# महाराष्ट्रातील १४ विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संप स्थगित; शनिवारपासून कामकाज सुरू.

औरंगाबाद:  डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद, एसआरटी मराठवाडा विद्यापीठ, नांदेडसह महाराष्ट्रातील १४ विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सुरू केलेले आंदोलन आज गुरुवार, १ ऑक्टोबर रोजी स्थगित करण्यात आले आहे. ही माहिती कृती समितीचे राज्य समन्वयक डॉ.कैलास पाथ्रीकर यांनी आज दिली.

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्यासमवेत कृती समितीच्या पदाधिकार्‍यांची ऑनलाईन बैठक झाली. तसेच उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या समवेतही बैठक झाली. येत्या पंधरा दिवसात सातवा वेतन आयोग लागू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर संप तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. १७ ऑक्‍टोबरपर्यंत शासन निर्णय न आल्यास १९ ऑक्टोबरपासून पुन्हा तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती समितीचे राज्य समन्वयक डॉ.कैलास पाथ्रीकर यांनी दिली. यावेळी अध्यक्ष पर्वत कासुरे, सचिव प्रकाश आकडे, ऑफिसर फोरमचे डॉ.दिगंबर नेटके, राज्य सदस्य अनिल खामगांवकर उपस्थित होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठासह सर्व विद्यापीठांचे कामकाज शनिवार, तीन ऑक्टोबर पासून सुरळीतपणे सुरू होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

कुलगुरू यांची भूमिका निर्णायक:
दरम्यान, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आंदोलन काळात मंत्री महोदय यांच्या समवेत महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरू यांची ऑनलाइन बैठक झाली. संप मिटल्याशिवाय परीक्षा घेणे अशक्य आहे, अशी भूमिका कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांनी स्पष्टपणे घेतली. तसेच कर्मचाऱ्यांनीही समन्वयाची भूमिका घ्यावी, असे आवाहन कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांनी केले होते. मंत्री महोदय व कृती समिती या दोघांनीही या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला.

कुलसचिवासंह प्राध्यापकांची भेट:
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास गुरुवारी (दि.एक) कुलसचिव डॉ.जयश्री सूर्यवंशी यांनी भेट देऊन कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. तसेच एमआयएमचे ज्येष्ठ नेते डॉ.गफार कादरी, राज्य विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष डॉ.कुणाल खरात, स्वाभिमानी मुप्टा संघटनेचे नेते डॉ.शंकर अंभोरे, बामुक्टोचे नेते डॉ.उमाकांत राठोड, माब्टाचे नेते डॉ.भगवानसिंग ढोबाळ, कोहिनूर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.मजहर खान आदींनी भेट दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *