पदव्युत्तर व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा १५ ऑक्टोबरपासून
नांदेड: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या उन्हाळी २०२० पदवी, पदव्युत्तर, पदविका व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या ऑनलाईन बैठकीत कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांच्या उपस्थितीत सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.रवि सरोदे, यांनी कळविले आहे.
तीन वर्षीय पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा १९ ऑक्टोबर पासून तर पदव्युत्तर व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा १५ ऑक्टोबर पासून प्रारंभ होणार आहेत. तीन वर्षीय पदवी (बी.ए .,बी.कॉम.,बी.एस्सी.) या अभ्यासक्रमाच्या पाचव्या व सहाव्या सत्राच्या परीक्षा विद्यापीठामार्फत १९ ते ३१ ऑक्टोबर २०२० दरम्यान घेण्यात येणार आहेत. या परीक्षा ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने बहुपर्यायी प्रश्नसंच देऊन घेण्यात येणार आहेत. पदव्युत्तर व व्यावसायिक दोन वर्षीय अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या व चौथ्या सत्राच्या, तीन वर्षीय व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमाच्या पाचव्या व सहाव्या सत्राच्या, चार वर्षीय पदवी अभ्यासक्रमाच्या सातव्या व आठव्या सत्राच्या आणि पाच वर्षीय अभ्यासक्रमाच्या नवव्या व दहाव्या सत्राची परीक्षा १५ ते २० ऑक्टोबर दरम्यान होणार आहेत. बहिस्थ अभ्यासक्रमासाठी प्रवेशित विद्यार्थांच्या द्वितीय वर्षाच्या परीक्षा २४ ते २८ ऑक्टोबर दरम्यान होणार आहेत. या सर्व परीक्षा विद्यापीठाने निर्धारित केलेल्या परीक्षा केंद्रावर होणार आहेत.
पदवी अभ्यासक्रमाचे जे विद्यार्थी अंतिम सत्राच्या परीक्षेकरिता परीक्षार्थी आहेत आणि जर त्यांचे काही विषय बॅकलॉग असतील तर अशा विद्यार्थांचे तिसऱ्या व चौथ्या सत्राच्या परीक्षा ७ ते १८ ऑक्टोबर दरम्यान त्यांच्या महाविद्यालयीन स्तरावर होणार आहेत. पदव्युत्तर व व्यावसायिक अभ्यासक्रमाचे ज्या विद्यार्थांचे अंतिम सत्राच्या परीक्षेकरिता परीक्षार्थी आहेत अशा विद्यार्थांचे जर काही विषय बॅकलॉग असतील तर त्यांची परीक्षा २१ ते २८ ऑक्टोबर दरम्यान त्यांच्या महाविद्यालयीन स्तरावर होणार आहे. बॅकलॉगच्या परीक्षासुद्धा बहुपर्यायी प्रश्नसंचद्वारे घेण्यात येणार आहेत. महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर प्रश्नसंच काढून ऑनलाईन अथवा ऑफलाईन परीक्षा घ्याव्यात आणि पदवीचे २४ ऑक्टोबर पर्यंत तसेच पदव्युत्तर ३० ऑक्टोबर पर्यंत गुणयाद्या, उत्तरपत्रिका, प्रश्नपत्रिका, उत्तरसूची इत्यादी ऑनलाईन पद्धतीने विद्यापीठास सादर कराव्यात.
या सर्व परीक्षा बहुपर्यायी पद्धतीनुसार असणार आहेत. पदवी अभ्यासक्रमाकरिता ४० गुणांकरिता ४० प्रश्न असतील व त्याकरिता एक तासाचा वेळ असणार आहे. या परीक्षेसाठी निगेटिव्ह मार्किंग असणार नाही. पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षेचा प्रश्नसंच ५० मार्काचा असणार आहे. त्यापैकी ४० प्रश्न सोडवायचे आहेत. यासाठी एक तासाचा वेळ देण्यात येणार आहे. या परीक्षा विद्यार्थांच्या आवडीनुसार अथवा सोयीनुसार ऑनलाईन अथवा ऑफलाईन घेण्यात येणार आहेत. विषयानुरूप वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेत स्थळावर लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. हे सर्व वेळापत्रक विद्यापीठाच्या सर्व संलग्नित महाविद्यालयामध्ये, परिसरातील सर्व संकुले, लातूर येथील उपकेंद्र, परभणी उपकेंद्र आणि हिंगोली येथील न्यू माॅडेल डिग्री कॉलेज यांना लागू राहणार आहे.