दिवाळी अंकांनी महाराष्ट्राचं वैचारिक भरणपोषण केलं आहे. कोरोनामुळं ही समृध्द आणि वैभवशाली परंपरा खंडित होवू नये यासाठी सर्व संपादक, लेखक, चित्रकार, व्यंगचित्रकार, वाचक, वितरक एकत्र येवून सकारात्मक विचार करत आहेत, ही आनंददायी आणि समाधानाची बाब आहे. ‘दिवा’ या दिवाळी अंकांच्या संपादकांच्या संघटनेनं ऑनलाईन अधिवेशनात यावर चर्चा करुन एक आशेचा दीप प्रज्वलित केला आहे. त्याचा सविस्तर वृत्तांत येथे देत आहोत…
दिवाळी अंक ही महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा. साधारण मार्च महिन्यापासून दिवाळी अंकांच्या निर्मितीस प्रारंभ होतो. विषयाची निवड त्यानुसार लेखक, कवी, चित्रकार, व्यंगचित्रकार यांना पत्र लिहून साहित्य पाठवण्याचं आवाहन केलं जातं. काही मंडळी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर साहित्य लेखनास प्रारंभ करतात. हा सारा काळ साहित्यिक क्षेत्रात एक भारलेपण निर्माण करणारा असतो. यंदा मात्र साहित्यिक क्षेत्रात एक वेगळीच उदासीनता जाणवत आहे. पुणे शहरात 9 मार्चला कोरोनाबाधित व्यक्ती आढळून आल्यापासून दिवाळी अंक निघतील की नाही, याबाबत अनिश्चितता निर्माण झाली. तथापि, ‘दिवा’ या दिवाळी अंकांच्या संपादकांच्या संघटनेनं आपल्या ऑनलाईन अधिवेशनात यावर चर्चा करुन एक आशेचा दीप प्रज्वलित केला आहे.
दिवा प्रतिष्ठान आयोजित दिवाळी अंक संपादक, प्रकाशक, लेखक, वाचक, चित्रकार यांचं पहिलं (वेबिनार) अधिवेशन रविवार, १३ सप्टेंबर २०२० रोजी सायंकाळी ५ वाजता झालं. सुमारे पाच तास ऑनलाईन चाललेल्या या अधिवेशनात कोरोना आणि दिवाळी अंकांची छपाई हे विषय केंद्रस्थानी होते. कार्यक्रमाचे उद्घाटक महाराष्ट्र साहित्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष मसापचे कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी हे होते. प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार ज्ञानेश सोनार व जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग सहभागी झाले. याशिवाय राज्यभरातील दिवाळी अंकांचे संपादक, लेखक, वाचक, वितरक यामध्ये ऑनलाईन सहभागी झाले.
अधिवेशनाची सुरुवात गणेशवंदनेनं झाली. दीपप्रज्वलन प्रकाश पायगुडे, ग्रहांकित मासिकाचे संपादक चंद्रकांत शेवाळेदादा, प्रा. मिलींद जोशी आणि ज्येष्ठ प्रकाशक अरुण जाखडे यांच्या हस्ते झालं.
अध्यक्षीय भाषणात प्रा. मिलींद जोशी यांनी दिवाळी अंकांचा इतिहास उलगडून दाखवला. दिवाळी अंकांमुळं मराठी साहित्याची सर्व दालनं समृध्द झाली. दिवाळी अंकांनी नव प्रवाहांना स्वत:मध्ये सामावून घेतलं. वेगवेगळ्या स्तरावरील सर्जनाची प्रेरणा दिवाळी अंकांमुळंच मिळाली. जागतिकीकरणानंतर जीवनाचा पोत बदलून गेला. ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या, त्यामुळं त्या-त्या विषयाला वाहिलेले दिवाळी अंक निघू लागले. आधुनिक विज्ञान विस्तारत असतांनाच ज्योतिषविषयक दिवाळी अंकही मोठ्या संख्येनं विकले जावू लागले. दिवाळी अंकांना जाहिरात देणं हे धनिकांना आपलं सांस्कृतिक कर्तव्य वाटत होतं, मराठी भाषेविषयी कृतज्ञतेची भावना होती. यंदा कोरोनाच्या काळात सारं चित्र बदलून गेल्यासारखं वाटत आहे. तथापि, ज्यांच्या मनात साहित्याचं प्रेम आहे, वाचनसंस्कृतीचं प्रेम आहे ते या परिस्थितीवर मात करतील, अशी आशा आहे. या अधिवेशनामुळं आशेचा दीप तेवत ठेवण्याचं काम केल्याची भावना प्रा. मिलींद जोशी यांनी व्यक्त केली.
