मुंबई: मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेली अंतरिम स्थगिती उठविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात मोठ्या खंडपीठाकडे शासनाच्यावतीने आज २१सप्टेंबर रोजी विनंती अर्ज दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, मराठा आरक्षण प्रकरण घटनापिठाकडे वर्ग करताना सर्वोच्च न्यायालयाने दिलेला स्थगिती आदेश उठविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज करणार असल्याचे मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी यापूर्वीच म्हटले होते. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नुकत्याच झालेल्या बैठकीतही विचार विनिमय करण्यात आला होता. तसेच मराठा आरक्षण प्रकरणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्यामुळे स्थगिती उठविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. तसेच मोर्चे काढू नयेत, किंवा आंदोलन करू नये असे आवाहनही करण्यात आले आहे.