चितमपल्ली यांनी नांदेडमधील आठवणींना दिला उजाळा
नांदेड: नांदेडशी माझा कायम ऋणानुबंध राहिला असून सोलापूरात वास्तव्यात गेल्यानंतरही हा ऋणानुबंध कायम राहणार आहे, येथील आदरातिथ्यामुळे मी भारावलो असून बोलण्यासाठी शब्द फुटत नाहीत.. हृदय भरून आले अशा शब्दात ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. दरम्यान, आपला लेखन प्रवास उलगडताना ते म्हणाले की, नरहर कुरूंदकर व राम शेवाळकर यांच्यामुळे मी लेखन करण्यास शिकलो.
विदर्भातील विशेषतः नागपूरमधील दीर्घ वास्तव्यानंतर चितमपल्ली हे सोलापूरात आपले पुतणे श्रीकांत चितमपल्ली यांच्याकडे वास्तव्य करणार असून ते नागपूरहून सोलापूरकडे निघाले असता रविवार, 11 ऑक्टोबर रोजी नांदेडला आले. येथील शासकीय विश्रामगृहात होकर्णे परिवाराने त्यांचे आदरातिथ्य केले. येथील अर्ध्या तासाच्या भेटीत चितमपल्ली यांनी नांदेडमधील अनेक आठवणींना उजाळा दिला.
कै.नरहर कुरूंदकर व कै.राम शेवाळकर यांच्यामुळे मी लेखन करण्यास शिकलो. होळीवरील संस्कृत पाठशाळेत यज्ञेश्वर शास्त्री यांच्याकडे संस्कृत शिकलो, अशी आठवणही त्यांनी सांगितली. नांदेडमध्ये त्यांनी वनविभागाच्या सेवेची सुरूवात केली होती. इस्लापूर येथील आदिवासी बांधवांबरोबर केलेल्या वास्तव्याच्या आठवणीही त्यांनी यावेळी सांगितल्या.
साडेचार दशक विदर्भात राहिलो असून तिथे समृध्द आयुष्य जगलो, आदिवासी भाषेचा अभ्यास या ठिकाणी केला असून 30 पुस्तके लिहिली आहेत. आता सोलापूरला जात आहे, तिथे जंगल नाही; परंतु तिथे झाडे लावण्याचा कार्यक्रम हाती घेणार आहे. प्रत्येकाने रक्तचंदनाची झाडे लावली पाहिजेत, असे ते यावेळी म्हणाले.
सोलापूरातील वास्तव्यात आपण विविध कोशांचे काम पूर्ण करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पर्यावरण हा विषय केवळ वर्गात शिकवून चालणार नसून प्रत्यक्षात मुलांना जंगलात नेवून या विषयाचे ज्ञान दिले पाहिजे, असेही ते यावेळी म्हणाले. त्यांचा होकर्णे परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी श्रीकांत चितमपल्ली , संगीता बोयने, सुभाष बोयने, विजय होकर्णे, अरूणा होकर्णे, महेश होकर्णे, लक्ष्मण संगेवार, एल.के. कुलकर्णी, शंतनू डोईफोडे, उमाकांत जोशी, राजेश कुलकर्णी, देविदास फुलारी, लक्ष्मण संगेवार, राजेश कुलकर्णी, प्रभाकर कानडखेडकर आदींची उपस्थिती होती.
नाचणीच्या खिरीचा घेतला आस्वाद:
मारूती चितमपल्ली यांची आवड लक्षात घेऊन अरूणा होकर्णे यांनी खासकरून नाचणीची स्वादिष्ट खीर आणली होती. या खिरीचा आस्वाद त्यांनी घेतला व..उत्तम झाली… असा अभिप्रायही लगेच दिला. त्यामुळे होकर्णे दाम्पत्य सुखावले होते. नाचणीच्या खिरीचे महत्व सांगताना ते म्हणाले की, नाचणीची खीर मला खूप आवडते पोषक आणि पचायला हलकी असते. जंगलात दीर्घ काळ घालवला त्या वेळी नाचणीच्या खिरीमुळे दिवसभर तहानसुद्धा लागत नाही.