मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची मुंबईतील हाॅटेलमध्ये झालेल्या भेटीमुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. अनेकांनी, आता महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार, शिवसेना भाजप पुन्हा एकत्र येणार, अशा चर्चांना उधाण आले होते. आज अखेर राऊत व फडणवीस यांनी एकापाठोपाठ दोघांनीही खुलासा करून, त्यांच्या भेटीचे वेगवेगळे अर्थ काढून खळबळ उडवून देणाऱ्यांच्या मनसुब्यावर पाणी फेरले आहे.
असे असले तरी संजय राऊत यांनी, देवेंद्र फडणवीस हे आमचे शत्रू नाहीत, नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांना आम्ही नेता मानतो, असे सांगून एक प्रकारे काँग्रेस व राष्ट्रवादीला इशारा दिला आहे. त्यामुळे या भेटीत भविष्यात एकत्र येण्याची बिजे रूजली आहेत, असे म्हणावयास हरकत नाही. असे झाल्यास राष्ट्रवादीचीही भाजपशी जवळीक वाढल्यास वावगे वाटू नये.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. अखेर आज खुद्द संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन या गुप्त भेटीबद्दल खुलासा केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांची भेट ही गुप्तपणे मुळीच नव्हती. ‘सामना’च्या मुलाखतीसाठी त्यांची भेट घेतली होती. गप्पा मारल्या आणि एकत्र जेवण केले. मुळात महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत कुणीही कुणाचे शत्रू नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे काही आमचे शत्रू नाहीत. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. उद्धव ठाकरे हे सुद्धा त्यांना आपला नेता मानतात आणि मी सुद्धा मानतो, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केले.
देवेंद्र फडणवीस हे राज्याचे विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांना भेटणे हे काही गुप्तपणे नव्हते. ही काही बंकरमध्ये भेट नव्हती. त्यांच्याशी बऱ्याच दिवसांपासून भेटण्याचा विचार होता. त्यांची जाहीरपणे मुलाखत घेण्याचा विचार होता. याआधीही शरद पवार यांचीही मुलाखत घेण्याचा विचार होता. पण कोरोनाच्या काळामुळे ती झाली नाही. आता फडणवीस यांची मुलाखत घेण्याचा विषय आला आहे. महाराष्ट्रातील काही साहित्यिक संस्था आहेत. त्यांचाही फडणवीस यांची प्रकट मुलाखत घ्यावी असा आग्रह आहे, असंही राऊत यांनी सांगितले.
राज्य सरकारचा कारभार व्यवस्थित सुरू आहे. पाच वर्ष हे सरकार चालणार आहे. शरद पवार यांचे उत्तम मार्गदर्शन मिळत आहे. उद्धव ठाकरे हे सरकारचे नेतृत्त्व करत आहेत, त्यामुळे या भेटीतून कोणतेही समिकरण तयार होणार नाही, असंही राऊत यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेसोबत सरकार बनवण्याचे कारणच नाही: देवेंद्र फडणवीस
मुलाखतीसाठी राऊत यांची भेट झाली होती, त्याचा राजकीय अर्थ काढला गेला’, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यासोबत झालेल्या बैठकीवर भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला आहे. मुलाखतीसाठी राऊत यांची भेट झाली होती, त्याचा राजकीय अर्थ काढला गेला, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.
फडणवीस यांनी राऊत यांच्या भेटीबद्दल आणि महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराबद्दल स्पष्ट भाष्य केले आहे. संजय राऊत यांनी माझी मुलाखत घेणार हे जाहीर केले होते. त्यानंतर त्यांचा फोन आला होता. त्यामुळे मी काही अटी टाकल्या होत्या. त्यामुळे चर्चा करण्यासाठी राऊत यांची भेट झाली. या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही आणि कारणही नाही, असं स्पष्ट खुलासा फडणवीस यांनी केला आहे.
शिवसेनेसोबत कोणतीही चर्चा सुरू नाही, त्यांच्यासोबत सरकार स्थापन करण्याची कोणतीही चर्चा केली नाही. त्यासाठी असे कोणतेही कारण नाही, जे सरकारचे काम सुरू आहे. त्यावर जनतेमध्ये प्रचंड आक्रोश आहे. त्यामुळे हे सरकार आपल्या कृतीमुळे कोसळेल, ज्यावेळी हे सरकार पडेल त्यावेळी आम्ही बघू पण सरकार बनवण्याची कोणतीही घाई भाजपला नाही, असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.