मुंबई: शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण झाली आहे. मंगळवारी गायकवाड यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तपासणीदरम्यान मला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती त्यांनी ट्विटद्वारे दिली आहे.
तुमचे आशीर्वाद आणि प्रेम यामुळे मी बरी आहे. कृपया माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी नियम आणि अटींप्रमाणे करोना चाचणी करून घ्यावी. सुरक्षित राहा, काळजी घ्या, असे आवाहन त्यांनी ट्विटद्वारे केले आहे. दरम्यान, राज्यातील मंत्र्यांना कोरोनाची लागण होण्याचे सत्र सुरूच आहे. यापूर्वी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, अस्लम शेख, अब्दुल सत्तार, संजय बनसोडे यांनाही कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर उर्जामंत्री नितीन राऊत हे देखील कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांसह मंत्र्यांनीही काळजी घेणे गरजेचे आहे.