ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांची प्रदीर्घ मुलाखत पर्यावरण विषयाचे अभ्यास, पत्रकार अतुल देऊळगावकर यांनी टाळेबंदीच्या काळात घेतली होती. फेसबुक लाइव्हवरील या मुलाखतीचं ‘बोलिले जे… संवाद एलकुंचवारांशी’ हे पुस्तक मनोविकास प्रकाशनातर्फे येत आहे. १६ ऑक्टोबर २०२० रोजी मनोविकास लाइव्ह उपक्रमातंर्गत ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांच्या हस्ते या पुस्तकाचं ऑनलाईन प्रकाशन होत आहे. त्यानिमित्ताने या पुस्तकातील हा काही अंश…
अतुल देऊळगावकर: गणितज्ञ व सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ फ्रीमन डायसन म्हणतात, “ज्या मार्गांनी आम्ही वैज्ञानिक जातो तिथं कलावंत आणि तत्त्वज्ञ हे आधीच जाऊन पोचलेले असतात. आमच्या तिघांचे मार्ग वेगळे आहेत; पण वैज्ञानिकांच्या आधी कलावंत आणि तत्त्वज्ञ तेथे जातात.’’ मला याची जाणीव कशी झाली ते सांगतो. 1988 साली जेम्स हॅन्सेन यांच्या संशोधनामुळे जगाने ‘हवामानबदल’ ही संकल्पना गंभीरपणे घेतली. त्यामुळे ‘इंटर गव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज’ (आय.पी.सी.सी.)ची स्थापना झाली आणि जगाने हवामानबदलाचं संशोधन करायला एकत्र यायचं ठरवलं. 1990 साली जागतिक हवामानबदलासंबंधीचा त्यांचा पहिला अहवाल प्रसिद्ध झाला. 1992 साली पहिली ‘जागतिक हवामान परिषद’ भरली.
तुम्ही ‘युगान्त’ लिहायला घेतलं तेव्हा तुम्हाला ह्या वैज्ञानिक हालचालींची कल्पना नसणार. तरी तुम्ही ‘युगान्त’मध्ये 8 वर्षं सलग पाऊसच पडलेला नाही असं दाखवलंय. सगळा निसर्ग, नद्या आटून गेलेल्या आहेत, पाणी नावाची गोष्ट शिल्लक नाही, बाभूळसुद्धा शिल्लक नाही, सगळीकडे धुळीचे साम्राज्य आहे, त्या गावामध्ये चोरी करण्याकरता काहीही शिल्लक नाही असं वर्णन केलेलं आहे. वैज्ञानिकांना अनेक प्रयोग करीत, आडाखे बांधून जिथे पोहोचायला इतकी वर्षं लागतात, तिथे तुम्ही इतकी वर्षं आधी कसे जाऊन पोहोचलात? तुम्हाला 1991 सालीच ‘युगान्ता’ची चाहूल कशी लागली होती?
महेश एलकुंचवार : जरा सविस्तर उत्तर देतो. मी काही पर्यावरण विषयाचं वाचन वा अभ्यास, जसा तू केलेला आहेस तसा केलेला नाही, नव्हता. वैज्ञानिकांच्या आधी कलावंतांना किंवा तत्त्वज्ञांना काही गोष्टी समजतात हे जे गृहीतक आहे त्याचं कारण असं की कलावंत आणि तत्त्वज्ञ हे पुष्कळदा अंत:प्रेरणेनी काही गोष्टी जाणतात. त्यांना असते ती अंत:प्रेरणा. सगळ्यांनाच ती नसते. पण त्या अंत:प्रेरणेला जर उघडे डोळे आणि सजग मन भेटलं तर काही गोष्टींची जाणीव लवकर होऊ शकते. आता पर्यावरणातला हा जो बदल आहे तो काही मी खूप वाचन केलं आणि पर्यावरणाकडे पाहू लागलो त्यामुळे माझ्या लक्षात आलेला नाही. ह्या विषयाचं वाचन माझं अजूनही खूप कमी आहे. म्हणजे तुझ्याकडून एक एक नावं ऐकली की अजूनही मी खूप गार होतो की हा माणूस कुठे लातूरला राहतो आणि कुठली कुठली पुस्तकं कधी आणि केव्हा वाचतो? थोडा मत्सरही वाटतो, पण माझ्यात तेवढी शक्ती नाही एवढं वाचन करण्याची.
