पुणे: राज्यातील कोकण, मध्यमहाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेला मुसळधार पावसाचा जोर मंगळवारी कमी झाला आहे. आता पुढील दोन दिवसात राज्यातील कोल्हापूर, सातारा, पुणे, रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई, पालघर, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या भागात हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. या भागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा पाऊस दोन दिवस राहणार आहे. त्यानंतर हा पाऊस कमी होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
राज्यात गेल्या दोन दिवसांपासून कोकण, मध्यमहाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टी तर मराठवाडा व विदर्भाच्या तुरळक भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडला होता. सध्या उत्तर छत्तीसगड भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. तर मध्यमहाराष्ट्रापासून हिमालय पश्चिम बंगाल व सिक्कीम भागापर्यंत द्रोणीय स्थिती आहे. याबरोबरच उत्तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर चक्रीय स्थिती कार्यरत आहे. परंतु या स्थितीचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे राज्यातील पाऊस कमी झाला आहे.