नांदेड: केंद्रातील भाजपच्या मोदी सरकारने शेतकरी व कामगार यांना देशोधडीला लावणारी विधेयके बहुमताच्या बळावर मंजूर करून घेतली आहेत. मात्र, शेतकरी व कामगारांची फसवणूक करणारी ही विधेयके राज्यात लागू होणार नाहीत, अशी ग्वाही राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी दिली आहे.
नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने शेतकरी व कामगारांची फसवणूक करणार्या विधेयकाच्या विरोधात शुक्रवार, 2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीदिनी प्रतिकात्मक बैलगाडी लाँगमार्चचे आयोजन केले होते. या लाँगमार्चच्या समारोप प्रसंगी अशोकराव चव्हाण यांनी मोदी सरकारच्या धोरणावर कडाडून टीका केली आहे.
लाँगमार्चची सुरूवात शुक्रवारी सकाळी 10.30 वाजता रेल्वेस्थानकासमोरील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून झाली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज व महापालिकेतील माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत लाँगमार्चचा समारोप करण्यात आला. यावेळी अशोकराव चव्हाण बोलत होते.
यावेळी अशोकराव चव्हाण म्हणाले की, मोदी सरकारने बहुमताच्या बळावर पास केलेल्या कायद्यामुळे शेतकरी व कामगार भविष्यात अडचणीत येणार आहेत. मोदी सरकार व्यापारी व उद्योजकांना हाताशी धरून इंग्रजाच्या काळातील ईस्ट इंडिया कंपनीसारखे वागत असल्याचा आरोप केला आहे. कोणतेही विधेयक पास करण्यापूर्वी राजकीय पक्षांना विचारात घेणे अपेक्षित होते. मात्र, राजकीय पक्षाशी चर्चा न करताच विधेयक पास करण्यात आले. मोदी सरकारने यापूर्वी नोटबंदी करून सर्व सामान्यांना दोन महिने बँकेच्या रांगेत उभे केले. तर जीएसटी लागू करून व्यापार्यांनाही अडचणीत आणले आहे. संसदेत नुकतीच कृषी व कामगार विधेयके मंजूर करण्यात आली. या विधेयकामुळे शेतकरी व कामगारांच्या अडचणी वाढणार आहेत. शेतमाल, जीवनावश्यक वस्तू याचा साठा करून ठेवण्याची मर्यादा पूर्णपणे काढून टाकल्यामुळे शेतकरी व ग्राहकांचा फायदा होणार नसून साठेबाजी करणार्या भांडवलदारांचा फायदा होणार आहे.
सध्या देशात हुकूमशाही सुरू आहे. यासाठी सर्वांनी संघटित होऊन सर्वसामान्यांचे हिताचे सरकार यावे यासाठी या पुढील निवडणुकीत आपल्या विचाराच्या पक्षाशी खंबीरपणे पाठी रहा असे आवाहन केले आहे.
याप्रसंगी माजी खा.तुकाराम रेंगे,
आ.अमरनाथ राजूरकर, आ.मोहनराव हंबर्डे, आ.रावसाहेब अंतापूरकर, मंगलाताई निमकर यांचीही भाषणे झाली. प्रास्ताविक काँग्रेसचे नांदेड तालुकाध्यक्ष अॅड.नीलेश पावडे तर सूत्रसंचालन प्रवक्ते संतोष पांडागळे यांनी केेले. यावेळी जि.प.अध्यक्षा सौ.मंगाराणी अंबुलगेकर, महापौर मोहिनी येवनकर आदी उपस्थित होते.