पुणे: मान्सूनचा परतीचा प्रवास राज्यातून सुरू होण्यापूर्वी सर्वच भागात पाऊस जोरदार हजेरी लावत असतो. पुढील चार दिवस (दि.13) राजाच्या सर्वच भागात हवामान विभागाने ‘यलो अर्लट’ जारी केला आहे. परिणामी अनेक भागात वादळीवारे, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडणार आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, पालघर, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यात पुढील चार दिवस (दि.13 ऑक्टोबर पर्यंत) तुफान पाऊस पडणार आहे. काही जिल्ह्यात तर अतिवृष्टी होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. विशेषत: मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना अतिवृष्टीचा तडाखा बसण्याची शक्यत आहे.
राज्यात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे ऑक्टोबर हिटचा तडाखा वाढला होता. या हिटमुळे राज्यातील बहुतांश शहरांच्या कमाल तापमानाचा पारा 33 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला होता. आता मात्र 13 ऑक्टोबरपर्यंत पावसाचा तडाखा बसणार असल्यामुळे कमाल आणि किमान तापमानात घसरण होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार अंदमान समुद्रावर कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून, तो 10 ऑक्टोबरला बंगालच्या उपसागराकडे वळणार आहे. त्यानंतर या कमी दाबाच्या पट्ट्याचे रूपांतर तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात होणार आहे. याचबरोबरच हा तीव्र कमी दाबाचा पट्टा 12 ऑक्टोबरला उत्तर आंध्रप्रदेशाच्या किनारपट्टीकडे सरकणार आहे. या शिवाय आंध्रप्रदेशाच्या किनारपट्टीवर चक्रीय स्थिती तयार होऊन ती दक्षिण आंध्रप्रदेशाची किनारपट्टी पार करून पुढे सब हिमालयीन भाग, पश्चिम बंगाल व ओडिशापर्यंत जाणार आहे. या सर्व स्थितीमुळे राज्यात परतीचा मुसळधार पाऊस बरसणार आहे.