पुणे: राज्यात गेल्या आठवड्यापासून थांबलेला पाऊस पुन्हा सुरू झाला आहे. मध्यमहाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, पुणे, सातारा, सोलापूर, नगर, उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नाशिक, नंदुरबार आणि कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई या भागात हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ दिला आहे. 5 ऑक्टोबरपर्यंत या भागात मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस बरसणार आहे. तसेच ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत. दरम्यान, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागातही पाऊस बरसणार आहे.
राज्यातील सर्वच भागात गेल्या आठवड्यापासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यानंतर वातावरणात बदल होत कमाल तापमानात वाढ झाली. परिणामी उष्णता तसेच उकाड्यात वाढ झाली आहे. शुक्रवारपासून (दि.2) पावसाने पुन्हा हजेरी लावण्यास सुरूवात केली आहे. राज्यात 5 ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पाऊस सुरू राहणार आहे. बंगालच्या उपसागरातील उत्तर पश्चिम भागापासून ओडिशा, उत्तर आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीलगत कमी दाबाचा पट्टा, अरबी समुद्राच्या मध्यपूर्व भागात चक्रीय स्थिती तर दक्षिण छत्तीसगड भागावर चक्रीय स्थिती कार्यरत आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा पाऊस सक्रीय झाला आहे.
मान्सून 24 तासात मध्यप्रदेशातून माघारी फिरणार: राजस्थानच्या पश्चिम भागापासून 28 सप्टेंबरपासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. येत्या 24 तासात उत्तरप्रदेश, मध्यप्रदेशाच्या उत्तर पश्चिम भागातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे.