# पुण्यातील कचरावेचक महिलेची कोरोनाग्रस्तांसाठी 15 हजारांची मदत; गृहमंत्र्यांनी केले कौतुक.

 

पुणे: कोरोनामुळे आलेल्या संकटावर मात करण्यासाठी समाजातील विविध स्तरातून मदतीचे अनेक हात पुढे आले. अनेकांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी, पीएम केअर्स फंडमध्ये मदत दिली. अशीच मदत पुण्यातील एका कचरा वेचणाऱ्या महिलेने करून इतरांसमोर एक आदर्श ठेवला आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत या महिलेने 15 हजार रुपयांची मदत केली आहे. गवळणबाई मुरलीधर उजगरे असे या दानशूर महिलेचे नाव आहे. विशेष म्हणजे या महिलेचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्वीट करून कौतुक केले आहे.

गवळणबाई मुरलीधर उजगरे या गेल्या 20 वर्षांपासून कचरा गोळा करतात. यावरच त्यांचा चरितार्थ चालतो. माहिन्याला अवघे पाच ते सहा हजार रुपये मिळतात. पण तरीही गवळणबाईंच्या मनाच्या श्रीमंतीची तुलना कशासोबतच होऊ शकणार नाही. आतापर्यंत साठवलेले सगळे पैसे त्यांनी कोरोनाशी लढण्यासाठी देऊन टाकले. कोरोनाविरोधात लढण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र कराळेकर व छावाप्रमुख धनंजय जाधव यांच्या माध्यमातून Online मुख्यमंत्री फंडात ५००० रूपये आणि माता जिजाऊ प्रतिष्ठान ५००० रूपये, जीवनज्योती प्रतिष्ठान ५००० रूपये अशा सेवाभावी संस्थांना एकूण 15 हजार रुपयांची मदत त्यांनी केली आहे.

कोरोनाच्या या संकटातही त्या कचरा वेचण्याचं काम करतच आहेत. “धोका आहे म्हणून जर सगळेच घरात बसले तर कम कसं होणार? असा प्रश्नही त्यांनी विचारला.
गवळणबाई उजगरे पुण्यातील विश्रांतवाडी धानोरी भागातील भीमनगरमधल्या झोपडपट्टीत राहतात. अशा परिस्थीतीमध्येही त्यांचं धैर्य आणि इच्छाशक्ती कमी झालेली नाही. दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विश्रांतवाडी पुणे येथील स्वच्छता सेवक मावशींचे ट्वीट करून कौतुक केले आहे व अशा संवेदनशील आणि लढवय्या व्यक्तींची महाराष्ट्राला गरज आहे, असे म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *