औरंगाबाद: विमुक्त जाती भटक्या जमातीच्या नैतृत्वानी वसंतराव नाईक यांच्या विचारांची फारकत घेतली आहे. बंजारा समाज एक भिन्न संस्कृती जोपासणारा आदिम समाज आहे. इंग्रजाच्या 1871 च्या जन्मजात गुन्हेगार ठरवणाऱ्या काळ्या कायद्याचा बळी पडलेला हा समाज आहे. एक वेगळी संस्कृती, वेगळी भाषा, वेगळी वेश व केशभूषा असणारा आदिम जीवन पद्धती जगणारा समाज म्हणून तो ओळखला जातो. म्हणून त्यांची सरकार दरबारी ट्राईब म्हणूनच नोंद आहे. विशेष म्हणजे या समाजाची एक संस्कृती, एक बोलीभाषा, एक पेहराव असूनही हा समाज वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या प्रवर्गात विभागलेला आहे. कांही राज्यात अनुसूचित जमाती, कांही राज्यात अनुसूचित जाती, कांही राज्यात विमुक्त भटक्या तर कांही राज्यात तो ओबीसी प्रवर्गात मोडतो. राष्ट्रीय पातळीवर हा जो असंतुलितपणा आहे तो दूर करुन एक जमात, एक संस्कृती, एक बोलीभाषा असणाऱ्या समाजाचे राष्ट्रीय पातळीवर एकच आरक्षण प्रवर्ग असावा ही या समाजाची मागील अनेक वर्षांपासूनची मागणी आहे.
बोली भाषेला राजभाषेचा दर्जा, विजाभजसाठी वसंतराव नाईक संशोधन आणि विकास संस्था (वनार्टी) स्थापन करून त्याचे मुख्यालय औरंगाबाद येथे करावे. नॉन क्रिमीलेअर हे असंविधानिक तत्व वगळावे, लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्यात यावे, सर्व योजनांना अंदाजपत्रकीय तरतूद करण्यात यावी, राजकीय प्रतिनिधित्व देण्यात यावे. या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी समाजाचे पुढारी, नेते फारसे प्रयत्न करीत नाहीत. जो तो समाजाच्या नावाने सत्तेचा मलिदा खाण्यात व्यस्त आहे. आणि म्हणून सामाजिक कार्यकर्ते प्रा.फुलसिंग जाधव यांच्या नेतृत्वाखाली व डॉ.अशोक पवार यांच्या समन्वयातून आपल्या नेत्यांच्या निष्क्रियतेच्या निषेधार्थ 2 ऑक्टोबर रोजी राज्यभर आत्मक्लेश उपोषण कोरोनानिमित शासनाने जाहीर केलेल्या नियमांचे पालन करीत आपापल्या घरी केले.
या आंदोलनात देशभरात समाजाच्या सर्व संघटना मैदानात उतरल्या आहेत. त्यात प्रमुख्याने गोरसेना, राष्ट्रीय बंजारा टायगर्स, राष्ट्रीय बंजारा परिषद, ऑल इंडिया बंजारा टायगर्स, भटके विमुक्त महिला परिषद, गोर बंजारा समाज विकास मंच, अखिल भारतीय बंजारा सेना, अर्पण आस्था सामाजिक संस्था, अखिल भारतीय बंजारा युवा सेना, राष्ट्रीय बंजारा क्रांती दल, वसंतराव नाईक बंजारा परिवर्तन चळवळ, महाज्योती बचाव कृती समिती, मराठवाडा विचारमंच आदी संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या.
आंदोलन यशस्वी करण्यासाठी
ज्येष्ठ साहित्यिक मोहन नायक, डॉ. अशोक पवार, प्रा.रवींद्र राठोड, सुरेश राठोड, विष्णूपंत पवार, राजू पवार, श्रीकांत राठोड, डॉ.प्रियंका राठोड, विद्या चव्हाण, अंजू राठोड, जीवन चव्हाण, डॉ.गणपत राठोड, डॉ.कृष्णा राठोड, डॉ.मुरली राठोड, प्रा. पी.टी. चव्हाण, विलास राठोड, अनिल चव्हाण, राजेश चव्हाण, के.आर. आडे, अशोक पवार , सुनील राठोड, प्रा.रविराज चव्हाण, प्रेमचंद राठोड, अधिवक्ता युवराज राठोड आदींबरोबर कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले असल्याची माहिती या अनोख्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे प्रा.फुलसिंग जाधव व डॉ.अशोक पवार यांनी दिली. बंजारा हिल गारखेडा औरंगाबाद येथील निवासस्थानी वनमंत्री संजय राठोड यांच्यावतीने उपमहापौर राजेंद्र जंजाळ व प्रा.शेषेराव जाधव यांनी डॉ.अशोक पवार यांना शरबत देऊन उपोषणाची सांगता केली.