पुणे: मान्सूनचा परतीचा प्रवास २८सप्टेंबर पासून पश्चिम राजस्थानातून होत आहे, तर महाराष्ट्रातून १५ ऑक्टोबर पर्यंत तो निघेल. मुंबई व पुणे शहरातून तो १२ ऑक्टोबरच्या सुमारास परतीकडे वाटचाल करेल असा अंदाज हवामान शास्त्र विभागाने व्यक्त केला आहे.
गेल्या आठ दिवसांपासून हवामानशास्त्र विभाग मान्सून परतीचा अंदाज देत आहे. शनिवारी त्यांनी मान्सून परतीचे वेळापत्रक जाहीर केले. मान्सूनच्या परतीचा प्रवास हा पश्चिम राजस्थानसह हिमालयाचा पायथा, जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात आणि शेवटी महाराष्ट्र असा सुरु होईल.पश्चिम राजस्थानातून २७ सप्टेंबरला परतीचा प्रवास सुरु होत आहे. मुंबई व पुणे शहरातून साधारणपणे १२ ऑक्टोबरला निघणार आहे. मात्र, उर्वरित महाराष्ट्रातून तो १५ ऑक्टोबर पर्यंत परतीच्या प्रवासाला निघेल.
मुंबई व पुणे शहरातून १२ऑक्टोबरला परतीचा प्रवास: अनुपम कश्यपी-मान्सूनच्या परतीचा प्रवास सोमवार, २८ सप्टेंबर पासून पश्चिम राजस्थानातून सुरु होत आहे. महाराष्ट्रातून तो पूर्णपणे जाण्यास १५ ऑक्टोबर उजाडेल. मुंबई व पुणे शहरातून ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजे १२ ऑक्टोबर पर्यंत जाईल, असे मत पुणे येथील हवामान विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी व्यक्त केले आहे.
परतीच्या प्रवासात भरपूर ढग घेऊन जात असल्याने पाऊस पडतो: डॉ.रामचंद्र साबळे -मान्सून येतो तेव्हा वारे दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहते. आता परतीच्या प्रवासात ते उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहत हवेचा दाब वाढत जातो आणि मान्सून परतीकडे निघतो. दक्षिणेकडे तर तो डिसेंबरपर्यंत राहतो. परतीच्या प्रवासात तो भरपूर ढग घेऊन जात असतो त्यामुळे पाऊस देत जातो, अशी माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ डॉ.रामचंद्र साबळे यांनी दिली.