एक लाख ६४ हजार विद्यार्थी; ‘ऑनलाईन’मध्ये अडचण आल्यास ‘ऑफलाईन‘ परीक्षा देता येणार
औरंगाबाद: डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदवी व पदव्यूत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा शुक्रवार, नऊ ऑक्टोबर पासून सुरु होत आहेत. या परीक्षेत चार जिल्ह्यातून एक लाख ६४ हजार विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत, दरम्यान, या परीक्षेपासून कोणीही विद्यार्थी वंचित राहणार नाही, याची काळजी घ्यावी, अशा सूचना कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी दिल्या आहेत.
विद्यापीठाच्या पदवी व पदव्यूत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा ९ ते ३१ ऑक्टोबर या दरम्यान होणार आहेत. यासाठी एकूण १ लाख ६४ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यासाठी चार जिल्ह्यात २५० केंद्र असून सकाळी ९ ते १ व दुपारी २ ते ६ अशा या दोन टप्यात परीक्षा होत आहेत. परीक्षेसाठी ५० बहुपर्यायी प्रश्न (एमसीक्यू) असून एक तासाची वेळ आहे. परीक्षेसाठी १ लाख १४ हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाईन तर ५० हजार विद्यार्थ्यांनी ऑफलाईन पध्दतीने परीक्षा देण्यासाठी नोंदणी केली आहे. प्राचार्य व आयटी समन्वयकाची कार्यशाळा घेऊन योग्य त्या सूचना दिल्या आहेत. चार जिल्ह्यातील २५० केंद्रावर ही परीक्षा होत आहे. या केंद्रावर कोविड च्या पार्श्वभूमीवर ‘फिजीकल डिस्टन्सिंग‘ ठेऊन परीक्षा घेण्याच्या सूचना कुलगुरु यांनी दिल्या आहेत. चारही जिल्ह्यातील या केंद्राना विद्यार्थ्यांची यादी व सर्व माहिती पाठविण्यात आली आहे, अशी माहिती परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.योगेश पाटील यांनी दिली. प्रकुलगुरु डॉ.प्रवीण वक्ते, अधिष्ठाता डॉ.वाल्मिक सरवदे, डॉ.भालचंद्र वायकर, डॉ.चेतना सोनकांबळे, उपकुलसचिव डॉ.गणेश मंझा, डॉ.प्रताप कलावंत यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी परीक्षेच्या यशस्वीतेसाठी प्रयत्नशील आहेत.
कुलगुरुंचा प्राचार्यांशी संवाद: दरम्यान, कुलगरु डॉ.प्रमोद येवले यांनी गुरुवारी (दि.आठ) सकाळी ११ ते २ तसेच दुपारी २ ते ५ दरम्यान शंभरहून अधिक महाविद्यालयांच्या प्राचार्यांशी दूरध्वनीद्वारे संवाद साधला. परीक्षा घेण्यासाठी येणारी अडचण तसेच मार्गदर्शक सूचनाही त्यांनी केल्या. परीक्षेचे हॉलतीकिट असणा-या सर्वांना परीक्षा देण्यास कोणतीही अडचण येऊ देऊ नये, असेही कुलगुरु यांनी म्हटले आहे.
परीक्षेपासून कोणही वंचित राहू नये यासाठी प्रयत्न: दरम्यान, बहुपर्यांयी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक पेपरसाठी सुमारे चार तासाचे ड्युरेशन ठेवण्यात आले आहे. जर काही कारणाने ऑनलाईन परीक्षा देण्यास अडचण आली तर जवळच्या कोणत्याही महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांनी ऑफलाईन पध्दतीने परीक्षा द्यावी. संबंधित महाविद्यालयांनी हॉलतीकिट व ओळखपत्र पाहून त्यांना परीक्षेला बसू द्यावे. कोणीही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही, याची काळजी सर्वांनी घ्यावी, असेही कुलगुरु डॉ.प्रमोद येवले म्हणाले.
विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी प्राध्यापकांची टीम: पदवी आणि पदव्यूत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन पध्दतीने होत आहेत. यादरम्यान विद्यार्थी, पालक, अध्यापक यांना काही अडचणी आल्यास किंवा शंका असल्यास यासाठी प्राध्यापक, कर्मचाऱ्यांची ‘हेल्पलाईन’ साठी टीम तयार केली आहे. यामध्ये प्रा.सोनाली क्षीरसागर, प्रा.कावेरी लाड, प्रा.विलास इप्पर, प्रा.भास्कर साठे, प्रा.अमोल खंडागळे, डॉ.सचिन भुसारी, डॉ.प्रविण यन्नावर, डॉ.रमेश चौंडेकर, राजेंद्र गांगुर्डे, एस.एन. मुळे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. परीक्षेसंदर्भातील परिपत्रके विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहेत.