# पुण्यात ‘या’ सोसायटीत एकही रूग्ण नाही; कोरोनाला रोखण्यासाठी काय केले वाचा सविस्तर.

पुणे: विमाननगर भागातील कोणार्क नगर सोसायटीत अद्याप एकही कोरोना रुग्ण न आढळल्यामुळे सोसायटीचे परिसरात कौतुक केले जात आहे. 518 सदनिका असलेल्या या सोसायटीची मार्च महिन्यापासून, दक्षता घेतल्याने आतमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला नाही. सलग चार महिने दररोज सोसायटीमध्ये सॅनिटायझेशन केले जात होते. सध्या ते तीन दिवसांनी केले जात आहे. मास्क वापरणे, अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर न पडणे या नियमांचे सर्वांनी पालन केल्याने कोरोनाचा अटकाव करण्यात यश आले आहे.

दररोज लागणारा भाजीपाला फळे बारामती, शिरूर या भागातून रहिवाशांसाठी मागवण्यात येत आहे. दूध तसेच डेअरी प्रॉडक्टची सोय सोसायटीच्या आतमध्ये करण्यात आली आहे. 15 जुलैपर्यंत कामवाली, कुक यांना सोसायटीमध्ये कामाला येण्यास बंदी घातली होती. रहिवाशांच्या काही अडचणी व वयानुसार घरातील कामे करता येत नसल्याने आता या कामवाल्या महिलांना सोसायटीमध्ये प्रवेश सुरु झाला असला तरी सोसायटीच्या गेट बाहेर त्यांची ऑक्सिजन लेवल व शरीराचे तापमान तपासणे, तोंडाला बांधण्यासाठी त्यांना मास्क देणे, तसेच त्यांचे हात सॅनिटायझर करणे या गोष्टींचे आजही कटाक्षाने पालन केले जात आहे.

सोसायटीतील होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्यानुसार आयुर्वेदिक औषध व काढा तसेच वाफ घेणे आजही सुरु आहे. ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत आहेत. परवानगी शिवाय कोणी बाहेर जात नाही. बाहेरची व्यक्ती आतमध्ये येऊ शकत नाही. या सर्व नियमांचे पालन रहिवाशांकडून केले जात असल्याने सहा महिने झाले तरी एकही कोरोना रुग्ण या सोसायटीमध्ये आढळला नाही.

कोरोनाला प्रवेश द्वाराबाहेर रोखण्यात यश:  कोरोनाला प्रवेश द्वाराबाहेर रोखण्यात आमच्या  सोसायटीला यश मिळाले ते सर्व रहिवाशांच्या सहकार्यामुळे. सर्वजण नियमांचे पालन करत आहेत. स्वतः बरोबर इतरांची काळजी घेत आहेत, अशी माहिती सोसायटीचे अध्यक्ष संदीप सिंग यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *