मुंबई: मराठा आंदोलकांच्या विरोधानंतर महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने एमपीएससी ची परीक्षा पुढे ढकलली. या बाबतची घोषणा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली. ११ ऑक्टोबर रोजी एमपीएससी ची परीक्षा होणार होती. मात्र, कोरोना आणि लॉकडाउनचं संकट याचा विचार करुन हा निर्णय घेण्यात आला. यावेळी अशोक चव्हाण, जयंत पाटील उपस्थित होते.
मराठा आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर या प्रकरणी मंत्रिमंडळाची बैठक आज झाली. या बैठकीत ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झाला आहे. २ लाख ६० हजार विद्यार्थी या परीक्षेला बसणार होते. मात्र, कोरोना आणि लॉकडाउन याचा सारासार विचार केला. विद्यार्थ्यांना अभ्यासाला वेळ मिळाला पाहिजे, हा विचार आम्ही केला त्यामुळे आम्ही ही परीक्षा पुढे ढकलत आहोत. परीक्षा कधी होणार याचा निर्णयही लवकरच घेतला जाईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. जे विद्यार्थी परीक्षेला पात्र आहेत तेच विद्यार्थी जेव्हा परीक्षा जाहीर होईल तेव्हा त्या परीक्षेसाठी एकही विद्यार्थी अपात्र ठरणार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आहे.