अंबाजोगाई: मागील अनेक वर्षापासून अखंडित सेवा देऊनही शासनाकडून नियमित सेवेत समावेशन केले जात नसल्याच्या निषेधार्थ स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात तात्पुरत्या नियुक्तीने असलेल्या सहायक प्राध्यापकांनी गुरूवार, 15 ऑक्टोबर रोजी काळ्या फिती लाऊन काम केले.
महाराष्ट्र शासनाच्या सर्व शासकीय महाविद्यालयात अनेक सहा. प्राध्यापक मागील अनेक वर्षांपासून तात्पुरत्या नियुक्तीने कार्यरत आहेत. कोरोना महामारीच्या काळात देखील हे सर्व डॉक्टर जीवाची बाजी लावून अहोरात्र रूग्णसेवा देत असल्याने आरोग्य यंत्रणा सुरळीत सुरू आहे. मात्र, अहोरात्र रुग्णसेवेत असलेल्या या डॉक्टरांच्या मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. सेवा नियमित करण्याच्या मागणीसाठी या डॉक्टरांनी अनेकदा शासन दरबारी अर्ज-विनंत्या केल्या. परंतु, अद्याप त्यावर कुठलीही ठोस कार्यवाही झाली नाही. समावेशन नसल्याने शासकीय सुविधांच्या लाभापासून हे डॉक्टर वंचित आहेत. अद्यापही त्यांना सहाव्या वेतन आयोगानुसारच वेतन देण्यात येते. त्यामुळे महाराष्ट्र स्टेट मेडिकल टिचर्स असोसिएशन या संघटनेने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. या संघटनेच्या माध्यमातून राज्यभरातील अस्थायी डॉक्टर 15 आणि 16 ऑक्टोबर रोजी दोन दिवसीय आंदोलनास आजपासून सुरुवात झाली. सध्याची कोरोनाची परिस्थिती आणि रूग्णहित लक्षात घेऊन आंदोलनाचे स्वरूप प्रतिकात्मक ठेवण्यात आले आहे. अंबाजोगाई येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयातील अस्थायी डॉक्टरांनी गुरूवारी सकाळी अधिष्ठाता कार्यालयासमोर येऊन निदर्शने केली आणि नंतर काळ्या फिती लावून कामकाज केले. या उपरही शासनाने मागण्यांवर गांभीर्याने विचार न केल्यास १ नोव्हेंबर पासून राज्यभर कामबंद आंदोलन करण्याचा इशारा अस्थायी डॉक्टरांनी दिला आहे. या आंदोलनात डॉ.अमित लोमटे, डॉ.रविराज वाळवंटे, डॉ. नागेश अब्दागिरे, डॉ.विशेष लोहपुरे, डॉ. विजयालक्ष्मी गवारे, डॉ.प्रमोद दोडे, डॉ.मंगल चौरे, डॉ.शीतल खडसे, डॉ.पियुशा नारागुडे, डॉ.संतोष गोडभरले, डॉ.महादेव सावंत यांच्यासह अनेक डॉक्टर सहभागी झाले आहेत.