औरंगाबाद: डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदवी व पदव्यूत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा शुक्रवारपासून (दि.नऊ) सुरु झाल्या आहेत. ९ ते ३१ ऑक्टोबर या दरम्यान दररोज दोन सत्रात या परीक्षा होत आहेत. परीक्षेसाठी ३३० केंद्र असून सकाळी ९ ते १ व दुपारी २ ते ६ अशा या दोन टप्प्यात ९ व १० ऑक्टोबर रोजी परीक्षा घेण्यात आली. उद्यापासून होणाऱ्या ऑनलाईन परीक्षेसाठी दोन्ही सत्रामध्ये प्रत्येकी दोन तासाची वेळ वाढवण्याचा निर्णय कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांनी घेतला आहे. त्यानुसार पहिले सत्र सकाळी ९ ते ३ व दुपारचे सत्र २ ते ८ या दरम्यान होईल. वाढलेली वेळ केवळ ऑनलाईन परीक्षेसाठीच असेल, असे परीक्षा विभागाचे उपकुलसचिव गणेश मंझा यांनी कळविले आहे.
पहिल्या सत्रात १४ हजार ७५१ जणांनी दिली ऑनलाईन परीक्षा:
पदवी, पदव्यूत्तर अभ्यासक्रमाच्या
परीक्षेत दुसऱ्या दिवशी शनिवारी दोन्ही सत्राचे पेपर सुरळीत पार पडले. सकाळच्या सत्रात ११ हजार ७५१ जणांनी ऑनलाईन परीक्षा दिली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदवी व पदव्यूत्तार अभ्यासक्रमांच्या परीक्षा शुक्रवारपासून (दि.नऊ) सुरु झाल्या आहेत. चार जिल्ह्यातून एक लाख ६४ हजार विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. ९ ते ३१ ऑक्टोबर या दरम्यान दररोज दोन सत्रात या परीक्षा होत आहेत. परीक्षेसाठी ३३० केंद्र असून सकाळी ९ ते १ व दुपारी २ ते ६ अशा या दोन टप्यात परीक्षा होत आहेत. परीक्षेसाठी ५० बहुपर्यायी प्रश्न (एमसीक्यू) असणार असून एक तासाची वेळ आहे. १ लाख १४ हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाईन तर ५० हजार विद्यार्थ्यांनी ऑफलाईन पध्दतीने परीक्षा देण्यासाठी नोंदणी केली. दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात १४ हजार ७५१ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षा दिली. तर पहिल्या दिवशी सकाळच्या सत्राला एकूण ११ हजार ५०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ७ हजार २०० विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा यशस्वीरित्या दिली. तर उर्वरित विद्यार्थ्यांनी ऑफलाईन पध्दतीने परीक्षा दिली. ऑनलाईन परीक्षा देतांना काही तांत्रिक अडचण आली तर त्या
विद्यार्थ्यांना जवळच्या केंद्रात जाऊन ऑफलाईन पध्दतीने परीक्षा देण्याची मुभा देण्यात आली.
येत्या ३१ ऑक्टोबर पर्यंत ही परीक्षा होत आहे. या सर्व केंद्रावर कोविडच्या पार्श्वभूमीवर फिजीकल डिस्टन्सिंग ठेऊन परीक्षा देण्याच्या सूचना देण्यात आल्या. प्रकुलगुरु डॉ.प्रवीण वक्ते, परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.योगेश पाटील, अधिष्ठाता डॉ.वाल्मिक सरवदे, डॉ.भालचंद्र वायकर, डॉ.चेतना सोनकांबळे, उपकुलसचिव डॉ.गणेश मंझा, डॉ.प्रताप कलावंत यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी परीक्षेच्या यशस्वीतेसाठी प्रयत्नशील आहेत.
कुलगुरुंनी घेतला आढावा:
दरम्यान, कुलगरु डॉ.प्रमोद येवले यांनी आठ व नऊ ऑक्टोबर रोजी विविध महाविद्यालयांच्या प्राचार्यांशी दूरध्वनीद्वारे संवाद साधला. परीक्षा घेण्यासाठी येणारी अडचण तसेच मार्गदर्शक सूचनाही त्यांनी केल्या होत्या. आज दिवसभरात संवैधानिक अधिकारी, अधिकारी तसेच प्राचार्यांकडून परीक्षेचा आढावा त्यांनी घेतला.
अधिकाऱ्यांच्या विविथ केंद्रांना भेटी:
प्र-कुलगुरू डॉ प्रवीण वक्ते यांनी देवगिरी महाविद्यालय व परिसरातील केंद्रांना भेट दिली. प्राचार्य डॉ शिवाजी थोरे, उपप्राचार्य डॉ.अनिल आर्दड व डॉ.दिलीप खैरनार यांनी केंद्रात करण्यात आलेल्या उपाय योजनांची माहिती दिली. अधिष्ठाता डॉ.चेतना सोनकांबळे (शिवछत्रपती व वसंतराव नाईक महाविद्यालय), वाल्मीक सरवदे मिलिंद कला तसेच मिलिंद विज्ञान महाविद्यालय), डॉ.भालचंद्र वायकर (विवेकानंद महाविद्यालय), उपकुलसचिव डॉ.दिगंबर नेटके (कोहिनूर व चिस्तिया महाविद्यालय खुलताबाद, रामदास आठवले महाविद्यालय चौका) यांच्यासह प्रोग्रामर दिवाकर पाठक, कक्ष अधिकारी भगवान फड, अनिल खामगावकर, विजय दरबस्तवार यांनी या केंद्रांना भेटी दिल्या. सोमवारी देखील अधिकारी विविध महाविद्यालयांना भेटी देणार आहेत. दरम्यान, दिव्यांग मुलांसाठी विद्यापीठाच्या वतीने लेखनिक उपलब्ध करून देण्यात आला. तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी त्यांना घरपोच प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका देण्याची तसेच परत केंद्रात आणून देण्याची व्यवस्था केली.