मराठवाडा, मध्यमहाराष्ट्र, कोकणात अतिवृष्टीने हाहा:कार
पुणे: राज्यातील कोकण, मध्यमहाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील सर्वच भागात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेला मुसळधार पाऊस शुक्रवारीही (दि.16) कायम राहणार आहे. सर्वच भागात मुसळधार पाऊस बरसणार असून, पावसाचा जोर 17 ऑक्टोबरनंतर कमी होणार आहे. मान्सूनचा मुक्काम वाढला असून 22 ऑक्टोबर पर्यंत तो राहिल, त्यानंतर परतीचा मान्सून राज्यातून परतण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, मराठवाड्यासह मध्यमहाराष्ट्र, कोकणात अतिवृष्टीने हाहा:कार उडाला असून मोठ्या प्रमाणात आर्थिक व जीवित हानी झाली आहे.
राज्यात गेल्या पाच दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. मात्र, गेल्या चोवीस तासांपासून या पावसाने अक्षरक्ष: धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे मोठी जीवित व आर्थिकहानी झाली आहे. सलग दुस-या वर्षी सप्टेंबर शेवटचा टप्पा आणि ऑक्टोबर महिन्याचा पहिला पंधरवडा राज्यासाठी धोकादायक ठरला आहे. अजूनही पाऊस वाढणारच असल्यामुळे धोका आणखी वाढण्याची शक्यता आहे.
आणखी 48 तास पावसाचेच:
गेल्या दोन दिवसांपासून दक्षिण मध्यमहाराष्ट्र आणि दक्षिण कोकणावर कमी दाबाचा पट्टा स्थिरावला आहे. हा पट्टा पुढील 48 तासात मध्यपूर्व अरबी समुद्र ते महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून पुढे दक्षिण गुजरातकडे सरकणार आहे. त्यानंतर या कमी दाबाच्या पट्ट्याचे रूपांतर तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात होऊन त्यानंतर हा पट्टा ओमानकडे सरकणार आहे. परिणामी राज्यातील मुसळधार पावसाचा जोर ओसरणार आहे. असे असले तरी राज्यात अजून 48 तास मुसळधार पावसाचा धुमाकूळ सुरूच राहिल.
राज्यातील विविध जिल्ह्यात अलर्ट:
पालघर, मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग, धुळे, जळगाव, नाशिक, पुणे शहर जिल्हा व घाटमाथा, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, परभणी, हिंगोली, या भागात 16 ऑक्टोबर रोजी हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.