# अवघाची माणूस एक व्हावा… -विलास पाटील.

 

माणसातल्या माणूसकीला जेव्हा पाझर फुटू लागतात, तेव्हा भेदाच्या साऱ्या भिंती गळून पडतात. मधले अडथळे दूर झाले की परस्परांशी सांधे जुळू लागतात. त्यातून नवं, आपुलकीचं नातं निर्माण होऊ लागतं. आता तेच घडतं आहे. कोरोणाच्या विषाणू एकातून दुसऱ्यात, दुसऱ्यातून तिसऱ्यात शिरकाव करत संपूर्ण सजीव सृष्टीला एका साखळीत बांधू पाहतोय. तीच साखळी तोडत माणूस जातीभेद, धर्मभेद, मतभेद, मोह, मत्सर, द्वेष, राग, लोभ असे सारे अडथळे बाजूला करत परस्परांना मदतीचा हात देतानाच एकमेकांशी नव्यानं स्वतःला जोडून घेतो आहे. आणखी काय हवं!

‘एक मच्छर, साला आदमी को हिजडा बना देता है।’, हा नाना पाटेकर यांचा अतिशय गाजलेला डायलॉग. तो वेगवेगळ्या प्रसंगी अनेकदा आपण वापरत असतो. पण गेल्या काही दिवसातली एकूण जगभरातली परिस्थिती पाहता मच्छराच्या कैक पटीने सूक्ष्म असणारा एक विषाणू माणसाला माणूस म्हणून घडवू पाहतोय… विशेष म्हणजे त्याच्या या प्रयत्नात सैतानातल्या सैतानाचंही माणूसपण जागं होताना दिसत आहे…

कोविड-१९ या विषाणूने जसा धुमाकूळ घातला आहे तसा जगभरातला क्राईम रेट घसरला आहे. आजूबाजूला थोडसं बारकाईनं पाहिलं तरी आपल्या ही बाब लक्षात येईल. चोऱ्या, मारामाऱ्या, दरोडे, खून, लूट अशा प्रकारचे कुठलेही गुन्हे गेल्या काही दिवसात घडल्याचं ऐकिवात नाही. काही अपवाद सोडले तर एकूण गुन्ह्यांचं प्रमाण शून्यावर यावं इतपत घटलेलं दिसून येत आहे. सांगायचा मुद्दा इतकाच, की मानवजातीवर एखादं आस्मानी संकट आलं, की एकूणच माणूस अधिक नैतिक बनतो. अधिक विवेकाने वागायला लागतो. स्वतःबरोबरच इतरांविषयी वाटणारी काळजी आणि त्या काळजीपोटी एकमेकांच्या मदतीसाठी पुढे धावून जाणं हे आपोआप घडायला लागतं. केवळ भारतातीलच नव्हे, तर जगभरातील बहुतांश लोक लॉकडाऊनमुळे घरबंदी बनलेले आहेत. असं असताना आवश्यक तिथं विविध स्वरुपातल्या मदतीचा ओघ वाढतो आहे. याची अनेक उदाहरणं आपल्या अवतीभोवती दिसत आहेत.

