नवी दिल्ली: पुढील महिन्यात होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेला बिस्किट हे चिन्ह दिले होते. मात्र, हे चिन्ह बदलून देण्याची लेखी मागणी बिहारमधील शिवसेनेकडून आयोगास करण्यात आली होती. त्यानंतर अखेर निवडणूक आयोगाने शिवसेनेची मागणी मान्य करत शिवसेनेला ‘तुतारी वाजवणारा मावळा’ हे चिन्ह दिलं आहे.
निवडणूक आयोगाने शिवसेनेला बिस्किटाऐवजी तुतारी वाजवणारा मावळा हे निवडणूक चिन्ह बदलून दिल्याचे सोमवारी कळवलं. त्यानंतर निवडणूक आयोगाने बदलून दिलेल्या या नव्या चिन्हाला शिवसेनेची पसंती असल्याचे सांगण्यात येत आहे. तत्पूर्वी, ट्रॅक्टर चालविणारा शेतकरी, गॅस सिलिंडर व बॅट यापैकी एका चिन्हाची मागणी शिवसेनेने आयोगाकडे केली होती. बिहार निवडणुकीत ही तिन्ही चिन्हे खुली आहेत. मात्र, आयोगाने शिवसेनेला बिस्किट चिन्ह दिले. बिहारमध्ये सत्तारुढ संयुक्त जनता दलाचे निवडणूक चिन्ह धनुष्य आहे. त्यामुळे ते चिन्ह देता येणार नाही असे आयोगाने स्पष्ट केले होते. बिहार निवडणुकीत शिवसेना ५० जागा लढवण्याच्या तयारीत आहे.