# हॅप्पी हायपोक्झिया घातक; ४८ ते ७२ तासांच्या आतील मृत्यूचे प्रमाण ७० टक्के.

कोविड रूग्णांनी लक्षणे जाणवताच उपचारासाठी यावे -डॉ.सिध्देश्वर बिराजदार यांचे आवाहन

अंबाजोगाई: कोविड १९ मुळे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये ४८ ते ७२ तासांच्या आत मृत्यू होणा-या रूग्णांचे प्रमाण ७० टक्के असून, हे प्रमाण कमी करण्यासाठी कोविड ची लक्षणे दिसू लागताच रूग्णांनी उपचारासाठी यावे, असे आवाहन स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड केअर हाॅस्पिटलचे प्रमुख डॉ.सिध्देश्वर बिराजदार यांनी व्यक्त केले.

दरम्यान, “हॅप्पी हायपोक्झिया”. या प्रकारात शरीरातील आॅक्सीजनची पातळी कमी होऊन सुद्धा ज्या प्रमाणात दम, लागायला पाहिजे तो लागत नसल्याने रूग्णांना आपल्या आजाराचे गांभीर्य लक्षात येत नाही. म्हणून रूग्ण उपचारासाठी उशिरा येतात त्यामुळेही मृत्यूचे प्रमाण वाढत आहे, यासाठी लक्षणे दिसताच त्वरित उपचारासाठी रूग्णालयात यावे, असे आवाहनही डाॅ. बिराजदार यांनी केले आहे.

अंबाजोगाई येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड केअर हाॅस्पिटलमध्ये ४ जून २०२० रोजी कोविडचा पहिला रूग्ण आला. या रूग्णापाठोपाठ ट्रेसिंग दरम्यान त्याच्या कुटुंबातील इतर चार सदस्य पाॅझिटिव्ह निघाले आणि ही साखळी सतत वाढत गेली. हा पहिला रूग्ण आणि त्यांचे नातेवाईक बरे होवून घरी गेले याचे समाधान असले तरी नंतर वाढत जाणारा मृत्यूदर हा काळजी वाढवणारा आहे. मुळात कोविड १९ या आजाराबद्दल लोक अजूनही गांभीर्याने घेत नाहीत, ही खंत आहे. कोविड ची लक्षणे दिसू लागताच उपचारासाठी आलेले शेकडो रूग्ण बरे होवून घरी गेलेले आहेत. कोविड १९ मुळे उपचारासाठी येणा-या रूग्णांमध्ये पहिल्या ४८ ते ७२ तासात होणार्‍या मृत्यूचा दर ७० टक्के च्या आसपास आहे.

या संदर्भात बोलताना डॉ.बिराजदार पुढे म्हणाले की, कोविडच्या भीतीमुळे मानसिक ताणतणाव निर्माण होतो. यामुळे मनात एक भीती निर्माण होऊन रूग्ण स्वतः आजार कोणालाही न सांगता अंगावर काढतो. जेव्हा आजार वाढतो, तेव्हा आपल्या फुप्फुसाचा ५० ते ७० टक्के भाग हा संक्रमित झालेला असतो. तेव्हा आॅक्सीजनचा पुरवठा करणे सुद्धा अवघड होते. या आजाराचे आणखी एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे “हॅप्पी हायपोक्झिया”. या प्रकारात शरीरातील आॅक्सीजनची पातळी कमी होऊन सुद्धा ज्या प्रमाणात दम, लागायला पाहिजे तो लागत नसल्याने रूग्णांना आपल्या आजाराचा गंभीरपणा लक्षात येत नाही. म्हणून रूग्ण उपचारासाठी उशिरा येतो व त्याचा परिणाम त्याच्यावर उपचार करणं खूपचं अवघड होतं. हे सर्व टाळण्यासाठी सर्वच कुटुंबातील वयस्कर व्यक्तींची काळजी घेणे आवश्यक आहे. प्रत्येक घरी पल्स आॅक्सीमीटर हे छोटेसे यंत्र असणे गरजेचे असून त्यादृष्टीने सर्दी, खोकला, ताप आलेल्या रूग्णांचे आॅक्सीजनची पातळी तपासून, वेळीच उपचार सुरू केले तर चांगले परिणाम दिसून येतील.

कोविड या आजारात मानसिक संतुलन राखू्न ठेवणे हे ही खूपच गरजेचे आहे. हा आजार असतांनाही अनामिक भीतीने अनेक लोक रूग्णालयात येण्यास खूप उशीर करतात. किंबहुना अत्यंत अस्वस्थ झाल्यानंतरच हे रूग्ण उपचारासाठी येतात. यामध्ये ७० वर्षांपुढील उच्च रक्तदाब, मधुमेह, न्युमोनिया, श्वसनाचे आजार व इतर आजार असणा-यांची संख्या खूप मोठी आहे. या रुग्णांच्या इतर सर्व टेस्ट करुन त्यांच्यावर उपचार करण्यासाठी वेळ जातो आणि परिणामी असे रूग्ण बारा ते चोवीस तासाच्या आतच दगावतात. कोविड १९ ची लक्षणे जाणवू लागताच उपचारासाठी येणा-या रूग्णांचा मृत्यूदर त्या मानाने खूप कमी आहे. असे रूग्ण औषधोपचारासोबत मानसिक समुपदेशनानेही लवकर बरे होतात असा अनुभव आहे. मुळात कोविड रुग्णांना घरातील लोकांनी व समाजातील लोकांनी त्यांचे मानसिक बळ वाढवण्यासाठी सतत प्रयत्न केले पाहिजेत. ते फार कमी प्रमाणात होते असे दिसते. कोविड विरूध्दचा लढा हा केवळ रूग्ण आणि डॉक्टर यांचाच नाही तर समाजातील सर्व घटकांचा आहे. या लढ्यात समाजातील सर्वांनी शासनाने दिलेले सर्व निर्बंध पाळत या लढ्यात सहभागी व्हायला हवे, असे आवाहनही डॉ.सिध्देश्वर बिराजदार यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *