ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्रा. पुष्पा भावे यांचे नुकतंच दीर्घ आजाराने निधन झालं. आजच्या एकूणच सामाजिक अस्वस्थतेच्या वातावरणात पुष्पाबाईंचं जाणं कोणाही विचारी माणसाच्या मनाला चटका लावणारं आहे.
आणीबाणी असो की रमेश किणी, त्या लढण्यासाठी हिमतीने मैदानात उतरल्या. नाटकाच्या सेन्सॉरविरोधात बोलायचं असो की शिवसैनिकांच्या गुंडगिरीविरोधात, त्या आवाज न चढवता, पण ठामपणे बोलत राहिल्या. पदवीचा मराठीचा अभ्यासक्रम पातळ होऊ नये, यासाठी जिवापाड प्रयत्न करत राहिल्या, तशाच स्त्री अभ्यासाचं पद्धतीशास्त्र मांडत स्त्रियांच्या प्रश्नाला एक सामाजिक आयाम देत राहिल्या…
जितक्या आवेशाने त्यांनी लढे दिले, तितक्याच अलवारपणे वेगवेगळ्या संदर्भांतले तिढे सोडवले… याच अनुषांगाने विद्या बाळ यांनी पुष्पाबाईंविषयीच्या काही आठवणी एका लेखात मांडल्या आहेत. विद्या बाळही आज आपल्यात नाहीत. परंतु मनोविकास प्रकाशनाने नुकत्याच प्रकाशित केलेल्या ‘लढे आणि तिढे – चिकित्सक गप्पा… पुष्पाबाईंशी’ या पुस्तकातील त्यांचा हा संपादित लेख पुष्पाबाईंना आदरांजली म्हणून देत आहोत.
पुष्पा मुंबईकर, मी पुणेकर. वयानं मी पुष्पापेक्षा 3/4 वर्षांनी मोठी, तरीसुद्धा तशा आम्ही समवयस्क म्हणण्यासारख्या; पण खरं सांगायचं तर पुष्पाला अनेक संदर्भांत, मी प्रामाणिकपणे माझ्यापेक्षा ‘मोठी’च मानते! तिची नाट्यक्षेत्रामधली जाण, तिचा सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातला सहभाग, त्या क्षेत्रातला तिचा जनसंपर्क आणि त्या त्या परिस्थितीचं आकलन, तिचं आणीबाणीच्या काळातलं काम, प्राध्यापक म्हणून मराठी भाषेचा अभ्यास आणि अध्यापन, मुंबईतल्या रमेश किणी प्रकरणात शिवसेनेच्या ऐन दहशतीच्या काळात निर्भयपणे ठाम उभं राहाणं, या सगळ्यात मी कधीच तिच्याबरोबर नव्हते आणि बरोबरीची तर आजही नाही.
असं असूनही आमची मैत्री आहे. आम्ही प्रथम केव्हा/कुठे भेटलो वगैरे मैत्रीचा इतिहास आणि भूगोल मला आठवत नाही. कदाचित पुष्पाला तेही आठवत असेल. तिचं स्मरण फारच पक्कं आहे. म्हणूनच तर इथेही ती ‘मोठी’ आणि मी लहान! पण मैत्री हे नातंच असं असतं, ज्यात वयाचा, ज्येष्ठ-कनिष्ठतेचा, मानापानाचा, स्पर्धेचा मुद्दा आड येत नाही. त्यामुळेच आमची मैत्री आहे – साधारणपणे 15-20 वर्षांपासूनची.
‘मिळून सार्याजणी’ या आमच्या मासिकाचीही पुष्पा मैत्रीण, मार्गदर्शक आहे. मासिकाच्या निमित्ताने होणार्या तिच्या माझ्या गप्पा, चर्चा यांच्यात आणखी एका उपक्रमाने भर टाकली. ‘इंडियन असोसिएशन ऑफ वुमेन्स स्टडीज’ ही राष्ट्रीय पातळीवरची एक संस्था आहे. तिच्या वतीने भारतभर वेगवेगळ्या राज्यांत दरवर्षी परिषद घेतली जाते. हा सगळा कारभार/व्यवहार सोयीसाठी अर्थातच इंग्रजीतून होतो. त्यामुळे इंग्रजी न जाणणार्यांना ते थोडं गैरसोयीचं ठरत होतं. यासाठी पुष्पाच्या पुढाकाराने अशा प्रकारची एक परिषद पुण्यात घ्यावी असं ठरलं. बहुधा 1996 साली ही परिषद पुण्यात झाली. त्या वेळी या राष्ट्रीय संस्थेची पुष्पा उपाध्यक्ष होती. परिषद पुण्यात घेताना, पुण्याच्या पातळीवरचं सहकार्य करताना आम्ही काही गोष्टी एकत्रितपणे केल्या.
त्यानंतर लगेचच ‘सार्याजणीं’च्या आयुष्यात एक महत्त्वाची घटना घडली. पुष्पाने ‘सार्याजणीं’साठी, ‘राजकारणाच्या अंगणात’ हे शीर्षक देऊन, राजकारणातल्या महत्त्वाच्या घडामोडींबद्दल टिप्पणी करणारी एक दुपानी लेखमाला लिहिण्याचं कबूल केलं. सर्वसामान्य माणसं आणि विशेषत: स्त्रिया राजकारण हा विषय बाजूला टाकतात. त्यांच्यापर्यंत, सोप्या प्रकाराने, राजकारण पोचवण्याचा हा प्रयत्न होता. जवळपास दोन वर्षं ही लेखमाला चालू होती. पुष्पाने स्वत: राजकारणात कोणत्याही पक्षाची सभासद म्हणून कधी काम केलं नाही; पण राजकारणातल्या घटना, पक्षोपपक्षांमधले व्यवहार, अनेक कार्यकर्त्यांबरोबरची देवघेव या सगळ्यामधून, तिची राजकीय परिस्थितीबाबतची निरीक्षणं महत्त्वाची ठरतात. म्हणूनच तिच्या या लेखमालेमुळे, ‘सार्याजणी’च्या काही वाचकांच्या अंगणात आणि काहींच्या मनातसुद्धा राजकारण पोचलं!
दर महिन्यासाठी हे लेखन होतं, त्यामुळे आमची दोघींची पुण्या-मुंबईच्या दरम्यान फोनवरची बातचीत वाढली. त्यातूनच मग व्यक्तिगत मैत्रीबरोबर ‘सार्याजणीं’बरोबरची पुष्पाची जवळीक वाढत चालली. 1999 साल हे ‘सार्याजणीं’च्या वाटचालीचं महत्त्वाचं वर्ष होतं. या वर्षी आम्ही दहा वर्षांचा टप्पा गाठला. मासिकाची सुरुवात ऑगस्ट 1989 मध्ये झाली. नानासाहेब गोरे पहिल्या अंकाच्या प्रकाशन समारंभाचे अध्यक्ष होते. आपल्या भाषणात ते म्हणाले होते, ‘विद्याताई, हा उपक्रम छान आहे; पण तो चालू राहाणं तितकंच अवघड आहे.’ वडीलकीच्या नात्याने त्यांनी दिलेला इशारा दरवर्षी आठवतच, पाचव्या वर्षीच्या वाढदिवसालाच आम्ही रौप्यमहोत्सवी वर्ष म्हणून टाकलं होतं! या पार्श्वभूमीवर दहाव्या वर्षाचा ‘उंबरठा’ ओलांडणं म्हणजे खरोखरीच सीमोल्लंघनासारखाच आनंद साजरा करणं होतं. त्या वर्षीचा वाढदिवस प्रथमच बालगंधर्व रंगमंदिरात करण्याचं धाडस आम्ही केलं आणि विशेष म्हणजे त्या कार्यक्रमाला रंगमंदिर भरून गेलं आणि प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
या प्रतिसादाला इतर अनेक कारणं होती; पण एक महत्त्वाचं कारण म्हणजे, पुष्पाने लिहिलेला ‘कहाणी सार्याजणीची’ हा कार्यक्रम! याच्या लेखनासाठी, ऑगस्टचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून, पुष्पा केव्हाच कामाला लागली होती. दहा वर्षांतले एकशेदहा अंक (दिवाळीचा जोडअंक असल्यामुळे), त्यातले दरवर्षीचे तीन विशेषांक, असा केवढा तरी पानांचा ढीग काही महिने पुष्पा वाचत होती. वाचता वाचता त्यातून काही वेचत होती. त्यातूनच दशवार्षिक अहवालाऐवजी, एक समृद्ध संहिता पुष्पाने लिहून तयार केली. या सार्या अंकांतल्या कथा, कविता, मुलाखती, लेख, संवाद, मैतरणी गं मैतरणी – अशा संपादकीय ते वाचकपत्रं – या सगळ्यामधल्या वैशिष्ट्यपूर्ण मजकुराची पुष्पाने एक सुरेख गोधडीच तयार केली. ‘मिळून सार्याजणीं’च्या पहिल्या अंकाचं मुखपृष्ठ एका गोधडीचंच होतं – त्याच्याशी नातं जोडणारी! आपली दुसरी मैत्रीण दीपा श्रीराम हिने एखाद्या नाट्यकृतीसारखा या लेखनाला इतका कमालीचा देखणा साज चढवला की बस्स!
या कार्यक्रमासाठी सिनेदिग्दर्शक केतन मेहता, पत्रकार मणिमाला, कार्यकर्ती माया वानखेडे असे नामवंत पाहुणे होतेच. त्यांच्याच साक्षीने ‘कहाणी सार्याजणी’ची गोधडी, सुमारे पंचवीस कलाकारांच्या मदतीने रंगमंचावर उलगडली गेली. तिचं अपूर्व स्वागत झालं!
या कहाणीच्या लेखनासाठी, पुष्पा वेळ काढून मधूनमधून पुण्याला यायची. माझा छोटासा फ्लॅट नचिकेत सोसायटीत, तिसर्या मजल्यावर होता. त्यातच ‘सार्याजणीं’चं ऑफिस नांदत होतं आणि त्याच इमारतीत, पहिल्या मजल्यावर माझ्या दादावहिनीचा फ्लॅट होता. ते नेहमी मुंबईत राहात आणि अधूनमधून पुण्यात येत. या फ्लॅटमध्ये ‘कहाणी सार्याजणीची’ आकार घेत होती. ‘सार्याजणीं’च्या एकेका वर्षाच्या बांधून घेतलेल्या अंकाच्या संचाच्या पसार्यात पुष्पा वाचत आणि लिहीत असायची. सुमारे आठ-दहा हजार पानांमधून पुष्पाने साहित्य निवडलं. एकमेकांशी नाजूक हाताने जोडत, त्यातून एक सुंदर संहिता तयार झाली!
पुष्पा मराठीची प्राध्यापक आणि मुख्य म्हणजे अभ्यासक. शब्द अतिशय काटेकोरपणे वापरणारी. तिचं बोलणं/लिहिणं नेहमीच वजनदार. या कामात तिची विलक्षण स्मरणशक्तीही तिच्या पुढ्यात हात जोडून उभी! त्यामुळेच एवढ्या सार्या अंकांच्या पानापानांमधून फारशी टिपणं न करताच पुष्पा झरझर लिहीत गेली. तिच्या या लेखनाच्या काळात, आम्ही दोघी, माझ्या घराच्या कोपर्यावरच्या ‘लक्ष्मण’ नावाच्या हॉटेलमध्ये जेवायला जात असू. गरमागरम भाकरी, पिठलं, मटकीची उसळ, शेवटी ग्लासभर ताक अशा साध्या जेवणाचाही पुष्पाच्या या निर्मितीत वाटा होता.
पुष्पाची बुद्धी इतक्या विविध क्षेत्रांत काम करत असली तरी पुष्पाला लेखनाचा खूप कंटाळा! शिवाय सगळं काही तिच्या डोक्यात पक्कं शिरून, टिपलेल्या निरीक्षणांचा, माणसांचा, त्यांच्याबरोबरच्या भेटीगाठींचा, संभाषणांचा – संगणकासारखा संग्रह करून बसणार! त्यामुळे लिहिणं, टिपणं करणं याची तिला गरज भासत नसावी. या पार्श्वभूमीवर माझ्यासारखी मैत्रीणच पुष्पाला धाडसाने ‘निरक्षर’ म्हणायची. आता नाही हिंमत करत मी, कारण आता दोन पुस्तकं तिच्या नावावर रुजू आहेत! जुन्या काळात, ‘माणूस’ साप्ताहिकातली तिची नाटकांची समीक्षा गाजली होती. मधल्या या ‘निरक्षरते’च्या काळाचा अंत होऊन ती ‘सार्याजणीं’साठी लिहिती झाली. अनेकांनी यासाठी आमचा हेवा केला. एकदा खेळकरपणे, डॉ. नरेंद्र दाभोलकरांनीही पुष्पाला सुचवलं होतं – ‘आम्हीही आहोत म्हटलं इथे तुमचं लेखन प्रसिद्ध करण्यासाठी!’ तसंच एकदा श्री. रा.प. नेन्यांच्या वाढदिवसाच्या अनौपचारिक कार्यक्रमातही, बहुधा स्वत: नेन्यांनीच ‘पुष्पाताई फक्त ‘सार्याजणीं’तच लिहितात,’ असं मिस्कीलपणे म्हटल्याचं आठवतं.
पुष्पा आणि मी अनेकदा, काही परिषदांना, संमेलनांना एकत्र जात असू. त्यापैकी बहुतेक वेळा आम्ही एकाच खोलीत निवासासाठी असल्यामुळे, एकत्र, बरोबर राहाण्यातून जी एक जवळीक वाढते ती वाढत गेली. त्याही वेळी पुष्पाच्या बोलण्यातून तिची बहुश्रुतता लक्षात येई. इथे मला हैदराबादला, अस्मिता रिसोर्स सेंटरने घेतलेल्या एका परिषदेची आठवण सांगावीशी वाटते. भारताच्या दहा राज्यांतल्या, सर्जनशील लेखिकांच्या बरोबर, कार्यशाळा घेऊन त्या सार्यांसह एक परिषद ‘अस्मिता’ आणि ‘वुमेन्स वर्ल्ड’ या दोन संस्थांनी बोलावली होती. सुमारे दीड-दोनशे मराठी-अमराठी स्त्रियांच्या या परिषदेत, किती तरी अमराठी लेखिकांची आणि पुष्पाची आधीचीच ओळख होती. काहींची प्रत्यक्ष ओळख नव्हती, तरी त्यांच्यापैकी अनेकींच्या लेखनाशी मात्र पुष्पा परिचित होती!
या परिषदेतल्या प्रज्ञा पवार, नीरजा, मंगला गोडबोले, गौरी देशपांडे आणि आम्ही दोघी असा आमचा एक मराठी गट झाला होता. नीरजा, प्रज्ञा आमच्यापेक्षा तरुण, उत्साही. त्या हैदराबादमध्ये भटकायला जाणार होत्या. त्यांना गावात कुठे बिर्याणी चांगली मिळेल, कुठे फुलांचा बाजार आहे, कुठे आर्टिफिशियल ज्वेलरीची दुकानं आहेत, तर कुठे चांगल्या साड्या खरेदी करता येतील, याची माहिती पुष्पाने पुरवली. जवळच्यांखेरीज अनेकांना माहीतही नसेल, पुष्पा अत्यंत नजाकतीने पारंपरिक सामिष/निरामिष पदार्थ उत्तम बनवते! स्वत: असते लंकेची पार्वती, अंगावर मुख्यत्वे खादीची साडी; पण या सार्या सौंदर्यपूर्ण साड्या, दागिन्यांबाबत तिच्याकडे माहिती आणि चोखंदळ दृष्टीसुद्धा आहे.
पुष्पा फारच कमी लिहिते हे खरं असलं तरी पुष्पाचं इंग्रजी भाषेतील आणि मराठीतील ताज्या पुस्तकांचं वाचन सतत सुरूच असतं. त्यांचे संदर्भ वेळोवेळी तिच्या भाषणात किंवा तिच्याबरोबरच्या गप्पांमध्ये येत असतात. पुस्तकांची नावं, लेखकांची नावं आणि त्या लेखनाचा विषय/कथानक हे सारं तिच्या स्मरणात असतं, पण या ताज्या वाचनाइतकीच तिची जुन्या काळातल्या अभ्यासाची आठवण पक्की असते. याबाबतचाही एक अनुभव मला आवर्जून सांगावासा वाटतो. एके वर्षीच्या विचारवेध संमेलनामधली हकिगत आहे. एका सत्रात ‘एकोणिसाव्या शतकातलं महाराष्ट्रातल्या विचारवंतांचं योगदान’ अशा आशयाचा विषय होता. पुष्पा त्यावर तासभर व्यवस्थित बोलली. तिला मी जेव्हा भाषणानंतर भेटून सांगितलं, ‘हातात एवढाही कागदाचा तुकडा न घेता किती छान मांडणी केलीस तू!’ यावर ही हसून म्हणाली, ‘अगं, कागदावर टिपणं कसली करते, ते अमुक अमुक वक्ते आले नाहीत म्हणून मला ऐन वेळी सकाळी सांगितलं बोलायला!’
केवळ महाराष्ट्रातच नाही, तर देशाच्या पातळीवर पुष्पाच्या नावाला एक मान्यता आहे. ‘साहित्य अकादमी’सारखी संस्था असो, ‘पाकिस्तान इंडिया पीपल्स फोरम फॉर पीस अँड डेमॉक्रसी’सारखी भारत आणि पाकिस्तानमधील मैत्रभाव जोपासू पाहणारी संघटना असो, स्त्रीवाद्यांचा राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरचा परिसंवाद/परिषद असो – पुष्पाचं नाव संयोजकांच्या डोळ्यासमोर येतंच. याचं कारणच हे आहे की, राजकारण, साहित्य किंवा स्त्रीवादाच्या संदर्भातील जगभर अलीकडेच चर्चेत आलेला मॅस्क्युलिनिटीचा – मर्दानगीचा विषय असो, त्या त्या विषयात कुठे काय घडतं आहे याकडे पुष्पाचे डोळे, कान असतातच; पण डोकं आणि पायही असतात. पाय या अर्थाने की पुष्पा प्रचंड प्रवास करते. पूर्वी तर सर्रास लाल एसटीनेच ती प्रवास करायची. आता वयपरत्वे रेल्वे, विमान किंवा कारने जाते. छोट्या छोट्या गावांतल्या संघटनांची शिबिरं, मेळावे, व्याख्यानमाला यात इतके वर्षं कोकण, विदर्भ, मराठवाडा असा सर्वदूर प्रवास ती करत आली आहे, त्यामुळे त्या त्या मातीची/जातिधर्माची स्पंदनं तिने अनुभवलेली असतात. तिच्या बोलण्याला याचं एक विशेष अस्तर आहे आणि हे तिचं बलस्थान आहे.
या सगळ्याच्या बरोबरीने पुष्पाच्या व्यक्तिमत्त्वात आणखी एक हळवा, प्रेमळ असाही धागा आहे. आपल्या जवळच्यांचे वाढदिवस ती लक्षात ठेवून त्यांना फोन करणार. कुणाची तब्येत बरी नसल्याचं कळलं तर फोनवरून किंवा समक्ष भेट घेणार आणि कधी कधी अकारणच ‘आठवण आली म्हणून’ छानशी वस्तू, पुस्तक, साडी भेटही देणार! एकूणच विद्वत्तापूर्ण, गंभीर, मार्गदर्शक अशा या मैत्रिणीमध्ये आपल्या नावाला साजेसा एक हळुवार, प्रेमळ झरा झुळझुळत असल्याचा माझा अनुभव आहे!
पंचाहत्तरी ओलांडली तरी आणि मधुमेहाने हात पकडला असला तरी, पुष्पा आजही तिच्या सर्व आघाड्यांवरच्या कामात व्यग्र असते. आज कोणत्याही कार्यक्रमात तिची ओळख करून देताना हमखास येणारा उल्लेख, रमेश किणी प्रकरणात तिने निर्भयपणे घेतलेल्या ठाकरेविरोधी भूमिकेचा असतो. मीही हा लेख लिहिताना त्याचा पुन्हा उल्लेख करते याचं एक कारण आहे. देशभरातल्या ताज्या लोकसभा निवडणुकीत भाजपने लागोपाठ दुसर्यांदा फार मोठं यश मिळवून, सत्तेत महत्त्वाचा वाटा उचलला आहे. पंतप्रधानपदावर नरेंद्र मोदी आणि अनेक राज्यांतलं मुख्यमंत्रिपद भारतीय जनता पक्षाकडे.
भारताच्या औद्योगिक आणि अणुशक्ती क्षेत्रातल्या प्रगतीवर/विकासावर या सरकारचा विशेष जोर आहे; पण या देशात श्रीमंतांपेक्षा गरिबांची आणि शेतकर्यांची संख्या शतपटीने अधिक आहे. त्यांच्या जीवन-मरणाचा प्रश्न महत्त्वाचा की पैसेवाल्यांच्या संपत्तीच्या वाढीचा प्रश्न महत्त्वाचा, असा प्रश्न विचारण्याची गरज माझ्यासारख्या, सामान्य नागरिकाला वाटते. शिवाय भारताचं सामर्थ्य केवळ ऐहिक विकासावर अवलंबून आहे की भारतामधल्या माणसांच्या सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक विकासाचं महत्त्व त्याहून अधिक किंवा निदान तेवढंच आहे, याचाही फैसला आता व्हायला हवा. स्त्रियांवर, दलितांवर होणारे अत्याचार आणि दडपशाही वाढते आहे. पेरुमल मुरुगनसारख्या तामिळनाडूमधील लेखकाची, हिंदुत्ववादी आणि लेखकाच्याच गोंडूर जमातीच्या लोकांनी केलेली भीषण गळचेपीची घटना फार जुनी नाही.
अशा प्रकारे जुन्या जळमटी परंपरांना डोक्यावर घेत, फुले, आगरकर, कर्वे, आंबेडकरांच्या स्त्री-पुरुष समतेच्या समृद्ध संकल्पनांना गाडून टाकू बघणारा हा सांस्कृतिक, धार्मिक दहशतवाद आज वेगवेगळ्या स्वरूपांत डोकं वर काढत आहे. ठाकर्यांच्या दहशतीच्या ऐन दिवसांत, पुष्पा एकटी, रमेश किणी खून प्रकरणात ताठ उभी राहिली. तिने ना सुरक्षा मागितली, ना ती धमक्यांना घाबरली! जवळपास तशाच प्रकारचा माहोल सभोवती व्यापक स्वरूपात उठाव करत असताना पुष्पाने दाखवलेली हिंमत आणि लोकशाहीवरची निष्ठा, भारताला ‘हिंदुराष्ट्र’ म्हणून घोषित करू इच्छिणार्यांसमोर ताकदीने उभी राहण्याची गरज आहे.
डॉ. दाभोलकरांवरच्या खुनी हल्ल्यानंतर त्याच प्रकारचा हल्ला कॉम्रेड गोविंदराव पानसर्यांसारख्या, तळागाळातल्यांबरोबर काम करत, विवेकवाद जोपासणार्या खंबीर नेत्यावर झाला! पाठोपाठ पुरोगामी कन्नड लेखक एम. एम. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांचेही याच पद्धतीने खून केले गेले. हल्ला करणार्यांची पद्धत तीच आणि ज्याच्यावर हल्ला करायचा त्याची जातही तीच! जातीचा विवेकवादी, विज्ञानवादी, लोकशाहीवादी माणूस आणि याच मूल्यांचा पाठपुरावा सातत्याने करणारा माणूस हीच त्यांची खरी जात. अशी माणसं थोडीच असतात. त्यांनाच नाहीसं करू पाहणार्या शक्ती वाढत असताना, पुष्पासारख्या निर्भय आणि कणखर माणसांची नितांत आवश्यकता आज आहे.