संकल्प सोडला. सुरवातीला लोकांना भेटून ५, १०, १५ असे फोटो काढून दिले, लोकांना विश्वास बसत गेला, फोटो आवडत होते, राठोडांनी काढलेले फोटो मस्त असतात, त्यानांच काम द्या, असे एकमेकांना सांगू लागले, हळूहळू जनसंपर्क वाढत गेला आणि एक ऊत्तम फोटोग्राफर अशी ओळख निर्माण होऊ लागली. कष्टाला फळ मिळतेच या ऊक्तीप्रमाणे ही बाब त्याकाळचे खासदार सुरेश कलमाडी यांच्या सुविद्य पत्नी सौ. मीराताई कलमाडी यांच्यापर्यंत पोहोचली आणि एका नवीन पर्वाची नांदी सुरु होणार होती परंतु त्यासाठी मीराताईंच्या परीक्षेत पास होणं गरजेचे होतं. नावाप्रमाणे सुशील असणाऱ्या राठोडांनी मेहनत, जिद्द, चिकाटी या गुणांवर ही परीक्षा दिली आणि त्यात ते उत्तीर्ण झाले, त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पाॅइंट ठरला तो जगप्रसिध्द “पुणे फेस्टिव्हल”.
खासदार सुरेश कलमाडी यांच्याकडून व्यवहार, शिस्तबद्धता, निर्णायक परिणाम, नेहमी सकारात्मकता याचे बाळकडू तर मिळालेच तसेच व्यक्तिमत्वाचाही विकास होत गेला. पुणे फेस्टिव्हलमुळे अनेक आंतरराष्ट्रीय कलाकारांचा सहवास, त्यांच्या सादरीकरणाच्या वेळेसच्या भावमुद्रा टिपण्याची संधी मिळाली आणि अर्थातच या संधीचे केलेलं सोनं कारण अनेक दिग्गज कलाकारांनी राठोडांनी काढलेल्या फोटोला ” वा, क्या बात है ” अशी दिलखुलास दाद दिली जी निश्चितच सुखावह होती.
सुप्रसिद्ध गायिका पिनाझ मिसानी म्हणतात ,”Never seen a person like you तर रात्री बारा वाजता कल्याणजी भाईंच्या संपलेल्या कार्यक्रमाचे अफलातून फोटो पहाटे तीन वाजता त्यांच्या समोर डिस्प्ले केले आणि तेही चकीत झाले, पहाटे हाॅटेलचा ज्यूसबार ऊघडायला लावून मोसंबी ज्युस दिला, ही कामाची पावती. गान सरस्वती लता मंगेशकरांनी त्यांचा फोटो पाहून,” खूप मोठा फोटोग्राफर होशील “, हा आशीर्वाद आज सत्यात उतरला आहे. अनेक दिग्गज कलाकार जसे पं.भीमसेन जोशी, पं. शिवकुमार शर्मा, पं. हरिप्रसाद चौरासिया ते अगदी आजच्या पिढीतील कलाकारांच्या मैफिली राठोड्यांच्या फोटोतून आजही जिवंत आहेत.
तसेच राजकीय क्षेत्रातील सर्वोच्च पदावरील माजी राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा, ए.पी.जे. अब्दुल कलाम, प्रणव मुखर्जी तर माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव , ए.के. गुजराल, मनमोहन सिंग यांना अगदी जवळून फोटोच्या माध्यमातून टिपण्याचे भाग्य लाभले. त्याच बरोबर ममता बॅनर्जी, शरद यादव, सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याही छबी कॅमेऱ्यात कैद केलेल्या आहेत.
लता मंगेशकर, आशा भोसले, अनुराधा पौडवाल, कुमार सानू, उदित नारायण, पंकज उदास, अनुप जलोटा व असंख्य गायक, कलाकार अमिताभ बच्चन, जितेंद्र विनोद कुमार, दिलीप कुमार, सूनील दत्त, राजेश खन्ना, ए. के. हंगल, ओम पुरी, असे अनेक नट्याचे फोटो काढण्याची संधी प्राप्त झाली.
फोटो काढणे ही एक कला असून फोटो हा वनस्ट्रोक जमला पाहीजे, आपण काय आणि कसला फोटो काढतोय याची पूर्ण कल्पना आपल्या डोक्यात पाहिजे, हावभाव योग्य टिपतोय? लाइट कितपत आहे तसेच कंपोझिंग अत्यंत महत्त्वाचे आहे, फोटोचा विषय स्वतःला कळाला तरच तो फोटो जिवंत होतो अशी त्यांची भावना आहे.
आजपर्यंत अनेक दैनिके, साप्ताहिकांसाठी राठोडांनी ऊत्तमोत्तम फोटो देऊन लाखो वाचकांपर्यंत त्या फोटोतील संदेश पोहोचवला आहे. पानभर लिहिलेल्या बातमीपेक्षा एक बोलका फोटो खूप काही सांगून जातो आणि किमया त्यांना लाभली आहे. महत्त्वाचे म्हणजे हे सगळं विनामूल्य, कुठलेही मानधन न घेता अविरतपणे हा प्रवास आजही सुरु आहे. सुंदर टिपलेला एखादा फोटो जर वर्तमानपत्रात प्रसिध्द झाला नाही तर नाराज न होता, त्याचे दुःख न बाळगता याही पेक्षा मी काय चांगलं करु शकतो हा विचार मनात आणून पुढच्या ‘हटके’ विषयाच्या फोटोसाठी त्यांचा कॅमेरा तयार असतो.
आपल्या गुरुंच्या आशीर्वादाने आणि जीवनात भेटलेल्या अनेक राजकीय , सामाजिक, प्रतिष्ठित व्यक्तींच्या सहकार्यानेच हे घडत आहे अशी विनम्र भावना ते व्यक्त करतात. सरस्वतीला महत्त्व द्या लक्ष्मी आपोआपच येईल, यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. चाळीस वर्ष फोटोग्राफीच्या क्षेत्रातील हा तारा असाच चमकत रहावा आणि त्यांनी काढलेल्या फोटोतून लाखो चेहऱ्यांवर प्रकाश पडावा आणि त्या प्रत्येकाचे जीवन उजळून निघावे…
-सुशील राठोड, फोटोग्राफर पुणे
मोबाईल: 9822208333
ईमेल: sds.rathod@gmail.com