अ.दे.: पण काही गरजच नाही तुम्हाला त्याची.
म.ए.: (हसत) या गोष्टीची जाण मला कशी आली ते मी तुला सांगतो. मी खेड्यातला. माझं जन्मगाव पारवा. अगदी लहानसं खेडं. तिथून मग शिरपूर. आमचं गाव. हेही छोटं गाव होतं. ते आता वाढत चाललंय. माझ्या आठवणी 1955-60 ह्या काळातल्या आहेत. गावी आमचा मळा होता. त्यातल्या दोन्ही विहिरींमध्ये मे महिन्यातसुद्धा पाणी असे. मी पोहायला जात असे. दोन-तीन पुरुष पाणी असणार्या दोन विहिरी होत्या. मग हळूहळू पाणी कमी व्हायला लागलं. पाणी कमी व्हायला लागलं तशी पिकं बदलत जायला लागली. आधी आमच्याकडे पानाचे मळे होते. म्हणजे विड्याचं पान! संपूर्ण शिरपूरच्या भोवती विड्याच्या पानांचे मळे होते. त्याला पाणी फार लागतं. पण त्याच्यामुळे संपूर्ण गाव विलक्षण थंड असे. उन्हाळ्यात बाहेर झोपलं तर रात्री बारानंतर अंगावर दुलई घेऊन झोपावं लागत असे. मग पाणी जसं जसं खाली गेलं तसे तसे पानमळे गेले. त्याच्याजागी ऊस आला. मग उसालाही पाणी पुरेना. त्याच्यानंतर केळी आल्या. पुढे केळीचे बागही सुकले. त्याच्यानंतर मग हळूहळू अशी परिस्थिती आली की विहिरींचं पाणी फेब्रुवारी महिन्यातच आटू लागलं. विहिरीत गुडघाभरसुद्धा पाणी नसे. शिवारात पीक नाही. सगळीकडे फुफाटा. 1955 पासून 80-85-90 सालापर्यंत वेगाने बदल घडत गेले आणि मी ते पाहिलेले आहेत. पाण्याचं हे जे दुर्भिक्ष्य निर्माण झालं आहे ते आपणच निर्माण केलं आहे. ज्या प्रकारची जंगलकटाई अवतीभोवती होत होती ते तर आपण सर्वच पाहत होतो. त्याचं प्रतिबिंब ‘मग्न तळ्याकाठी’मध्ये आलेलं आहे.
माझ्या अगदी लहानपणी, म्हणजे 1945 ते 50च्या दरम्यान, मी यवतमाळला काकांकडे राहत असताना आमच्या बाजूला एक गृहस्थ होते. त्यांचा तो उद्योगच होता. त्यांचा ट्रक जंगलात जायचा आणि ते साग कापून आणायचे. ते पुढे श्रीमंत झाले. मध्यरात्री त्यांचा ट्रक यायचा आणि लाकडं फेकल्याचा धडाधड आवाज यायचा. तेव्हा सर्व मोहल्ला चिडीचूप असे. ती लहानपणची आठवण माझ्या मनात होती. पण तेव्हा 1947-48 साली साग कापणं एवढं भयंकर असेल असं कधी वाटलं नव्हतं. समजण्याचं ते वय पण नव्हतं. पण जाणवे. आता ते समजतं. नंतर पर्यावरण कसं बदललं याचा दुसरा खरा धक्का मला साधारण 1990 साली बसला. माझं जन्मगाव पारवा. हे यवतमाळ जिल्ह्यात आहे. तो आता आत्महत्यांचा जिल्हा झालाय! त्या पारव्याला माझी आयुष्यातली सुरुवातीची 5-7 वर्षं गेली. मला आठवतं, तिथे पारव्याला जायचं म्हणजे दिवसा बैलगाडी जंगलातनं जायची. ते संपूर्ण गाव जंगलानं वेढलेलं होतं. अरण्य म्हणता येईल इतकं गर्द जंगल होतं. त्यात पट्टेदार वाघ होते. दिवसा बैलगाडी जंगलात घालायची तरी भीती वाटत असे. पुष्कळदा बैल जागच्याजागी दबकून थांबून जात. गाडीवान हलकेच सांगायचा, ‘मालक, आहे बरं.. जवळच..’. मग थोड्यावेळानं आम्ही पुढे जायचो. नंतर ते गाव आम्ही साधारण 1952 साली सोडलं. पुढे माझ्या चुलतभावाच्या मुलीचं लग्न जवळच होतं पांढरकवड्याला. म्हणून आम्ही तिथे गेलो. म्हणजे 90 साली. म्हटलं चला पारव्याला जाऊया आपण. 25 किलोमीटर आहे तिथून. 38 वर्षांनी आपल्याला जन्मगावाची आठवण येतेय तर आपण जाऊया. आम्ही गेलो तर वाटेत मला कुठे जंगलच दिसेना. पारव्याला पोहोचेपर्यंत अगदी दोन्ही बाजूंनी जंगल काय, तुरळक झाडं पण दिसेनात अवतीभोवती. एखादा फर्लांग दोन्ही बाजूला विरळ झाडं आहेत-नाहीत असं दिसायचं. पुढे गेलं की ओसाड जागा! 14 मैलांच्या त्या प्रवासात मला कुठेही जंगल दिसलं नाही. आम्ही लहानपणी घाबरत होतो दिवसा तिकडे बैलगाडी घालायला. ते जंगल गायब! हे पाहिल्यानंतर मी चरकलो. म्हणालो, “एवढं! 38 वर्षांत!’’ माझ्याबरोबर एक मित्र होता. तो म्हणाला, “38 नाही, हे फार पूर्वीच झालंय.’’ गावात शिरलो तर गाव होतं तसं होतं, परंतु त्यांच्या दृष्टीने मी परका होतो. कारण हा कुठेतरी शहरात राहिलेला, मोठा झालेला, इंग्लिश बोलतो, गाडी घेऊन आला वगैरे. तो दुरावा… मला अत्यंत वाईट वाटलं की ज्यांच्याबरोबर मी राहिलो, उंडारलो, ते माझे मित्र दूर गेले. कोणी जवळ यायला, बोलायला तयार नाही. तिथून आम्ही, तिथे जहागीरदार आहेत प्रयागराव देशमुख, ते वारले आता, तर आम्ही त्यांच्याकडे गेलो. त्यांची पत्नी मला म्हणाली, “माणसं बदलली बरं आता.’’
मी म्हटलं, “गाव बदललंय पुष्कळ.’’ ह्या गावाची खूण न् खूण मला माहीत होती. आमच्या घराच्या अंगणात एक मोठं कडुलिंबाचं झाड होतं. ते कापलेलं दिसलं. नंतर गावात भटकलो तर इथं आंब्याचं झाड होतं, इथं उंबराचं झाड होतं हे सगळं मला माहीत होतं. लहानपणी इथंच खेळलो मी. गावभरच खेळलो आम्ही. एवढंसं गाव, 2000ची वस्ती. कोपरा न् कोपरा मला माहीत. मी गेल्यावर प्रयागरावांना म्हटलं की, “अहो, इथली सगळी झाडं कोणी कापली? आंब्याची झाडं कापून टाकलेली आहेत. शंकराच्या देवळाजवळ अशी 12 झाडं होती आंब्याची रांगेनी. सगळी कापली. पेरूची बाग होती, जवळजवळ 60 झाडं होती. सगळी कापून टाकलेली आहेत.’’ त्यांनी कुणाचं तरी नाव घेतलं. म्हणाले, “कापून टाकली आणि पैसे केले.’’
