संग्रहित छायाचित्र
पुणे: सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असून, सर्व व्यवहार ठप्प आहेत. अशा वेळी भारतीय हवामान खात्याने बळीराजाला दिलासा देणारी बातमी दिली आहे. यंदा सरासरी एवढा पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. जून ते सप्टेंबर या नैर्ऋत्य मोसमी काळात (मान्सून) सरासरीएवढा म्हणजे 96 ते 104 टक्क्यादरम्यान पाऊस पडणार आहे.
हवामान खात्याने पहिला दीर्घकालीन हवामानाचा अंदाज (लाँग पिरियड अॅव्हरेज) आज बुधवारी जाहीर केला. यामध्ये नमूद केलेल्या अंदाजापेक्षा पाच टक्के कमी किंवा अधिक पाऊस पडू शकतो, असे सांगण्यात आले. यंदाच्या मान्सूनवर एल निनोचे सावट राहील, मात्र एल निनो कमजोर राहणार असून मान्सूनच्या उत्तरार्धात एन निनो असेल. मान्सूनवर त्याचा प्रतिकूल परिणाम जाणवणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, मान्सूनचा दुसरा अंदाज अधिक अचूक राहणार असून मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात भारतीय हवामान खात्याकडून तो वर्तविला जाईल.