मुंबई: कालच मध्य रेल्वेने मुंबई आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या पाच एक्स्प्रेस सुरु करण्याचा निर्णय जाहीर केला असताना आता त्यात वाढ करून आणखीन आठ एक्स्प्रेस सुरु करणार असल्याचे सांगितले आहे. मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नांदेड, लातूर आणि नागपूर अशा महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या स्पेशल एक्स्प्रेस मध्य रेल्वे सुरु करणार आहे. येत्या 11 तारखेपासून या एक्स्प्रेस धावतील, असे मध्य रेल्वेच्या वतीने सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्र सरकारने राज्यांतर्गत रेल्वेसेवा सुरु करण्यास परवानगी दिल्यानंतर मंत्रालयाने आता महाराष्ट्रातील मुख्य शहरांना जोडणाऱ्या स्पेशल एक्स्प्रेस हळूहळू सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या मार्गावर जास्त मागणी आहे अशा मार्गांवर प्रथम एक्स्प्रेस गाड्या सुरु करण्यात येत आहेत. त्यानुसार पहिल्या वेळेस मुंबई पासून पुणे, नागपूर, सोलापूर आणि गोंदिया या शहरांना जोडणाऱ्या एक्स्प्रेस सुरु करण्यात आल्या आणि त्यानंतर दुसऱ्या वेळेस मुंबईपासून कोल्हापूर, नांदेड आणि लातूर या शहरांना जोडणाऱ्या एक्स्प्रेससोबत पुण्याला महाराष्ट्रातील इतर शहरांना जोडण्यासाठी एक्स्प्रेस सुरु करण्यात आल्या आहेत.