आजच्या काळात वेगवेगळे प्रयोग करावे लागणार, अर्थकारण तपासावं लागणार, इ-आवृत्ती, पीडीएफ याबाबत विचार करावा लागणार, असंही त्यांनी सांगितलं. हस्तांदोलन, आलिंगण आजच्या काळात कर्मकठीण झालं आहे. सॅनिटायझरला तीर्थाचं स्वरुप आलंय तर मुखपट्टी दागिना झाला आहे. दिवा संघटना सकारात्मकतेचा दिवा कार्यरत ठेवेल, असा विश्वास व्यक्त करुन प्रा.जोशी यांनी दिवाळी अंकांच्या संपादकांच्या पाठिशी महाराष्ट्र साहित्य परिषद खंबीरपणं उभी राहील, अशी ग्वाही दिली.
आपल्याला लेखक म्हणून घडवण्यात दिवाळी अंकांचा मोठा वाटा असल्याचं प्रांजळपणे कबूल करुन प्रा. मिलींद जोशी यांनी याबाबतच्या आठवणी सांगितल्या. ते म्हणाले, भानू काळे यांनी ‘अंतर्नाद’ दिवाळी अंकासाठी ‘20 सर्वश्रेष्ठ पुस्तकं’ असा विषय ठरवला. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. राम शेवाळकर यांना सुनिता देशपांडे (पु. ल. देशपांडे यांच्या पत्नी) यांच्या ‘आहे मनोहर तरी’ या पुस्तकावर लिहीण्याची विनंती केली. प्रकृती अस्वास्थ्यामुळं त्यांनी लिहीता येणार नसल्याचं सांगितल्यावर दुसऱ्या कोणाकडून लिहून घेऊ, अशी विचारणा केली. त्यावर त्यांनी मिलींद जोशी यांच्याकडून लिहून घ्या, म्हणून सुचवलं. त्यानुसार भानू काळे यांनी माझ्याकडून लेख लिहून घेतला. या लेखाचं सुनिता देशपांडे यांनी फोन करुन कौतुक केलं. त्यावेळी मला तुम्हाला भेटायचं आहे, अशी मी त्यांना विनंती केली. दुसऱ्या दिवशी त्यांनी संमती दिली. त्यानंतर मी, माझी पत्नी, मुलगी तसंच प्रा.अरुणा ढेरे, नंदा पैठणकर (जीएंच्या भगिनी) आम्ही सर्व त्यांना भेटायला गेलो. हा अनुभव रोमांचित करणारा होता. एका लेखामुळं मला थेट पुलंच्या घरात पोहोचवलं.