मी म्हटलं, “एवढं बदललं गाव?’’
तर बाई म्हणाल्या – आम्ही त्यांना वैनी म्हणायचो – वैनीसाहेब म्हणाल्या, “माणसंही बदलली.’’
तिथून येताना हे घरी घेऊनच आलो मी. तेव्हापासून माझ्या मनात कुठेतरी चाललं होतं की हा विनाश जो आहे तो आपणच केलेला आहे. त्यात अमक्या एकाला दोषी कसं धरता येईल?’
मला नेहमी असं वाटतं की, मोठ्या पातळीवरच्या लोकांबद्दल बोलतोय मी, की सरकारं काय करतात, सरकारांच्या योजना काय आहेत, मोठाल्या योजना आखून लोकांच्या डोळ्यांत धूळ कशी फेकायची आणि त्यातून पैसे कसे कमवायचे आणि ते काही व्यक्तींच्या खिशात कसे घालायचे ह्या फार नंतरच्या गोष्टी आहेत. ते षडयंत्र सालोसाल चाललेलं आहे. पण व्यक्ती म्हणून ह्याला माझा किती हातभार लागलेला आहे? लागलेला आहे का? जगात कुठल्याही गोष्टीचं अवमूल्यन होतं किंवा जेव्हा जगातली मूल्यं ढासळायला लागतात तेव्हा त्या प्रक्रियेला माझा कुठेतरी हातभार लागलेला आहे की नाही हे आधी तपासून पाहावं लागतं. कारण एक एक व्यक्ती मिळूनच समाज होतो. हे तपासता तपासता माझ्या लक्षात आलं की मी स्वतः कसा जगतोय? माझी मूल्यव्यवस्था काय आहे जगण्याची आज? मला जे आज हरवलं आहे म्हणून वाटतंय त्यात माझा हातभार किती असेल? ह्यातून मग विचार करता करता पुढे मी म्हटलं की माझं नागपूरला घर आहे ती शेतीची जमीन होती. गावाच्या बाहेर होती. ती आता नॉन अॅग्रिकल्चर करून तिथे प्लॉट पाडून घरं झाली. माझं घर 45 वर्षांपूर्वी गावाबाहेर होतं ते आता शहराच्या मध्यभागी आलेलं आहे. माझ्यासमोरच सगळी शेतजमीन ही बिगरशेतीची झालेली आहे. माझा पुतण्या म्हणाला, “असं जर आपण करत गेलो तर शेती कुठे होणार? आपण जेवणार काय?’’ मी म्हटलं, “तुझ्या लक्षात आलं हे बरंय!’’ पण खरोखरच लोकसंख्येचा प्रश्न ज्या पद्धतीने अक्राळविक्राळ होत आहे त्याच्यावर आपण कधी विचार केला नाही. स्वतंत्र घर असणं, स्वतंत्र गाडी असणं ही महत्त्वाची मूल्यं होऊन बसलेली आहेत. त्यावरून तुमचा सामाजिक दर्जा ठरवला जातो. ह्या सगळ्याचा विचार करता करता मला मग केव्हातरी असं वाटत गेलं की आपण जाऊ तरी कोणत्या टोकाला? आपण काही शिकायला तयार नाही. आपल्याएवढे आडमुठे लोक कोणी नाहीत. ठरवून अडाणी राहिलेले, विचारच न करणारे. स्वतःच्या पायावर उघड्या डोळ्यांनी धोंडा घालून घेणारे, म्हणजे जणू काय पृथ्वीवरचा आजचाच फक्त दिवस हातात आहे किंवा आपलीच शेवटची पिढी आहे ह्या पृथ्वीवरची, तेव्हा ओरबाडून घ्या. ह्या पद्धतीने आपलं जे चाललेलं आहे ते असंच चाललं तर कुठे जाऊ आपण? असंच होणार. सगळीकडे धुळीची वादळं दिसतील. पडलेली घरं दिसतील. जंगलं तर माझ्या डोळ्यांसमोरच नाहीशी होत गेली. नागपूरला सेमिनरी हिल्स नावाचा भाग आहे. तिथे सुंदर वुड्स होती ती कशीबशी जीव धरून आहेत. आणि नागपूरच्या जरा बाहेर पडलं, हिंगण्याच्या पलीकडे, की भरपूर जंगलं होती. हा सगळा जंगलांनी वेढलेलाच भाग आहे. गोंडवन आहे हे. त्याला विदर्भ म्हणतात. पण नागपूर खरं म्हणजे गोंडवनात आहे. विदर्भ चारच जिल्ह्यांचा. राजकीय सोयीसाठी दहा जिल्ह्यांचा करून नागपूर त्यात आणलेलं आहे. ती सगळी जंगलं गेली. अरण्य म्हणायची सोयच राहिली नाही. साधं जंगलसुद्धा नाही. इंग्लिशमध्ये वुड्स म्हणतात म्हणजे तुरळक झाडं, तीसुद्धा राहिलेली नाहीत. सगळ्या ठिकाणी इंडस्ट्रीज आलेल्या आहेत. सगळ्या धूर ओकतात. सगळीकडे धूळ आहे. बाकीचं काही नाही. चांगले रस्ते नाहीत, रस्त्यांच्या बाजूंनी भरपूर झाडं लावलेली नाहीत, मुबलक पाणी वगैरे काही नाही आपल्याकडे. इथे नागपूरला नितळ स्वच्छ पाण्यानी भरलेले तलाव होते त्यांतून आम्हाला पाणीपुरवठा व्हायचा. आता त्यातलं पाणी प्रदूषित झालं आहे म्हणून दूरवरून पाणी येतं. तर ह्या सगळ्यातून मला असं वाटलं की आपण डोळे उघडे ठेवून विनाशाकडे चाललेलो आहोत. अखेरच्या टोकाला आपण गेलो तर तो असा असा असेल… म्हणून मी ‘युगान्त’च्या सुरुवातीला असं लिहिलं आहे की ‘हे केव्हाही घडू शकतं. आज, उद्या किंवा केव्हाही पुढे भविष्यात.’
तर हे मला अनुभवातून बरचसं जाणवत होतं. आणि मला मुख्य म्हणजे त्यावेळी त्याचा अतिशय त्रास होत होता. जेव्हा पर्यावरण बदलतं ना अतुल, ते आपल्या लोभामुळे बदलतं. तेव्हा मग त्या बदलत्या पर्यावरणाबरोबर माणसांची नातीपण बदलतात आणि मूल्यं हळूहळू नाहीशी होतात. निसर्गाला चिकटून म्हणजे निसर्गानीच आपल्याला दिलेली मूल्यं आहेत ती. आपण निसर्गाला नाहीसं करतो तेव्हा मग त्याच्याबरोबर ही मूल्यंही नाहीशी होत जातात. त्याच्याजागी जी नवीन मूल्यं येतात, ती संपूर्ण बाजारू मूल्यं आहेत ते दिसत तर आहेच. पैसे असणं, खूप पैसे असणं, पैसा हेच मूल्य, यात नाती संपली तरी हरकत नाही ह्या बाजारू मूल्यांचं प्रस्थ वाढत आहे. तर हे आता तू म्हणतोस त्याप्रमाणे मी काही ह्याचा अतिशय सुसंघटित असा विचार केला नव्हता. त्याचा अभ्यास नव्हता. विनाशाकडे आपण चाललो आहोत. तर कसे चाललो आहोत? तर असे असे चाललो आहोत असं म्हणून मी बसलो आणि लिहायला सुरुवात केली आणि ते लिहिलं. आता आज जेव्हा मी त्या नाटकाकडे बघतो आणि विचार करतो तेव्हा वाटतं त्यात अश्या अश्या गोष्टी यायला पाहिजे होत्या; म्हणजे क्राफ्टच्या दृष्टीनं आणि मजकुराच्या दृष्टीनंही. कारण आता याच्यापेक्षाही भयानक चाललेलं आहे.