परभणी: कोरोनामुळे एका तरुण आयएएस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. ते २०१५ बॅचचे त्रिपुरा केडरचे अधिकारी होते. परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील आयएएस अधिकारी सुधाकर शिंदे (वय३५) यांचा आज कोरोनामुळे पुण्यात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन वर्षाची मुलगी, वडील, चार भाऊ, तीन बहिणी असा परिवार आहे.
सुधाकर शिंदे हे त्रिपुरा केडरचे अधिकारी होते. परंतु सुटीसाठी १५ दिवसांपूर्वी कुटुंबियांसह गावी आले होते. त्यानंतर त्यांना कोरोनाची बाधा झाली. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर नांदेडमधील श्री गुरुगोविंदसिंगजी शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, त्यानंतर त्यांची परिस्थती खालावत गेली असता त्यांना पुढील उपचारासाठी औरंगबाद येथे दाखल करण्यात आले. औरंगाबादहून त्यांना पुण्यातील रुबी हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. सुधाकर शिंदे हे अर्थ मंत्रालयात सहसचिव पदावर कार्यरत होते. त्यांचे शालेय शिक्षण परभणी येथील नवोदय विद्यालयात झाले होते. औरंगाबाद येथून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते स्पर्धा परीक्षांकडे वळले होते.