विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र
पुणे: उत्तरप्रदेशातील हाथरस येथील बलात्कारच्या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला आहे. या पीडितेला उत्तरप्रदेश पोलीसांनी पहिल्यांदा बंदी करून ठेवले, कोणाला भेटण्याची परवानगी दिली नाही. या पीडितेच्या कुटुंबाला भेटण्यासाठी काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी काल हाथरस येथे कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी गेल्या होत्या. या दरम्यान उत्तरप्रदेश पोलीस प्रशासनाने त्यांना थांबविण्यासाठी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यातील एक पुरुष पोलीस कर्मचाऱ्याने गांधी यांचा अक्षरशः कुर्ता पकडून ओढले. याबाबत महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी खेद व्यक्त केला. याबाबत त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पत्र लिहून संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचे निलंबन करण्याची मागणी केली आहे.
बंदोबस्तादरम्यान महिला पोलीस या ठिकाणी असणे आवश्यक होते. परंतु असे झाले नाही असा प्रश्न देखील यावेळी डॉ.गोऱ्हे यांनी या पत्रात प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच या कुटुंबाला उत्तरप्रदेश पोलीसांचे सहकार्य लाभत नाही परिणामी हे सर्व प्रकरण पोलीसांच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित करणारे असल्याने या कुटुंबाला केंद्रीय पोलीसांचे संरक्षण देण्यासाठी देखील विचार व्हावा, असेही या पत्रात म्हटले आहे.
या घटनेत ज्या-ज्या अधिकारी यांच्याकडून दिरंगाई झाली किंवा ज्यांनी संवेदनहिनतेने काम केलं त्यांच्यावरती कारवाई व्हावी. त्याचबरोबर एक महिन्याच्या आत या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. त्याचबरोबर याप्रकरणच्या खटल्यात चांगले सक्षम सरकारी वकील मिळाले पाहिजेत, अशी अपेक्षा डॉ.गोऱ्हे यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, उत्तरप्रदेश येथील लोकप्रतिनिधी सुरेंद्र सिंह आणि रणजित श्रीवास्तव यांनी या घटनेवरून महिलांच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित करून महिलांनाच बदनाम करण्याचे कारस्थान या लोकप्रतिनिधींकडून होत असल्याबाबत डॉ.गोऱ्हे यांनी खेद व्यक्तकेला आहे. तसेच या नेत्यांवर कडक कारवाई करण्याची मागणीही गृहमंत्री शहा यांच्याकडे केली आहे.