यूपी पोलीस गँगस्टरला खाजगी वाहनातून नेत असल्याने संशय; अपघाती मृत्यूबद्दलही प्रश्नचिन्ह
लखनऊ: विकास दुबे एन्काऊन्टनंतर आज पुन्हा एकदा तशीच घटना उत्तर प्रदेशच्या गँगस्टरसोबत घडली आहे. मुंबईहून पकडण्यात आलेल्या आरोपीला उत्तर प्रदेशचे पोलीस नेत असताना त्यांच्या वाहनाला अपघात झाला. यामध्ये या गँगस्टरचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी दुपारी घडली. या अपघातात काही पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे गुन्हेगाराला पकडण्यासाठी सरकारी वाहनाचा वापर न करता खाजगी वाहनातून घेऊन जात असल्यामुळे गँगस्टरच्या या अपघाती मृत्यूबद्दल संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
लखनऊच्या ठाकूरगंज पोलीस ठाण्यात 2014 मध्ये गँगस्टर फिरोजविरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर फिरोज फरार झाला होता. दरम्यान, फिरोज मुंबईत असल्याचे समोर आले होते. काही दिवसांपूर्वी फिरोजचा पत्ता मिळाला होता. यामुळे पोलीस निरिक्षक जगदीश प्रसाद पांडेय, हवालदार संजीव सिंह यांनी फिरोजचा अटकेत असलेला साथीदार अफजलला घेऊन मुंबईत आले होते. फिरोज नाला सोपाऱ्याच्या झोपडपट्टीत राहत होता. त्याला अटक करून पोलीस शनिवारी रात्री लखनऊसाठी रवाना झाले होते. रविवारी सकाळी मध्य प्रदेशच्या गुना जिल्ह्यातील चांचौडा ठाणे क्षेत्रात पोलीसांचे वाहन पलटी झाले. या अपघातात गँगस्टर फिरोजचा मृत्यू झाला. तर अफजलचा हात मोडला आहे. जगदीश प्रसाद यांनी तेथील पोलीसांना सांगितले की, रस्त्यावर अचानक गाय समोर आली. यामुळे तिला वाचविताना कार पलटी झाली. मात्र, चालकाला झोप आल्याने हा अपघात झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. गुना पोलीस अधिक तपास करत आहेत.
या प्रकरणी ठाकूरगंज पोलीसांची टीम फिरोजला पकडण्यासाठी एका खासगी गाडीतून गेली होती. आता यावर प्रश्न उपस्थित होऊ लागले असून आरोपीस पकडण्यासाठी जायचे होते तर सरकारी वाहन का नेले नाही, असे विचारण्यात येत आहे. नियमानुसार गुन्हेगाराला पकडण्यासाठी सरकारी वाहनाचा वापर करायला हवा होता. त्यामुळे गँगस्टरच्या या अपघाती मृत्यूबद्दल संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.