ज्येष्ठ व्यंगचित्रकार ज्ञानेश सोनार यांनीही दिवाळी अंकांचा एक काळ गाजवलेला. त्यांनीही आपले अनुभव रंजकतेनं मांडले. ते म्हणाले, 1970ते 2000 पर्यंत दिवाळी अंकांना बरकत होती. या काळात आमची पिढी तरुण होती, वाचायची आस होती. शेकडो ऑफिसेसमध्ये दिवाळी अंक लायब्ररी असे, तेथे खूप खप होई. मोबाईल सक्षम नव्हता. आज मितीस तो प्रचंड पॉवरफुल झालाय. नव्या पिढीतील तरुण- तरुणी, स्त्री-पुरुष, गृहिणी, मोलकरणी, भाजीवाल्या, छोटी मुलं मान झुकवून त्याच्यापुढे नतमस्तक झालीत. त्यात काय पाहायला वा वाचायला मिळत नाही? हवं ते, नको ते त्यात आहे. यु ट्यूबवर, गुगलवर फुकट पहायला मिळतं. कथा, कादंबऱ्या, जुने-नवे सिनेमे, गाणी, खरेदी सर्व सहज उपलब्ध झाल्यानं आवर्जून पुस्तकं वा दिवाळी अंक वाचणं दुरावलं आहे. टीव्हीवर विनोदी, भयकथा, देव-धर्माच्या मालिका चोवीस तास उपलब्ध आहेत. आम्ही कोणत्या तोंडानं नव्या पिढीला दिवाळी अंक वाचायला सांगणार? त्यात त्यांना आकर्षित करणारं काय आहे? त्याच कथा, तेच लेखक, तेाच ठरावीक साचा, तुमच्या आमच्या पिढीसाठी चालला. नव्यासाठी तो परिचित नाहीच, पण आकर्षण वाटावा असाही दिसत नाही. त्यात कोरोनामुळं सर्व वृत्तपत्र इंडस्ट्रीच घायकुतीला आलीय. करोडोंची उठाठेव ठप्प झाली. ‘टू बी ऑर नॉट टू बी’ सारखं जगणार की मरणार अशा उंबरठ्यावर
वृत्तपत्रसृष्टी उभी आहे? दिवाळीअंक काढायचा की नाही? चालेल की नाही? वाचक घेतील की नाही? सर्व काही कोरोनाच्या हाती. मात्र, दिवाळी अंक इतक्या सहजासहजी सरेंडर होणार नाहीत, असा आशावाद व्यक्त करुन ‘अगदी पठारावर नवी पाती, नवी पालवी जमिनीतून उगवताना दिसतील, नवे रंग, नवे ढंग, नव्या कल्पना नव्या पिढीसाठी नक्कीच घेऊन येतील’, असा दृढ विश्वास ज्येष्ठ व्यंगचित्रकार ज्ञानेश सोनार यांनी व्यक्त केला.
जिल्हा माहिती अधिकारी तसेच व्यंगचित्रकार राजेंद्र सरग यांनी दिवाळी अंकांचं महत्त्व विशद करुन कोरोनामुळं आलेली आपत्ती ही इष्टापत्ती समजून वाटचाल करण्याची गरज प्रतिपादन केली. आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेवून नवीन पिढीला या माध्यमाशी जोडणं शक्य असल्याचं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्र शासनानं ‘मिशन बिगीन अगेन’ अर्थात ‘पुनश्च हरि ओम’ म्हणत अनलॉकची प्रक्रिया सुरु केली असल्यानं सर्वांच्या मदतीनं कोरोनावर मात करण्यात यश येईल, असेही ते म्हणाले.
मसापचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे म्हणाले, दिवाळी अंक हे महाराष्ट्राचे वैभव आहे. दिवाळी अंकांचा सुवर्णकाळ आता राहिलेला नसला तरी सध्याच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी एकजुटीची आवश्यकता आहे. ज्येष्ठ प्रकाशक अरुण जाखडे यांनीही वाचनसंस्कृती टिकविण्यासाठी सर्वंकष प्रयत्न होण्याची गरज प्रतिपादन केली.
ऑल दी बेस्ट, हास्यानंद व छोट्यांचा आवाज या दिवाळी अंकाचे संपादक विवेक मेहेत्रे यांनी डिजीटल दिवाळी अंकांची प्रक्रिया, तंत्रज्ञान, सामर्थ्य व मर्यादा यावर सविस्तर मार्गदर्शन केलं. ते म्हणाले, दिवाळी अंकांचा वाचक 44 ते 84 वर्षे या वयोगटातील आहे. तो तितका टेक्नोसॅव्ही नाही, त्यामुळं उपलब्ध सर्व मार्गांचा विचार करुन वाटचाल करावी लागणार आहे. ई-पोर्टलवर अंक विक्रीसाठी ठेवणं, मागणीनुसार अंकांची छपाई करणं, एकमेकांच्या अंकात दिवाळी अंकांची जाहिरात प्रसिध्द करणं आदी उपाय त्यांनी सुचवले. जे दिवाळी अंक निघणार आहेत, ते कोणत्या मार्गांनी उपलब्ध होणार आहेत, त्यांचीही माहिती वाचकांपर्यंत वेगवेगळ्या साधनांनी पोहोचली पाहिजे, असं त्यांनी सांगितलं.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कोषाध्यक्षा सुनिताराजे पवार यांनी माणसानं आशावादी असावं, असं सांगून हे अधिवेशन मनोबल वाढविणारं संमेलन ठरेल,असा विश्वास व्यक्त केला. ‘आवाज’ दिवाळी अंकाचे संपादक भारतभूषण पाटकर यांनी उद्योग-धंद्यातील आर्थिक मंदी, दिवाळी अंकाचं अर्थकारण याबाबत चिंता व्यक्त केली. एजंट पाठिशी आहेत. तथापि, वितरण व्यवस्था सुरळीत होण्याची खात्री वाटली पाहिजे, असं ते म्हणाले. ‘अंतर्नाद’चे भानू काळे यांनी दिवाळी अंकांची उज्ज्वल परंपरा खंडित होवू नये, असं मत मांडलं. ‘ग्राहकहित’चे सूर्यकांत पाठक यांनी वितरणाची काही व्यवस्था करता येईल का यावर विचार करण्याचं आवाहन करुन ग्राहकपेठेत जागा उपलब्ध करुन देवू, असं सांगितलं. ‘विपुलश्री’ मासिकाच्या संपादिका माधुरी वैद्य यांनी 1999 पासून मासिक प्रकाशित करत असल्याचं सांगितलं. यंदा दिवाळी अंकाचं 22वे वर्ष असून ‘वाचकांना चांगलं साहित्य देणं’ या जाणिवेतून अंक काढत आहोत, असं त्या म्हणाल्या. ‘शतायुषी’चे संपादक डॉ. अरविंद संगमनेरकर यांनी यंदा अंक काढणार नसल्याचं सांगत सर्वांना आपापल्या तब्येतीची काळजी घेण्याचा सल्ला दिला. ‘धमालधमाका’चे संपादक नसिर शेख, ‘वेदांतश्री’चे संपादक सुनील गायकवाड, ‘धनंजय-चंद्रकांत’च्या संपादिका नीलिमा कुलकर्णी, ‘पुणे प्रतिष्ठान’चे रवी चौधरी, चैतन्य खरे, संदिप खाडीलकर, सुनील ज्ञानेश सोनार, वाचक राजेश मंडोरे, वितरक जगदीश भुतडा यांनीही आपलं मनोगत मांडलं.
‘दिवा प्रतिष्ठान’ चे अध्यक्ष विजय पाध्ये यांनी प्रास्ताविक केलं. उपाध्यक्ष चंद्रकांत शेवाळे, सचिव शिवाजी धुरी यांनी उपस्थितांचं स्वागत केलं. प्रमुख पाहुण्यांचा परिचय महेंद्र देशपांडे, सोनल खानोलकर, विवेक मेहेत्रे यांनी करुन दिला. या ऑनलाईन अधिवेशनात ज्ञानेश्वर जराड, गजू तायडे, सतीश देसाई, धनंजय सिंहासने, शारदा धुळप, आशा ब्राह्मणे, गौरव कुलकर्णी, रुपाली अवचरे, सुभाष सबनीस, उल्हास पाटकर, शशिकला पवार, अमृता खाकुर्डीकर, श्रीकांत भुतडा, विलास कसबे आदी सहभागी झाले होते. सूत्रसंचालन गौरी केंजळे यांनी केलं.