# मुंबई, नाशिक, मराठवाड्यासह राज्यातील 23 जिल्ह्यात ‘यलो अलर्ट’.

पावसाचा जोर 21 ऑक्टोबर पर्यंत सुरूच राहणार

पुणे: राज्यात गेल्या आठवड्यापासून सुरू असलेला पाऊस 21 ऑक्टोबर पर्यंत सुरूच राहणार असून, कोकण, मध्यमहाराष्ट्र व मराठवाड्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे.  विदर्भ वगळता राज्यातील मुंबई, नाशिक, औरंगाबादसह 23 जिल्ह्यांमध्ये हवामानशास्त्र विभागाने ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.

राज्यभर पावसाचा जोर कायम असून, आणखी चार दिवस कोकण, मध्यमहाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर मध्यमहाराष्ट्रात तुफान पाऊस बरसणार आहे. गेल्या पाच दिवसांपासून उत्तरपूर्व अरबी समुद्रात तळ ठोकून असलेला कमी दाबाचा पट्टा आता दक्षिण गुजरातकडे सरकला आहे. सध्या हा पट्टा वेरावळ पासून समुद्रात 420 तर ओमान पासून 1500 किलोमीटर अंतरावर आहे. दक्षिण गुजरातमध्ये असलेला हा पट्टा पुढील 48 तासात ओमानकडे सरकणार आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरात आणखी एक नवीन कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे. त्यामुळे राज्यात 21 ऑक्टोबर पर्यंत पावसाचा जोर राहणार आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 23 जिल्ह्यात 21 ऑक्टोबर पर्यंत ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. यामध्ये पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा,  सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *