सुशांत सिंह प्रकरणी मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा सवाल
मुंबई: महाराष्ट्र आणि महाराष्ट्र पोलीसांना बदनाम करणारे ‘मराठी भय्ये’ काही न्यूज चॅनल्स आणि भाजपा नेते माफी मागणार का? असा प्रश्न आता जितेंद्र आव्हाड यांनी विचारला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट करुन त्यांनी भाजपावर टीका केली आहे.
“सुशांत सिंह प्रकरणात काही न्यूज चॅनल्स, मराठी भय्ये आणि भाजपा नेत्यांनी महाराष्ट्र आणि महाराष्ट्र पोलीसांची नाहक बदनामी केली. आता सीबीआयनेच मान्य केलं आहे की, सुशांतने आत्महत्याच केली. महाराष्ट्र आणि महाराष्ट्र पोलीसांना बदनाम करणारे मराठी भय्ये आता माफी मागणार का?” असं ट्विट आव्हाड यांनी केलं आहे.
अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने १४ जून रोजी आत्महत्या केली. त्यानंतर त्याने आत्महत्या केली नसून त्याची हत्या झाली आहे. सुशांत हा बॉलिवूडमधल्या घराणेशाहीचा बळी आहे. बॉलिवूडमधल्या कंपूशाहीने त्याचा बळी घेतला आहे अशी टीका झाली. यासंदर्भात वृत्तही काही वाहिन्यांवर झळकले. त्यानंतर तडकाफडकी हा तपास मुंबई पोलिसांकडून सीबीआयकडे देण्यात आला. दरम्यान, एम्स रुग्णालयाने सुशांतचा मृ्त्यू ही आत्महत्याच आहे, असा अहवाल दिला. त्यानंतर आता शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून भाजपावर टीका होत आहे. दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सीबीआयने लवकरात लवकर अहवाल सादर करावा म्हणजे सत्य लोकांसमोर येईल, अशी मागणी केली होती.