लातूर: जिल्ह्यात 18 हजार 143 रुग्ण् पॉझिटिव्ह असून कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या माध्यमातून 3 लाख 90 हजार 31 व्यक्तींची कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात आलेली आहे. यामध्ये 94 हजार 757 व्यक्ती या हाय रिस्क कॉन्टॅक्ट होत्या तर 2 लाख 61 हजार 289 व्यक्ती या लो रिस्क कॉन्टॅक्टस् असल्याने लातूर जिल्हा राज्यात कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये दुसरा असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर परगे यांनी कळविले आहे.
कोविड-19 बाधित रुग्णांच्या निकट सहवासितांचा सर्वे करुन रुग्णांचे हाय रिस्क, लो रिस्क कॉन्टॅक्ट शोधून काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली. त्यानुसार हाय रिस्क सहवासितांचे संस्थात्मक विलगीकरण करुन आवश्यकतेप्रमाणे स्वॅब तपासणी करण्यात आली व त्यामधून पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना व त्यांच्या सहवासितांचे विलगीकरण करण्यात आले. तसेच कोविड-19 बाधित रुग्णांचे असलेले लो रिस्क सहवासितांना गृह विलगीकरण करण्यात आले, व त्यांचे पुढील 14 दिवस आरोग्य कर्मचारी यांच्या माध्यमातून आरोग्य तपासणी करुन आवश्यकतेप्रमाणे संदर्भ सेवा देण्यात आली.
या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या माध्यमातून हाय रिस्क कॉन्टॅक्टस्च्या तपासणीतून कोविड-19 रुग्ण लवकरात लवकर शोधून काढण्यात आले. या तपासणीतून जे रुग्ण् पॉझिटिव्ह आले, त्यांचे तत्काळ संस्थात्मक अथवा गृह विलगीकरण करुन उपचार करण्यात आले. जे व्यक्ती लो रिस्क कॉन्टक्टस् होते त्यांचे गृह विलगीकरण करण्यात आले. त्यामुळे Transmission chain लवकर खंडित करण्यामध्ये यश आले, त्यामुळे रुग्णांची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी फार मोठी मदत झाली व पर्यायाने मृत्यूदर कमी होण्यासाठी मदत झाली.
कोविड-19 या आजाराचा प्रसार होऊ नये व संभाव्य मृत्यू टाळण्यासाठी आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे व नियमितपणे तोंडावर मास्क वापरावा, 6 फूटाचे शारीरिक अंतर ठेवावे, वारंवार हात धुवावेत, गर्दीच्या ठिकाणी अनावश्यक जाण्याचे टाळावे असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष राहूल केंद्रे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती श्रीमती भारतबाई सोळुंके, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर परगे, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ.मोनिका पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष हिंडोळे यांनी केले आहे.