रिक्षावाले सहसा कोणालाही फुकटात कुठे सोडत नाहीत. रिक्षा मोकळी गेली तरी चालेल पण मोफत प्रवास नाही हा बाणा बहुतांश रिक्षावाल्यांचा असतो. पण फेसबुकवर एक अनुभव नुकताच वाचायला मिळाला तो वेगळा आणि मन हेलावून टाकणारा होता. नगर-पुणे रस्त्यावर शिक्रापूर हे एक गाव आहे. तिथून चाकणच्या दिशेने एक खंगलेला कष्टकरी आपल्या लहान मुलीबरोबर पायी चालत निघाला होता. वेळ सकाळी सातची. काही अंतर चालत गेल्यानंतर मागून एक रिक्षा आली. त्या दोघांजवळ येऊन थांबली. कुठे जायचं असं रिक्षावाल्याने विचारलं. ते बाबा म्हणाले, चाकणला निघालोय. त्यांच्या डोक्यावर एक क्रेट होतं. त्यात थोडासा लसून आणि काही वांगी होती. ती विकण्यासाठी ते चाकणला निघाले होते. रिक्षावाल्याने त्यांना बसा मी सोडतो तुम्हाला असं सांगितलं. पण खिशात पैसेच नाहीत, तर तुम्हाला काय देणार. आम्ही आपलं चालतच जातो. तुम्ही जावा, असं बाबा म्हणाले. त्यावर रिक्षावाल्याने पैसे नका देऊ, असंच सोडतो तुम्हाला. मीही चाकणलाच चाललोय, असं म्हणताच ते दोघेही आनंदाने रिक्षात बसले.

प्रवासात रिक्षावाल्याने त्या बाबांची चौकशी केली तेव्हा कळलं की, ते नांदेडहून कामधंद्याच्या शोधात सहकुटुंब शिक्रापूरला आले आहेत. पण कोरोनामुळे त्यांना कुठलंच काम मिळेना. रोजच्या जेवणाचं वांदे झालेले. काय करावं म्हणून एका शेतकऱ्याकडून थोडीशी वांगी आणि थोडासा लसूण असा दोन-पाच किलोचा माल एक क्रेटमध्ये घेऊन ते चाकणला विकायला निघाले होते. दीडशे-दोनशे रुपयांच्या त्या मालाच्या विक्रीतून त्यांना पैसे तरी असे कितीसे मिळणार होते? रिक्षावाल्याने एकूण परिस्थितीचा अंदाज घेत त्या दोघांना थेट एक सामाजिक कार्यकर्त्याकडे नेले. त्यांच्या दोन महिन्याच्या रेशनची आणि घरभाड्याची व्यवस्था झाली. क्रेटमधली सगळी वांगी रिक्षावाल्याने स्वतः विकत घेतली. ७० रुपयांच्या वांग्यासाठी त्याने शंभर रुपये दिले. त्या दोघांचे चेहरे आनंदाने न्हाऊन निघाले होते. त्या मुलीला रिक्षावाल्याने विचारले, बाळ, या शंभर रुपयाचं आता तू काय करणार? ती मुलगी म्हणाली, ‘सर्वात पहिले दोन मास्क घेणार आहे. आमच्यामुळे इतरांना काही त्रास नको व्हायला.’ रिकाम्या पोटी आणि अत्यंत कठीण परिस्थितीतून जात असताना इतरांच्या आरोग्याचा, सुरक्षिततेचा असा विचार मनात येणं ही किती मोठी गोष्ट आहे. ज्याला आपण माणुसकी आणि माणूसपण म्हणतो ते याहून वेगळं असं काही नसतं.

या लॉकडाऊनमुळे खाण्या-पिण्याची सर्व ठिकाणंही बंद आहेत. त्यामुळे जवळ पैसे असूनही काही विकत घेता येत नाही अशा अवस्थेत आज अनेकजण जगत आहेत. गाव, शहरापासून काहीसा दूर बंदोबस्तावर असणारा पोलीस वर्ग तसेच रस्त्याच्या कडेला राहाणारे लोक यांच्यावर आज उपासमारीची वेळ आली आहे. हीच बाब हेरून पुणे-सातारा रोडवरच्या एका हॉटेलचालकाने दालखिचडीची पाकिटं वाटण्याचा उपक्रम सुरू केला आहे.

बहुतेक हॉटेल चालक अन्न वाया घालवतील, पण एखादा गरजवंत दारात आला तर त्याला हकलून देतील. किरकोळ बिलावरून वाद घालतील, प्रसंगी मारामाऱ्या करतील. असे अनुभव अनेकांनी घेतलेले असतील. असं असताना सातबारा नावाने ढाबेवजा हॉटेल चालवणारा हा व्यक्ती रोज दालखिचडीची पाकिटं बनवतो. आपल्या चारचाकी गाडीत भरतो आणि रस्त्याच्या कडेला जो दिसेल त्याला ती वाटतो. रोज गल्ला भरून पैसे देणारा धंदा बंद असताना पदरमोड करून असा सारा उपद्व्याप माणूसपणाशिवाय कोण का करेन?

आजवर फारशी न दिसणारी ही माणूसकी आता जागोजागी हटकून दिसू लागली आहे. कारण संकटच असं आलं आहे, की सैतानालाही माणूस म्हणून जगण्या-वागण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. एकमेकांना सतत पाण्यात पाहणारे दोन सख्खे भाऊ जेव्हा एखादं बाह्य संकट एखाद्यावर येतं तेव्हा दोघेही नकळतपणे एकजुटीने त्याचा मुकाबला करतात आणि एकमेकांच्या पाठिशी खंबीरपणे सहकुटुंब उभे राहतात. तसंच आज काहीसं घडतं आहे.

जगभर थैमान घालणाऱ्या कोरोनाला पराभूत करण्यासाठी अखिल मानवाने त्या विरोधात घरात बसून युद्ध पुकारलं आहे. भारतात मात्र या युद्धाला धर्मयुद्धाचा रंग देण्याचा प्रयत्न काही विकृत मंडळींनी चालवला होता. दिल्लीत पार पडलेल्या तबलीग जमातच्या कार्यक्रमाचं निमित्त त्यासाठी मिळालं आणि साप साप म्हणत भुई थोपटण्याचा प्रकार सुरू झाला. इस्लाम धर्मप्रसाराचं काम करणाऱ्या तबलीगच्या कार्यपद्धतीविषयी मतभेद असू शकतात, नव्हे ते आहेत. मुस्लिमांमधीलही बहुसंख्य लोकांना त्यांचं वागणं आवडलेलं नाही. असं असूनही संपूर्ण भारतीय मुस्लिमांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचा उद्योग सुरू झाला. परंतु मुस्लिमांमधल्या माणुसकीने तो वेळीच हाणून पाडला आहे. त्याची अनेक उदाहरणं देता येऊ शकतात.

मुंबईतल्या वांद्रे भागात राहाणाऱ्या प्रेमचंद महावीर यांचे निधन झाले. तेव्हा अंत्यसंस्कार कसे करायचे असा प्रश्न त्यांच्या मुलासमोर होता. एकही नातेवाईक जवळ नाही. निधनाची वार्ता कळूनही दूरवरचे नातेवाईक लॉकडाऊनमुळे येऊ शकले नाहीत. तेव्हा परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन शेजारी राहाणारे काही मुस्लिम बांधव पुढे आले आणि त्यांनी ‘राम नाम सत्य है’चा नारा देत आपल्या हिंदू शेजाऱ्यावर अंतिम संस्कार केले. सामाजिक जबाबदारीचं भान जपत अशाच पद्धतीने माणूसकी म्हणून गरजेनुसार मुस्लिम समाजातील लोकांना हिंदुंकडूनही मदत केली जात आहे.

माणूस जातीभेद, धर्मभेद, मतभेद, मोह, मत्सर, द्वेष, राग, लोभ असे सारे अडथळे बाजूला करत परस्परांना मदतीचा हात देतानाच एकमेकांशी नव्यानं स्वतःला जोडून घेतो आहे. त्यामुळे या युद्धात कोरोनाचा पराभव अटळ आहे आणि माणूसकीचा विजय निश्चित आहे. मात्र माणूसकीच्या या विजयाची फळं अनंतकाळ चाखता यायला हवी असल्यास अवघाची माणूस एक व्हावा आणि त्याच्यातल्या माणूसकीचा पाझर आजच्या पेक्षा दुपटीने पाझरता राहवा इतकंच! वाईटातून चांगलं घडावं असं वाटत असेल, तर आपल्यातल्या माणूसकीचा पाझर अटू देता कामा नये.
विलास पाटील, पुणे
(लेखक ज्येष्ठ पत्रकार व मनोविकास प्रकाशनाचे संपादक आहेत.)
ईमेल: patilvilas121@gmail.com
मोबाईल: 9423230529

6 thoughts on “# अवघाची माणूस एक व्हावा… -विलास पाटील.

  1. माणसाच्या चांगुलपणावरचा, माणसातल्या माणुसकीचा हा लक्षवेधी आलेख आहे.
    संकट काळात माणसातल्या नैतिकतेला धुमारे फुटतात, नवी उन्नत मूल्यं जन्माला येतात, ही विलास पाटील यांची निरीक्षणे अगदी योग्य आहेत.
    आपल्याबरोबर इतरही तगले पाहिजेत, हा विचारच मला वाटतं, माणसाला इतर प्राण्यांपासून वेगळं करतो.
    हेही खरं, काही माणसं याही काळात विकृती-वासनांचे दर्शन घडवतात, नाही असे नाही, पण प्राबल्य आणि प्रभाव अखेरीस सद् वर्तनाचाच टिकून राहतो.
    करोना संकटाच्या काळात कोणी कोणाला किती लुटले, किती नागवले यापेक्षा लेखात वर्णिलेलले घटना-प्रसंग अधिक लक्षात राहतात, राहतील.
    मी पहिल्यांदाच ही वेबसाइट पाहिली, छान मांडणी असलेली आहे.

  2. माणसाच्या चांगुलपणावरचा, माणसातल्या माणुसकीचा हा लक्षवेधी आलेख आहे.
    संकट काळात माणसातल्या नैतिकतेला धुमारे फुटतात, नवी उन्नत मूल्यं जन्माला येतात, हे विलास पाटील यांची निरीक्षणे अगदी योग्य आहेत.
    आपल्याबरोबर इतरही तगले पाहिजेत, हा विचारच मला वाटतं, माणसाला इतर प्राण्यांपासून वेगळं करतो.
    हेही खरं, काही माणसं याही काळात विकृती-वासनांचे दर्शन घडवतात, नाही असे नाही, पण प्राबल्य आणि प्रभाव अखेरीस सद् वर्तनाचाच टिकून राहतो.
    करोना संकटाच्या काळात कोणी कोणाला किती लुटले, किती नागवले यापेक्षा लेखकाने उधृत केलेले घटना-प्रसंग अधिक लक्षात राहतात, राहतील.
    मी पहिल्यांदाच ही वेबसाइट पाहिली, छान मांडणी असलेली आहे.

  3. Thanks for this wonderful article, Vilas ji. In these troubled times, we need more such articles that focus on the positive and heartwarming aspects of humanity. If we stay united and help each other, we can overcome any and every crisis.

  4. माणसाच्या चांगुलपणावरचा, माणसातल्या माणुसकीचा हा लक्षवेधी आलेख आहे.
    संकट काळात माणसातल्या नैतिकतेला धुमारे फुटतात, नवी उन्नत मूल्यं जन्माला येतात, हे विलास पाटील यांचे निरीक्षण अगदी योग्य आहे.
    आपल्याबरोबर इतरही तगले पाहिजेत, हा विचारच मला वाटतं, माणसाला इतर प्राण्यांपासून वेगळं करतो.
    हेही खरं, काही माणसं याही काळात विकृती-वासनांचे दर्शन घडवतात, नाही असे नाही, पण प्राबल्य आणि प्रभाव अखेरीस सद् वर्तनाचाच टिकून राहतो.
    करोना संकटाच्या काळात कोणी कोणाला किती लुटले, किती नागवले, यापेक्षा लेखकाने वर्णिलेले घटना-प्रसंग अधिक लक्षात राहतात, राहतील.
    मी पहिल्यांदाच ही वेबसाइट पाहिली, छान मांडणी असलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *