पुणे: मध्य महाराष्ट्रासह कोकणच्या काही भागात पुढील दोन दिवसात मुसळधार ते अतिवृष्टी असा पाऊस होणार आहे. विशेषत: कोल्हापूर, सातारा, पुणेसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या भागात रेड अलर्ट जारी केला आहे. त्यातही घाटमाथ्यावर अतिवृष्टीची शक्यता आहे. तर पालघर, मुंबई, जळगाव, नाशिक, धुळे, नंदुरबार, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्याच्या काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
राज्यातील सर्वच भागात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसत आहे. बंगालच्या उपसागरातील उत्तरपश्चिम भागात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा तसेच उत्तर मध्यमहाराष्ट्रावर सध्या असलेली चक्रीय स्थिती या दोन्ही स्थितीचा प्रभाव वाढला आहे. त्यामुळे पाऊस वाढला असून. पुढील दोन दिवस हा पाऊस कायम राहणार आहे. त्यानंतर हळूहळू पाऊस कमी होत जाईल असा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे.