राज्यातील सहा जिल्हे रेड, चार ऑरेंज तर पंधरा जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी
पुणे: राज्यातील मध्यमहाराष्ट्र, कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यातील सर्वच भागात 17 ऑक्टोबर पर्यंत मेघगर्जना, सोसाट्याचा वारा, विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार आहे. राज्यातील सहा जिल्ह्यांना रेड, चार जिल्ह्यांना ऑरेंज तर पंधरा जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
उत्तर आंध्रप्रदेशाच्या किनारपट्टीवर अतितीव्र कमी दाबाचा पट्टा असून, पुढील 12 तासात हा पट्टा तेलंगणकडे सरकून त्याचे रूपांतर तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात होणार आहे. दरम्यान, या पट्ट्याचा ताशी वेग 55 ते 75 किलोमीटर राहणार आहे. तेलंगणकडून हा तीव्र कमी दाबाचा पट्टा विदर्भ, मराठवाडा, मध्यमहाराष्ट्र पार करून पुढे उत्तर कोकण त्यानंतर दक्षिण गुजरातकडे 15 ऑक्टोबर पर्यंत सरकणार आहे.
कशामुळे पडणार आहे मोठा पाऊस:
वास्तविक पाहता समुद्राकडून तीव्र कमी दाबाचा पट्टा जमीनीकडे सरकल्यानंतर त्याची तीव्रता कमी होत जाते. मात्र, हा तीव्र कमी दाबाचा पट्टा जमीनीकडून पुन्हा अरबी समुद्राकडे जात असल्यामुळे या पट्ट्याची तीव्रता कायम राहिली आहे. याशिवाय बाष्प देखील जास्त खेचल्यामुळे तीव्रता वाढत आहे. याबरोबरच मध्यपूर्व अरबी समुद्रापासून ते आंध्रप्रदेशाची किनारपट्टी, रॉयलसीमा तसेच पुढे कर्नाटकच्या अंतर्गत भागापर्यंत हवेच्या वरच्या भागात चक्रीय स्थिती कार्यरत आहे. अशीच आणखी एक चक्रीय स्थिती मध्यपूर्व अरबी समुद्रापासून ते महाराष्ट्राच्या किनारपट्टीपर्यंत आहे. या सर्व स्थितीमुळे राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार या प्रमाणात पाऊस पडत असून, 17 ऑक्टोबर पर्यंत हा पाऊस कायम राहणार आहे. असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.